औंध - चोरी करण्याच्या उद्देशाने लोखंडी रॉडने केलेल्या मारहाणीत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. औंधमधील वेस्ट एंड चौकाजवळ गुरुवारी (ता. १३) पहाटे ही घटना घडली. याप्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून चौघांना ताब्यात घेतले आहे. यापैकी तीन जण अल्पवयीन आहेत.
समीर रॉयचौधरी (वय ७७, रा. सायली गार्डन, औंध) असे मारहाणीत मरण पावलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. याप्रकरणी श्रेयस शेट्टी यांनी फिर्याद दाखल केली आहे. या टोळक्याने रॉय चौधरी यांना मारहाण करून सतीश श्रेयस शेट्टी (वय ३०, रा. अश्विनी सोसायटी, औंध रस्ता), रामसोबीत कुमार ठकू मंडल(वय ३८, रामंगलम कन्स्ट्रक्शन, औंध) या दोघांनाही मारहाण केली होती.
रिक्षा व दुचाकीवर आलेल्या सहा जणांनी केलेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या रॉय यांचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. याप्रकरणी औंध येथे शनिवारी (ता. १५) नागरिकांनी ॲड. मधुकर मुसळे व अर्चना मुसळे यांच्या नेतृत्वाखाली पुर्वीका मोबाईल शॉपी ते घटना घडली.
त्या वेस्टएंड चौकापर्यंत कॅंडल मार्च काढून रॉयचौधरी यांना श्रद्धांजली अर्पण केली. या कॅंडल मार्चला मृत रॉयचौधरी यांचे कुटुंबीय उपस्थित होते. यावेळी औंध परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेसंदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आला. तसेच नागरिकांच्या सुरक्षेची हमी द्या, पोलिस यंत्रणा झोपली आहे का, अशा आशयाचे फलक हातात घेऊन नागरीकांनी पोलिस प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला.
मी नियमीत वेस्टएंड चौकात वर्तमानपत्र विक्री करतो. गुरुवारी पहाटे सव्वापाच वाजता सहाजण चौकात आल्याचे दिसून आले. रिक्षात मोठ्या आवाजात स्पिकरवर गाणे लावून वाद चालू असल्याचे मला जाणवले. आधी मला वाटले त्यांच्यातच काही तरी वाद चालू आहे. परंतु साडेपाच वाजता माझ्या लक्षात आले की काहीतरी घडले म्हणून बघायला गेलो तर रोज वर्तमानपत्र घेऊन जाणारे समीर रॉयचौधरी हे जखमी अवस्थेत असल्याचे मी लगेच ओळखले. त्यांच्या घरी कळवून त्यांना रिक्षातून रुग्णालयात दाखल केले. परंतु रॉय यांचा मृत्यू झाला हे मनाला चटका लावून जाणारे असून हकनाक बळी गेल्याची घटना दुर्दैवी आहे.
- अविनाश नेवसे, वृत्तपत्र विक्रेते, औंध
औंधमध्ये भितीचे वातावरण
पहाटे मारहाण करून चोरीच्या घटना नेहमीच घडतात परंतु कटकट नको म्हणून अनेकजण पोलिसांकडे याची तक्रार करत नाहीत. मेडीपॉइंट ते ॲलोमा काउंटी, नागरस रस्ता, महादजी शिंदे रस्ता, सानेवाडी, ब्रेमेन चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक यादरम्यान पहाटे चालायला जाणाऱ्यांमध्ये या घटनेमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे.
वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची बदली
चोरट्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याप्रकरणाची गंभीर दखल पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी घेतली आहे. याप्रकरणी चतुःशृंगी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय कुलकर्णी यांची पोलिस नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.