सहा संस्था, १६०० झोपडपट्ट्या आणि सव्वालाख सभासदांचा ‘अन्नपूर्णा परिवार’ म्हणजे आधुनिक युगातील महिला सक्षमीकरणाचा परिपूर्ण पॅटर्न! व्यवसायासाठी ‘सूक्ष्म कर्ज’, कुटुंबासाठी ‘आरोग्य निधी’, निवृत्तीनंतर ‘आधारपूर्णा’, वस्तीतील मुलांसाठी ‘वात्सल्यपूर्णा’ अन् शिक्षणासाठी ‘विद्यापूर्णा’ अशा विविध योजनांचा पसारा असलेल्या अन्नपूर्णा परिवाराने नुकताच वर्धापन दिन साजरा केला. त्यानिमित्त संस्थापक डॉ. मेधा पुरव सामंत यांच्याशी साधलेला संवाद...
प्रश्न - महिला सक्षमीकरणासाठी ‘अन्नपूर्णा’च का?
डॉ. मेधा पुरव सामंत - महिला सक्षम झाल्या तर कुटुंब सक्षम होते. १९७५ मध्ये माझ्या आईने म्हणजे प्रेमा पुरव यांनी अन्नपूर्णा महिला मंडळाचे काम सुरू केले. हीच प्रेरणा माझे वडील कॉ. दादा पुरव यांच्या मार्गदर्शनाने अन्नपूर्णा परिवाराच्या रूपाने आम्ही विस्तारली आहे. १९९३ मध्ये भाजीपाल्याची विक्री करणाऱ्या महिलांना सूक्ष्म कर्ज देत आमचा प्रवास सुरू झाला. सुरुवातीला नऊ महिलांना कर्जे दिली. आज जवळपास सव्वालाख महिलांना आम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम करू शकलो. बॅंक ऑफ इंडियातील नोकरी सोडून कुटुंबाच्या विश्वासाने आम्ही हा प्रवास सुरू केला. तारण नसलेल्यांना बॅंक सूक्ष्म कर्ज देत नाही अन् खासगी सावकार अव्वाच्या सव्वा व्याजदर लादतो. समाजाची गरज ओळखून, समाजाच्याच सहभागाने हा प्रवास पूर्णत्वाकडे जात आहे.
नोकरी सोडून परिवार साकारण्याची प्रेरणा कुठून मिळाली?
डाव्या चळवळीत असलेले आई-वडील हे माझे मार्गदर्शक आहेत. त्याचबरोबर गांधी-मार्क्स यांचे विचार माझी प्रेरणा आहे. आईने गिरणीकामगार महिलांबरोबर काम केले. वडिलांनी बॅंक कर्मचारी संघटनेचे नेतृत्व केले. माझे पती आणि मलाही चळवळीचा वारसा आहे. मुंबईच्या बालमोहन शाळेत झालेले संस्कार आणि ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या माध्यमातून विद्यार्थी चळवळ इथेच ही बीजे रोवली गेली. बॅंकिंग केवळ ‘क्लास’साठी नाही, तर ते ‘मास’साठी असावे, असे नेहमी वाटायचे. सहकार कायद्याच्या अभ्यासातून हा उपक्रम सुरू झाला.
परिवाराचा विस्तार किती मोठा आहे?
पुणे शहरातील ६५० आणि मुंबईतील एक हजार झोपडपट्ट्यांमध्ये आमचे काम सुरू आहे. आमच्या महिला क्रेडिट सोसायटीचे एक लाख २५ हजार सभासद असून, त्यातील जवळपास ९५ टक्के महिला आहेत. आरोग्यनिधी या विम्याच्या माध्यमातून दोन लाख ५० हजार सभासदांची जीवन सुरक्षा निश्चित झाली आहे. निवृत्तिवेतनासाठीच्या ‘आधरपूर्णा’ योजनेत ३१ हजार सभासदांनी नोंदणी केली आहे. सध्या १२ पाळणाघरांतून ४५० मुलांचा सांभाळ केला जात आहे. परिवारातर्फे चालविल्या जाणाऱ्या ‘विद्यापूर्णा’ योजनेतून एक हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. दादा पुरव संशोधन केंद्राच्या माध्यमातून सूक्ष्म अर्थ पुरवठ्यावर संशोधन केले जाते. पुस्तकेही प्रसिद्ध होतात. २००८ पासून पूर्णा ई-सोल्युशन्सच्या माध्यमातून सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन्स पुरविली जातात.
‘अन्नपूर्णा’ परिवारातून आम्ही काय घ्यावे?
गरजू महिला आणि विद्यार्थ्यांसाठी आमचे उपक्रम असून, त्यात तुम्ही नक्की गुंतवणूक करू शकता. तुम्हाला नक्कीच परतावा मिळेल. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे शहरांतील झोपडपट्ट्यांकडे तुच्छतेने पाहू नका. कारण तेथून येणाऱ्या माणसामुळे तुमचे जीवनमान सुकर होते. शहरांच्या उभारणीत त्यांचा खूप मोठा वाटा आहे. त्यांचे जीवनमान सुधारावे, म्हणून प्रयत्न करा, घृणा नको.
संस्थेचे संकेतस्थळ - https://annapurnapariwar.org/
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.