Ashadhi Wari sakal
पुणे

Ashadhi Wari : इंदापूर-सराटी वाटचाल सत्वपरीक्षेची;तुकोबारायांच्या पादुकांना आज नीरास्नान

राजेंद्रकृष्ण कापसे

सराटी : संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या वाटचालीतील पुणे जिल्ह्यातील शेवटचे गाव असलेल्या सराटीमध्ये गुरुवारी सायंकाळी सोहळा मुक्कामी पोहोचला. इंदापूरचा मुक्काम उरकून सराटीपर्यंतची वाटचाल सत्वपरीक्षा घेणारी ठरली. २७ किलोमीटर अंतराचा टप्पा आणि अंगाची लाही लाही करणारे ऊन यामुळे वैष्णव घामाच्या धारांनी चिंब भिजले. सूर्य मावळतीला जाताना वरुणराजा केवळ हलकी हजेरी लावून गेला.

‘विठुराया तुझ्या दर्शनाला निघालो आहे, जास्त अंत न पाहता आपली भेट लवकर घडव’, अशी मनोमन आर्जव करीत सोहळा सराटीत पोचला. इंदापूर येथे सकाळी अभिषेक आणि पूजा झाल्यानंतर सोहळा मार्गस्थ झाला. पालखी महामार्गाचे काम अपूर्ण असल्याने सोहळ्यालाही वळण रस्त्याचा मार्ग धरावा लागला. गोकुळीचा ओढा, विठ्ठलवाडी, वडापुरीमार्गे सुरवड येथे पोचला. तिथे विठ्ठलभक्त शेरकरबाबा महाराज यांचे समाधी मंदिर आहे. तिथे पालखी रथ थांबला. संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांची आरती झाली. शेरकरबाबा परिवारातील भाविकांनी संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेतले. या मंदिर परिसरातील रस्ता अद्याप अरुंद आहे.

त्यामुळे, दिंड्या आणि वाहनांची दाटी झाली होती. वकील वस्तीमार्गे सोहळा बावडा येथे विसाव्याला पोहोचला. या दरम्यान, वडापुरी, सुरवड, बावडा परिसरातील शेतकऱ्यांनी शेती पंप सुरू करून वारकऱ्यांच्या अंघोळीसाठी आणि कपडे धुण्यासाठी पाण्याची व्यवस्था केली होती. ‘त्राहे त्राहे सोडवीं अनंता। लागों दे ममता तुझ पायीं॥’ अशी वारकऱ्यांची आर्जव होती. बावडा येथील वेशीवर उखळी तोफा उडवून स्वागत झाले. स्थानिक भजनी मंडळ आणि ग्रामस्थ‌ स्वागताला आले होते. त्यांनी पालखी खांद्यावर घेतली. आरती झाली त्यानंतर नैवेद्य दाखविण्यात आला. घरोघरी आणि शेताशिवारात वारकऱ्यांची जेवणे उरकली. संध्याकाळी पाच वाजता सोहळा सराटीकडे निघाला. ग्रामस्थांनी पालखी खांद्यावर घेऊन पुन्हा रथात नेऊन ठेवली. सातच्या सुमारास सोहळा सराटीत पोहोचला. समाज आरतीनंतर सोहळा विसावला. रात्री धोंडोपंत दादा दिंडीने कीर्तन आणि केसापुरीकर दिंडीने जागर केला.

पारा ३३ अंश सेल्सिअसवर

इंदापूर परिसरातील तापमान सुमारे ३३ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होते. इंदापूर ते सराटी दरम्यान रस्त्याला चढ आहे. पालखी महामार्ग करताना तो कमी करण्यात आला आहे. त्यामुळे काहीशी सोपी झालेली वाट सूर्याच्या प्रखरतेमुळे बिकट झाली होती. अंगाची लाहीलाही कधी संपते, असे झाले होते. विसावा घेताना वारकरी पटकन सावलीसाठी गारवा शोधत होते. शेतशिवारातील झाडाझुडपांचा आसरा घेत होते. ठिकठिकाणी पाणी वाटप केले जात होते. सरकारी तसेच युनियन बँकेच्या पाण्याच्या टँकरभोवती वारकऱ्यांची गर्दी होती.

अकलूजला आज गोल रिंगण

पुणे जिल्ह्यातील शेवटचा मुक्काम गुरुवारी सराटीत झाला. शुक्रवारी (ता. १२) सकाळी तुकोबारायांच्या पादुकांना नीरा स्नान घालण्यात येईल. त्यानंतर सोहळा सोलापूर जिल्ह्यात अकलूज येथे प्रवेश करेल. तेथील माने विद्यालयाच्या प्रांगणात सोहळ्यातील तिसरे गोल रिंगण होईल. त्यानंतर पालखी मुक्कामासाठी विसावणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT