पुणे - राज्यात मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलने सुरू आहे. तर दुसरीकडे राज्य मागासवर्गीय आयोगातर्फे मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षण केले जाणार आहे. पुणे शहरातील या कामासाठी महापालिकेच्या १ हजार ५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, आयोगाकडून अद्याप सर्वेक्षणाचे सॉफ्टवेअर उपलब्ध झालेले नसल्याने सर्वेक्षण सुरु झालेले नाही.
राज्यात गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणावरून आंदोलने, मोठ्या सभा सुरु आहेत. जरांगे पाटील यांनी राज्य सरकारने आरक्षणाचे आश्वासन देत दोन वेळा त्यांचे उपोषण मागे घेण्यास लावले. तरीही अद्याप आरक्षणावर तोडगा निघालेला नाही. जरांगे पाटील यांनी एकीकडे मराठा म्हणजे कुणबी अशी भूमिका घेत ओबीसीतून आरक्षणाची मागणी केली आहे. तर ओबीसी नेत्यांनी यास विरोध केला आहे.
राज्य सरकारने ओबीसीचे आरक्षण कमी होऊ देणार नाही असे जाहीर करत मराठा समाजाला न्यायालयात टिकेल असे स्वतंत्र आरक्षण दिले जाईल असे आश्वासन दिले आहे. पण ही मागणी अमान्य करत आता २० जानेवारीला मुंबईत आंदोलन केले जाणार आहे.
मागासवर्गीय आयोगातर्फे मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यासाठी शासनाच्या पातळीवर बैठका झाल्या आहेत. गेल्या आठवड्यात राज्यातील सर्व महापालिका आयुक्तांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेत सर्वेक्षणासाठी मनुष्यबळ द्यावे अशी सूचना शासनाने केली होती. त्यानुसार महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी यासंदर्भात आदेश काढला आहे.
सर्वेक्षणासाठी १ हजार ५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून, प्रत्येक १५ कर्मचाऱ्यामागे एक पर्यवेक्षकाची नियुक्ती केली आहे. या कर्मचाऱ्यांकडून सर्वेक्षण करून घेणे, त्याचा अहवाल सादर करणे याची सर्व जबाबदारी उपायुक्त चेतना केरूरे यांच्याकडे दिली आहे.
बिनवडे यांनी या कर्मचाऱ्यांची नियुक्ती ११ जानेवारी रोजी केली आहे, पण अजूनही सर्वेक्षणाचे काम सुरु झालेले नाही. या सर्वेक्षणासाठी आयोगाकडून सॉफ्टवेअर उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्याची सध्या चाचणी सुरु आहे. तसेच हे ॲप मोबाईल बेस असणार आहे की टॅब बेस याची माहिती महापालिकेकडे उपलब्ध नाही.
१ लाख कुटुंबांचे सर्वेक्षण
मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षण करताना प्रत्येक कर्मचाऱ्याला १०० कुटुंबांचे लक्ष्य दिले आहे. हे काम १० दिवसात करावे लागणार आहे. महापालिकेने १ हजार ५०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असल्याने शहरात १ लाख ५०० कुटुंबांचे सर्वेक्षण केले जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.