बारामती : लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाल्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघातील वातावरण चांगलेच तापले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्यासाठी पवार कुटुंबिय मैदानात उतरले असून या बाबत सोशल मिडीयावर व्हायरल होणारा फोटो चर्चेचा विषय आहे. या फोटोमध्ये पवार कुटुंबियातील सुप्रिया सुळे यांच्यासह राजेंद्र पवार, सुनंदा पवार, श्रीनिवास पवार, शर्मिला पवार, रोहित पवार व युगेंद्र पवार हे एकत्र दिसत दिसत आहे .
"वट वृक्ष पालवी फोडत असतो, कोणाच्या जाण्याने कोणाचं काही अडत नसतं" असा मजकूर या फोटोवर टाकून तो फिरवला जात आहे.
अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी रविवारी (ता. 17) रात्री काटेवाडीमध्ये एका छोट्या सभेत बोलताना अजित पवार यांच्या विरोधात भूमिका घेत असून भाजपसोबत जाणे व शरद पवार यांना डावलण्याची अजितदादांची भूमिका मान्य नसल्याचे उघडपणे सांगितले. त्यांच्या सभेतील भाषण बारामती परिसरात आज चर्चेचा विषय होता, त्या सोबतच पवार कुटुंबियाचा एकत्र फोटोही तितकाच चर्चेत होता.
अजित पवार यांनी बारामतीतील व्यापाऱ्यांच्या मेळाव्यातच आपण कुटुंबात एकटे पडणार असल्याचे नमूद केले होते, त्या वेळेस अजित पवार हेच भावनिक आवाहन करत असल्याची चर्चा झाली होती, आता मात्र प्रत्यक्षात सगळे कुटुंबिय एका बाजूला तर अजित पवार यांचे कुटुंब दुस-या बाजूला असे चित्र पाहायला मिळत आहे.
प्रत्यक्ष प्रचारापेक्षाही सोशल मिडीयावर परस्परांना चिमटे काढणा-या पोस्ट निष्ठावंत कार्यकर्त्यांकडून फिरविल्या जात असल्याने बारामतीत कोठेही गेले तरी फक्त पुढे नेमके काय होणार हीच चर्चा सुरु आहे.
बारामती मतदारसंघात पवार कुटुंबात फूट पडल्याचे चित्र असले तरी प्रत्यक्षात बारामतीतील प्रत्येक कुटुंबात देखील मतभिन्नता व मतभेद पाहायला मिळतात. एकाच कुटुंबातील आजोबा आजींचा विचार वेगळा तर आई वडीलांचा वेगळा, नवमतदारांची भावना तिसरीच आहे तर महिलांचा विचारही काहीसा वेगळा असे चित्र आहे. कुटुंबातही शरद पवार बरोबर की अजित पवारांची भूमिका योग्य या वरुन दररोज वादविवाद होताना पाहायला मिळत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.