पुणे : संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा सोहळा लाइव्ह अनुभवता यावा याकरिता जीपीएसद्वारे पालखी ट्रॅकिंग सुविधा उपलब्ध केली आहे. त्यामुळे यावर्षी पहिल्यांदा दोन्ही पालख्यांची अपडेट जीपीएसव्दारे मिळणार आहे.
आळंदी येथून ज्ञानेश्वर महाराज आणि देहूमधून संत तुकाराम महाराज पालखी सोहळा १२ जून रोजी पुण्यात दाखल होणार आहे. या दोन्ही पालखी सोहळ्याची माहिती तत्काळ मिळण्यासाठी जीपीएस प्रणालीचा वापर केला जाणार आहे,
अशी माहिती पुणे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत शनिवारी (ता. १०) दिली आहे. सहआयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त (गुन्हे शाखा) अमोल झेंडे आणि वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यावेळी उपस्थित होते.
पुणे पोलिसांनी तयार केलेल्या diversion.punepolice.gov.in या संकेतस्थळावर नागरिक पालखी सोहळा आणि वाहतूक मार्गातील बदलाची माहिती घेऊ शकतात. पालखीचे लाइव्ह लोकेशन मिळण्यासाठी दोन्ही पालख्यांबरोबर चार दुचाकी ठेवण्यात येणार असून त्यावर जीपीएस यंत्रणा बसविण्यात आलेली आहे.
त्याद्वारे वाहतुकीचे नियोजन तसेच पालखी मार्गावरील संभाव्य बंदोबस्त नियोजन अधिक सुलभ होणार असून पालखीच्या ठिकाणाची बंदोबस्तावरील सर्व अधिकारी, कर्मचारी व नियंत्रण कक्ष यांना तत्काळ माहिती उपलब्ध होणार आहे.
बंद व खुले असलेल्या रस्त्यांची माहितीही मिळणार :
बंद असलेले रस्ते, वाहतुकीसाठी खुले असलेले रस्ते, पालखीचा मुक्काम याची माहिती नागरिकांना संकेतस्थळाद्वारे मिळणार आहे. त्यामुळे वाहतूक व दैनंदिन जीवनातील कामे सुरळीत होण्यास मदत होईल. तसेच एसएसपीएमएस कॉलेज मैदान, सिंचननगर, रेसकोर्स या ठिकाणी दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी व पालखीतील वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था केलेली आहे. पार्किंग ठिकाणे या संकेतस्थळावर दर्शविण्यात आलेली आहे.
पालखी लाखो वारकरी सहभागी होतात. तसेच पालखी कुठे आली याची अनेकांनी उत्सुकता असते. त्यामुळे पालखी मार्गाची सर्व माहिती नागरिकांसह वाहनचालकांना मिळावी यासाठी पुणे पोलिसांनी खास वेबपेज diversion.punepolice.gov.in तयार केले आहे. त्यामुळे नागरीकांना आणि वाहनचालकांना मोबाईलसह, लॅपटॉपव्दारे एका क्लिकवर सर्व पालखी अपडेट मिळणार आहे. पालखी प्रस्थान दरम्यान होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी संकेतस्थळाचा उपयोग होणार आहे.
- रितेश कुमार, पोलिस आयुक्त
वारीत सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांकडून खबरदारी
पालखीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असलेली खबरदारी पोलिसांकडून घेण्यात आली आहे. त्यासाठीचे नियोजन देखील करण्यात आले आहे. ड्रोन, वॉकीटॉकी आणि जीपीएस वापर सुरक्षेच्या दृष्टीने केला जाणार आहे.
पालखीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार होवू नये, यासाठी घेण्यात आलेल्या खबरदारीची माहिती पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी शनिवारी दिली.
गर्दी झाल्यानंतर नेटवर्क जाम होत असल्याचे प्रकार घडतात. त्यामुळे पोलिसांना वॉकीटॉकी देण्यात येणार आहे. सहआयुक्त, चार अतिरिक्त पोलिस आयुक्त, १० पोलिस उपायुक्त, पोलिस कर्मचारी, होमगार्ड आणि सीआरपीएफ असआरपीफ असा सात हजार पोलिसांचा बंदोबस्त पालखी दरम्यान असणार आहे. पालखी पुण्यात असताना मेट्रोचे काम बंद राहणार असून रस्ते टप्प्याटप्प्याने बंद व खुले करण्यात येणार आहे, असे कुमार यांनी सांगितले.
जी २० च्या पथकासाठी स्वतंत्र मंडप :
जी २० चे पथक पालखीचे दर्शन घेण्यासाठी येणार आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी नामदार गोपाळ कृष्ण गोखले पथावर (फग्युर्सन रस्ता) स्वतंत्रपणे मंडपाची व्यवस्था करण्यात आली आहे. फर्ग्युसन कॉलेजच्या प्रवेशद्वाराजवळ हा मंडप असेल.
सुरक्षिततेच्या कारणास्तव याठिकाणी अन्य नागरिकांना प्रवेश दिला जाणार नाही. आज या जागेची संयुक्त पाहणी करण्यात आल्याची माहिती कुमार यांनी दिली.
चोरट्यांवर नजर
वारीमध्ये सोनसाखळी चोर आणि पाकीटमारांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी पुणे, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण पोलिसांची संयुक्त पथके तयार करण्यात आली आहे. तसेच साध्या वेशातील पुरुष आणि महिला कर्मचारी देखील वारीमध्ये असतील. वारी दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, तसेच शांतता व सुव्यवस्था राहावी यासाठी सर्वतोपरी खबरदारी घेण्यात आली आहे, अशी माहिती सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.