लहानपणापासून पोलीस अधिकारी बनण्याचे स्वप्न अखेर खो-खो खेळामुळे साकार झाले. आंबेगाव तालुक्यातील जाधववाडी येथील शेतकरी कुटुंबातील राष्ट्रीय खो-खो खेळाडू भाग्यश्री जगन्नाथ जाधव हिने पीएसआय पदाला गवसणी घातली असून खो-खो खेळातून पदके तर मिळवली, परंतु आता गुन्हेगारांवर वचक पाहायला मिळणार आहे.
आंबेगाव तालुक्यातील जाधववाडी येथील भाग्यश्री जगन्नाथ जाधव हिने जिद्द चिकाटी आणि अभ्यासाच्या जोरावर पोलीस उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न साकार केले आहे. त्यामुळे सर्व स्तरातून तिचे कौतुक होत आहे. भाग्यश्रीचे वडील सीआयएसएफ आर्मीमध्ये होते. त्यामुळे भाग्यश्री हिला लहानपणापासूनच वर्दीची आवड होती.
त्यामुळे देश सेवेसाठी एक पोलीस अधिकारी होण्याचे स्वप्न तिने मनाशी बाळगलं होतं. ती एक राष्ट्रीय खो-खो खेळाडू असून तिने रांजणी येथील नरसिंह क्रीडा मंडळाच्या माध्यमातून खेळताना दोन राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावली आहेत. तसेच नऊ राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावण्याची कामगिरी केली आहे.
भाग्यश्रीचे प्राथमिक शिक्षण जाधववाडी आपल्या गावातच पूर्ण झाले. त्यानंतर इयत्ता पाचवीसाठी तिने रयत शिक्षण संस्थेचा नरसिंह विद्यालय रांजणी येथे प्रवेश घेतला. त्यावेळी तिला खो-खो विषयी काहीच माहिती नव्हती. परंतु खो-खो खेळाडूंच्या सानिध्यात राहून आणि खो-खो प्रशिक्षक संदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनामुळे खो-खो खेळात राष्ट्रीय, राज्यस्तरीय स्पर्धेत अनेक पदके पटकावली.
बारावीनंतर पुढील शिक्षणासाठी पुणे या ठिकाणी गेल्यानंतर एमपीएससीचा चांगला अभ्यास केला आणि तिच्या प्रयत्नाला यश आले. आणि पहिल्या परीक्षेतच तिला २५५ गुण मिळुन तिची खेळाडू कोट्यातून पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली, तिच्या निवडीमुळे सर्व परिसरातून कौतुक होत आहे.
भाग्यश्री जाधव ही शेतकरी कुटुंबातील असून तिचे आई-वडील सध्या शेती व्यवसाय करतात. अशा शेतकरी कुटुंबातील कन्या पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत असून जाधववाडी ग्रामस्थ, रांजणी ग्रामस्थ, नरसिंह क्रीडा मंडळ, नरसिंह विद्यालय यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
भाग्यश्री जाधव म्हणाली की, पोलिस अधिकारी होण्याचं स्वप्न मनाशी बाळगले होते. यासाठी केलेला अभ्यास आणि खो-खो खेळामुळे माझे पोलीस उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न मी सत्यात उतरू शकले. याचे सर्व श्रेय खो-खो खेळातील सातत्य, माझे कुटुंबीय आणि मार्गदर्शक क्रीडा शिक्षक संदीप चव्हाण यांना जाते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.