Ashadhi Wari 2023  esakal
पुणे

Ashadhi Wari : माउलींच्या पालखी सोहळ्यास आळंदीकरांकडून निरोप, रांगोळ्यांच्या पायघड्या, पुष्पवर्षाव अन् माउलींचा घोष

रात्रभर अखंड भजन आणि माउलींचा गजर ठिकठिकाणी सुरू होता.

सकाळ वृत्तसेवा

Ashadhi Wari - आळंदी रांगोळ्यांच्या पायघड्या....पुष्पवर्षाव....अशा पहाटेच्या वातावरणात माउलींचा अखंड जयघोष करणाऱ्या आळंदीकरांच्या उपस्थितीत पालखी सोहळा आळंदीहून पंढरपूरकडे आषाढी वारीसाठी पुण्याच्या दिशेने मार्गस्थ झाला. आता माऊलींचा विरह होणार असल्याने भावूक आळंदीकरांनी डोळ्यांच्या कडा पुसत सोहळ्यास निरोप दिला. यावेळी अनेक आळंदीकर माउलींच्या सोहळ्यासोबत वडमुखवाडीतील थोरल्या पादुका मंदिरापर्यंत चालत होते.

माउलींच्या पालखीचे सोमवारी (ता. ११) मंदिरातून सायंकाळी पावणे सातला प्रस्थान झाले होते. प्रस्थानानंतर आजोळघरी पालखी मुक्कामी विसावली. रात्रीची समाज आरती झाल्यानंतर भाविकांचे दर्शन सुरू होते. आळंदीकर आणि परिसरातील नागरिकांनीही दर्शनासाठी पहाटे दोनपर्यंत गर्दी केली होती.

त्यानंतर दर्शन बंद ठेवण्यात आले. रात्रभर अखंड भजन आणि माउलींचा गजर ठिकठिकाणी सुरू होता. पहाटेच्यावेळी आजोळघरी पालखी ठेवलेल्या ठिकाणी आळंदीतील सुधीर गांधी आणि कुटुंबीयांकडून माऊलींच्या पादुकांना रुद्राभिषेक व पाद्यपूजा करण्यात आली. देवस्थानच्यावतीनेही माऊलींची पहाट पूजा व आरती करण्यात आली. यानंतर शितोळे सरकार यांच्यावतीने माउलींना नैवेद्य दाखविला. पहाटे सहा वाजता माऊलींच्या मानाच्या अश्वाचे

आगमन आजोळघरी झाल्यानंतर आळंदीकरांनी माउलींची पालखी विठूनामाच्या गजरात आजोळघरातून बाहेर आणली. तत्पूर्वी पहाटेपासून मोठ्या संख्येने भाविक दिंड्यांसह बाहेर पडत होते. दिंड्यांचे ट्रक मध्यरात्रीतून तर काही पहाटेच्यावेळी सोहळ्याच्या अगोदर पुण्याच्या दिशेने सोडण्यात आले होते.

दरम्यान, आजोळ घरातून पालखी बाहेर आल्यानंतर ठिकठिकाणी फुलांचा वर्षाव केला. पालिका चौकामध्ये आकर्षक फुलांनी सजविलेल्या रथामध्ये पालखी ठेवली. रथाला आळंदीतील तुळशीराम भोसले कुटुंबीयांची बैलजोडी जुंपली. रथाची संपूर्ण सजावट आळंदीतील गरुड कुटुंबीयांनी केली.

रथामध्ये पालखीच्या स्वागताला पालिकेच्यावतीने मुख्याधिकारी कैलास केंद्रे, अंकुश जाधव, तहसीलदार डॉ. वैशाली वाघमारे उपस्थित होत्या. यावेळी पालखी सोहळाप्रमुख ॲड विकास ढगे, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, बाळासाहेब चोपदार, राजाभाऊ चोपदार, रामभाऊ चोपदार यांचा सन्मान केला.

त्यानंतर माउलींचा रथ पुण्याच्या दिशेने पुढे निघाला. पालिका चौक दुतर्फा भाविक, दिंड्या आणि आळंदीकर ग्रामस्थांनी भरून गेला. पालिका चौकापासून ते पुढे पुणे-आळंदी रस्त्यावर ठिकठिकाणी जनसमुदाय सोहळा पाहण्यासाठी जमला होता.

एकामागून एक दिंड्या खांद्यावर भगव्या पताका घेऊन टाळ मृदंगाच्या निनादात विठूनामाचा गजर करत पंढरीकडे निघाल्या. दुसरीकडे पालखीने जुना पूल ओलांडल्यानंतर निरोप देण्यासाठी जमलेल्या आळंदीकर ग्रामस्थांच्या डोळ्याच्या कडा पाणावू लागल्या. तर काही आळंदीकर पुण्यापर्यंत सोहळ्याबरोबर चालत आले होते. पंढरीकडे निघालेली माउली आता महिनाभरानेच भेटणार यामुळे आळंदीकरांचे अंतःकरण जड झाले.

वारकऱ्यांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी पाणी, बिस्किटे, पोहे, राजगिरा लाडू, चिक्कीचे वाटप केले जात होते. पावणे नऊ वाजता माउलींची पालखी थोरल्या पादुका येथे पोचली. यावेळी थोरल्या पादुका येथील ज्ञानेश्वर मंदिरात पालखी सोहळा मालक राजाभाऊ आरफळकर यांनी हातात पादुका घेऊन तेथील माउलींच्या पुढे स्थानापन्न केल्या.

थोरल्या पादुका देवस्थानचे विश्वस्त अॅड विष्णू तापकीर आणि सदस्यांनी विधिवत पादुकांना पंचामृत स्नान घातले. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, माजी महापौर नितीन काळजे यांची उपस्थिती होती. त्यानंतर आरती करून पालखी सोहळा पुढे दिघी, कळस, फुलेनगर मार्गे पुण्याकडे मार्गस्थ झाला.

सोमवारी सकाळी पालखी सोहळा आळंदीहून पुण्याकडे मार्गस्थ झाला. रथाला जुंपण्यात आलेली बैलांच्या अंगातील उष्णता वाढल्याने विश्रांतवाडीजवळ दोन्ही बैलांची पावले मंदावली. त्यामुळे भोसले कुटुंबीयांनी त्यांच्याकडील जादाची बैलजोडी आळंदीतून मागवली आणि ती फुलेनगरला रथाला जुंपण्यात आली. रथासोबत जादाची बैलजोडी ठेवली असल्याचे बैलजोडी मानकरी तुळशीराम भोसले यांनी सांगितले.

ध्वनिक्षेपक बंद ठेवण्याची मागणी

दिघीपासून रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या स्वागतकमानीतील ध्वनिक्षेपकांच्या कर्णकर्कश आवाजामुळे दिंडीतील वारकऱ्यांना भजन करताना त्रास जाणवत होता. सोहळ्यातील वारकऱ्यांना उपद्रव होऊ नये, यासाठी स्वागतकमानीतील ध्वनिक्षेपक बंद ठेवावे किंवा आवाजाचे प्रमाण मृदू असावे, अशी वारकऱ्यांची मागणी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT