लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल काय होतो यावरही बरेच काही अवलंबून आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे आहे.
चाकण : लोकसभेच्या निवडणुकीनंतर (Lok Sabha Elections) दिवाळीच्या अगोदर विधानसभेची निवडणूक (Assembly Election) होत आहे. लोकसभेची मतमोजणी झाल्यानंतर जूनच्या शेवटच्या आठवड्यात मंत्रीपदाचा विस्तार होण्याची शक्यता अधिक आहे. मंत्रिमंडळ विस्तारात आमदार दिलीप मोहिते यांना मंत्रिपद मिळावे, अशी त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांची जोरदार मागणी आहे. मोहितेंची ही तिसरी टर्म आहे. यावेळी आमदार दिलीप मोहिते यांनाही मंत्री पदाची आशा आहे.
आज ता. 29 रोजी आमदार दिलीप मोहितेंचा (Dilip Mohite) वाढदिवस साजरा होत असताना बहुतांश समर्थक कार्यकर्त्यांनी मंत्री साहेब, लाल दिव्याची गाडी फलकावर, सोशल मीडियावर दाखवून त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. खेड तालुक्याला गेल्या 35 वर्षांपासून मंत्रीपदाचे नुसते गाजरच मिळत आहे. खेडचे माजी आमदार स्वर्गीय नारायण पवार हे सुद्धा मंत्री पदाची मागणी करत होते. त्यांच्या समर्थक कार्यकर्तेही त्यावेळेस माजी आमदार स्व. नारायण पवार यांना मंत्रीपद मिळावे, अशी आशा बाळगून होते.
माजी आमदार स्वर्गीय नारायण पवार यांच्याही नशिबी मंत्रीपदाचा लाल दिवा आला नाही. मंत्रीपद न मिळाल्याने माजी आमदार स्व. नारायण पवार यांनी शरद पवार यांच्या पक्षाला रामराम करून अपक्ष निवडणूक लढवली होती. शेजारील आंबेगाव तालुक्यात मंत्रीपदे सातत्याने मिळत गेली. खेड, जुन्नर या तालुक्यावर नेहमी अन्याय झाला, असेही समर्थक कार्यकर्त्यांचे म्हणणे राहिले आहे. तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी खेड तालुक्याला मंत्रीपद देण्यासाठी दुर्लक्ष केले असाही आरोप आमदार मोहिते समर्थक कार्यकर्त्यांचा आहे.
खेडचे आमदार दिलीप मोहिते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात आहेत. त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे येत्या मंत्रिमंडळ विस्तारात मोहित्यांना मंत्रीपद देऊन त्यांना खुश करतील, अशी जोरदार चर्चा आहे. दिलीप मोहिते यांना मंत्रीपद मिळावे यासाठी आमदार मोहिते यांचे समर्थक कार्यकर्ते जोरदार बांधणी करत आहे. आमदार मोहिते यांनाही यावेळी कसल्याही परिस्थितीत मंत्रिपद हवे आहे. येत्या मंत्रिमंडळ विस्तारात खेडला लालदिवा मिळतो का हे ही पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल काय होतो यावरही बरेच काही अवलंबून आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे आहे. कार्यकर्त्यांच्या मते आमदार दिलीप मोहिते यांच्यावर अन्याय झालेला आहे. त्यामुळे आमदार मोहिते यांच्यावर झालेला अन्याय हा खेड तालुक्यावरील अन्याय आहे. खेड तालुक्यातील लोकप्रतिनिधीला यावेळी नक्की मंत्रीपद द्यावे, अशी जोरदार मागणी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.