ashadi wari 2023 setu wari twelve warkari from California participated in Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi sohala  sakal
पुणे

Ashadi Wari 2023 : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात कॅलिफोर्नियातील बारा वारकऱ्यांचा सहभाग

भौतिकतेतून आध्यात्मिकतेची ‘सेतू’ वारी

शंकर टेमघरे -सकाळ वृत्तसेवा

पुणे : ते मूळचे महाराष्ट्रातील. पण, उद्योग-व्यवसायानिमित्त अमेरिकेतील कॅलिफोर्नियात स्थायिक झालेले. भौतिक प्रगती साधताना आस मात्र अध्यात्माचीही होती. त्यातून स्फूर्ती घ्यायची होती. देहू व आळंदीहून पंढरपूरला आषाढी वारीनिमित्त पायी जाणाऱ्या वारकऱ्यांसारखी. चालण्याची सवय होण्यासाठी त्यांनी ‘सेतू वारी’ सुरू केली. दररोज चालण्याचा सराव केला.

वारीसाठी मानसिक व शारीरिक साधना केली आणि त्यांची पावले आळंदीकडे वळली. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासोबत पुण्यापर्यंतचा पहिला टप्पा त्यांनी पूर्ण केला. विज्ञानातून भौतिक प्रगती साधल्यानंतर आध्यात्मिक स्फूर्तीचा शोध घेण्यासाठी त्यांनी आता विठ्ठलभेटीचा ध्यास घेतला आहे.

पंढरीच्या सावळ्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी आषाढीवारीला निघाले आहेत. त्यात कॅलिफोर्नियामध्ये उद्योग व्यवसायात स्थिरस्थावर झालेले बारा जणांचा समावेश आहे. त्यातील सहा जणांची स्वतःची कंपनी आहे. काही उच्चपदस्थ अधिकारी आहेत. यात सहा महिलाही आहेत.

पंढरीच्या वारीसाठी पायी चालण्यासाठीची मानसिक व शारीरिक साधना पूर्ण करून भक्तीची गोडी चाखण्यासाठी त्यांनी थेट पंढरीची वाट धरली आहे. आळंदी ते पुणे वाटचालीत त्यांना भक्तीच्या शक्तीची प्रचीती आली आहे.

वारीसाठी मानसिक तयारी

विजय उत्तरवार आणि स्मिता उत्तरवार, नितीन पाटील आणि वृषाली पाटील हे दांपत्य सहा वर्षांपूर्वी आळंदी ते पुणे वारीत चालले. उत्तरवार यांचे बंधू उद्योजक मोहन उत्तरवार यांचीही तेव्हापासूनची इच्छा होती. ती आता पूर्ण होत आहे. त्यासाठी त्यांचा जानेवारी महिन्यात वारीत सहभागी होण्याचा निर्णय झाला.

त्यांना मित्र परिवारातील बारा जणांची साथ मिळाली. त्यांनी ‘सेतू वारी’ नावाने गट तयार केला. ‘आयुष्यातील सर्व गोष्टी विठ्ठलावर सोपवून लाखो भाविक इतके दिवस एकत्र कसे राहू शकतात आणि त्यांचा विठोबा ते कशात पाहतात,’ याची अनुभूती घेण्यासाठी ते वारीत सहभागी झाले आहेत.

शारीरिक तयारी

वारीमध्ये जाण्यासाठी चालायची सवय हवी, म्हणून सर्वांनी दर शनिवार व रविवारी कॅलिफोर्नियातील एका मंदिरापासून दुसऱ्या मंदिरापर्यंतचा मार्ग ठरवला. कधी पाच, तर कधी अकरा; वीस तर कधी ३२ किलोमीटर चालून आपली क्षमता वाढवली. वारीला जाण्याचा निर्णय झाला. सर्वजण आरती, प्रार्थना, हरिपाठ, अभंग म्हणू लागले.

अभंगवाणीचे कार्यक्रम करू लागले. त्यातून अध्यात्माची गोडी अधिकच वाढू लागली. ज्ञानेश्वरी वाचन सुरू केले. तसेच, वारी संस्कृती पाश्चिमात्य देशात रुजावी, आषाढी वारीला जे महाराष्ट्रात येऊ शकत नाहीत, त्यांच्यासाठी बे एरिया महाराष्ट्रीय मंडळाचे प्रमुख भास्कर रानडे आणि वीणा उत्तरवार यांनी दहा जून रोजी सिलिकॉन व्हॅली परिसरात ‘विठोबा वारी’ सुरू केली.

येथे सुमारे चारशे वारकरी अकरा किलोमीटर अंतर दर शनिवार-रविवारी चालत असून हा उपक्रम आषाढीपर्यंत सुरू राहणार आहे. त्यातीलच बारा जण प्रत्यक्ष संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सहभागी झाले आहेत.

आध्यत्मिक प्रवास...

संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यात जायचा निर्णय झाल्यानंतर मुंबईत राहणारे नातेवाईक नितीन पाटील आणि प्रशांत खडके यांनी आळंदी ते पंढरपूर या वाटचालीची पाहणी करून मुक्कामाची व्यवस्था केली. प्रस्थानाच्या दिवशी आळंदीतील मंदिरात दाखल झाल्यानंतर तेथील लाखो वारकऱ्यांना पाहून, त्यांची विठ्ठलाप्रती भक्ती पाहून सर्वांची वारीविषयीची उत्सुकता शिगेला पोचली. वारीत चालताना काय करायचे व पाहायचे आहे, याचे निरीक्षण केले. वारी पूर्ण करण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. त्यांना आस आहे ती विठ्ठलाच्या भक्तीची.

यांचा सहभाग

मोहन उत्तरवार, स्मिता उत्तरवार, राजीव पुराणिक, मनिषा पुराणिक, मनोज बेटावर, निलिमा उत्तरवार, विजय देशपांडे, मृदुला रथकंठिवार, आशुतोष कापूसकर, प्रशांत खडके, माया भोगवार, विजय उत्तरवार

वीस वर्षांपूर्वी एका यशस्वी उद्योजकाला विचारले होते, ‘तुम्ही स्ट्रेस मॅनेजमेंट कसे करता?’ त्यावेळी त्यांनी सांगितले की, वर्षातील ४९ आठवडे आपले जीवन जगावे आणि तीन आठवडे विठ्ठलाची वारी केल्यास तुमचा तणाव कमी होतो. त्याचे कारण एका ध्येयाने विठ्ठलाकडे जाताना सर्व गोष्टींचा आपोआपच विसर पडतो. भाव एका विठ्ठलावर समर्पित होतो आणि ताण कमी होऊन जीवन स्फूर्तिदायक होते. त्यांच्या या अनुभवाने आम्हाला पंढरीच्या वारीची ओढ लागली.

- मोहन उत्तरवार, उद्योजक, कॅलिफोर्निया, अमेरिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election 2024: भाजपची निवडणूकपूर्व तयारी, राज्यातील सर्व २५ हेलिकॉप्टर केले बुक! महाविकास आघाडीचा प्रचार कसा होणार?

Court Historic Verdict: देशातील अशी पहिलीच घटना... न्यायालयाने 98 जणांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा! नेमकं काय घडलं होतं?

David Warner याची चेंडू छेडछाड प्रकरणातील मोठी शिक्षा रद्द; आता होणार कर्णधार?

Latest Maharashtra News Updates : 'परिवर्तन महाशक्ती'च्या आणखी २८ जागांची निश्चिती; स्वराज्य पक्ष, प्रहार पक्ष आजच आपल्या उमेदवारांच्या नावाची करणार घोषणा

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

SCROLL FOR NEXT