बारामती (पुणे) : तालुका पोलिसांनी एका भांडणातील आरोपीच्या तपासावरुन धागेदोरे जुळवत तब्बल एक डझन विनापरवाना पिस्तूल जप्त करण्याची मोठी कामगिरी केली. शहरातील संदीप कॉर्नरनजिक एका हॉटेल चालकाला मारहाण करुन फरारी झालेल्या आरोपींचा शोध घेताना पोलिसांना एका संशयिताकडून बेकायदा पिस्तूलाची माहिती मिळाली. त्यावरुन तालुका पोलिसांनी खोलवर जाऊन तपास करत तब्बल बारा पिस्तूले, वीस जिवंत काडतूसे जप्त करुन 11 जणांना अटक केली.
मध्यप्रदेशमधून पिस्तूले महाराष्ट्रात आणून विक्री करणारी एक मोठी साखळीच या निमित्ताने उजेडात आली आहे. या प्रकरणात आणखी काही पिस्तूले मिळण्याची शक्यता अतिरिक्त पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते आणि उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी बोलून दाखवली.
पोलिस निरिक्षक महेश ढवाण, सहायक पोलिस निरिक्षक योगेश लंगुटे, पोलिस हवालदार दादा ठोंबरे, पोलिस कर्मचारी नंदू जाधव, राहुल पांढरे, विजय वाघमोडे, मंगेश कांबळे, विनोद लोखंडे, दत्तात्रय मदने यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
पहिल्या टप्प्यात सात पिस्तूल हस्तगत केल्यानंतर पुन्हा सखोल तपास केल्यानंतर तालुका पोलिसांनी हनुमंत अशोक गोलास (रा. जवळवाडी, ता. कासार, ता. पाथर्डी, जि. नगर), अल्ताफ सज्जद पठाण (रा. नाईकवाडी, ता. शेवगाव, जि. नगर), संतोष प्रभाकर कौटुंबे (रा. मारवाड गल्ली, शेवगाव, जि. नगर), जफर अन्सार इनामदार (रा. नाईकवाडी मोहल्ला, शेवगाव, जि. नगर), जावेद मुनीर सय्यद (रा. आखेगाव रोड, भापकर वस्ती, शेवगाव, जि. नगर) या पाच जणांना अटक केली. त्यांच्याकडून पाच पिस्तूले आणि दहा जिवंत काडतूसे जप्त करण्यात आली आहेत.
क्रेझमुळे वाढतेय पिस्तूलांचे प्रमाण
कमरेला पिस्तूल आहे ही क्रेझ निर्माण झाली असून केवळ लोकांना माझ्याकडे पिस्तूल आहे हे दाखविण्यासाठी पिस्तूलांची सर्रास खरेदी होते आहे. विनापरवाना शस्त्र बाळगणे गुन्हा असून पोलिस त्या विरुध्द कडक कारवाई करीत आहेत, असे मिलिंद मोहिते यांनी सांगितले. एक पिस्तूल वीस हजारांपर्यत तर एक काडतूस पाच हजारांना महाराष्ट्रातील लोक खरेदी करत आहेत. मध्यप्रदेशमध्ये हे थेट कनेक्शन असून तेथे अशी पिस्तूले बनविणारे अनेक अवैध कारखानेच असल्याची धक्कादायक माहिती मोहिते यांनी दिली.
माहिती द्या
अवैध पिस्तूलांसह इतर शस्त्रे कोणी बाळगल्याची माहिती असल्यास ती त्वरित पोलिसांना द्यावी, माहिती देणाराचे नाव गोपनीय ठेवले जाईल व त्याला पारितोषिकही दिले जाईल, असेही मिलिंद मोहिते म्हणाले.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by: Ashish N. Kadam)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.