यंदाच्या पावसाळ्यातील हा पहिलाच पाऊस असताना पुणे महापालिकेने केलेल्या रस्त्याच्या कामाची पोलखोल झाली आहे.
पुणे - आधीच निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांची चाळण झालेली असताना आता त्यात चुकीच्या पद्धतीने सांडपाणी आणि पावसाळी गटाराच्या चुकीच्या कामामुळे पुणेकरांचे कंबरडे मोडण्याची वेळ आली आहे. रस्त्याला समपातळीत चेंबर नसल्याने धक्के तर बसत आहेतच, पण चेंबरचे झाकण तुटणे, भोवती खड्डे पडणे हे प्रकार वारंवार घडत आहे. यासाठी दरवर्षी सुमारे १० कोटी रुपयांचा खर्च केला जात आहे.
यंदाच्या पावसाळ्यातील हा पहिलाच पाऊस असताना महापालिकेने केलेल्या रस्त्याच्या कामाची पोलखोल झाली आहे. जुना रस्ता असो किंवा अवघ्या काही आठवड्यांपूर्वी केलेला रस्ता असो या सर्वच डांबरी रस्त्यांवर खड्डे पडल्याने अक्षरशः रस्त्यांची चाळण झालेली आहे. एकामागे एक सलग खड्डे असल्याने वाहनचालकांची तारांबळ उडत आहे. पाठीला हादरे बसून त्याचाही त्रास होत आहे. निकृष्ट दर्जाच्या रस्त्यामुळे त्रास होत असताना आता ज्या ठिकाणी रस्ते चांगले आहेत, तेथे सांडपाणी व पावसाळी गटारांच्या चेंबरने रस्त्यांची वाट लावली आहे.
महापालिकेकडून शहराच्या विविध भागात मुख्य रस्त्यांसह गल्लीबोळातील रस्त्यांवर खोदकाम करून सांडपाणी व पावसाळी गटारांचे काम केले आहे. या गटारांचे भूमिगत पाइप साफ करता यावेत, यासाठी ठराविक अंतरावर चेंबर तयार करून त्यावर झाकण लावले जाते. हे चेंबर तयार करताना रस्त्याला समपातळी असणे गरजेचे आहे. पण, पथ विभाग आणि मलःनिसारण विभाग यांच्यात समन्वय नसल्याने शहरात ठिकठिकाणी हे चेंबर एक तर रस्त्यापेक्षा खाली आहेत किंवा रस्त्याच्या पातळीपेक्षा वर आहेत.
महापालिकेकडून डांबरीकरण केल्यानंतर चेंबरचेही काम करणे आवश्यक असते, पण त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांनी प्रचंड त्रास सहन करावा लागतो.
चेंबर समपातळीला नसल्याने ते धोकादायक असल्याने पावसाळ्यापूर्वीच रस्त्यांच्या मध्ये असलेले चेंबर समपातळीला आणण्याचे आदेश दिलेले होते. हे काम किती केले आहे, त्याचा आढावा घेतला जाईल. चेंबर खराब होण्याचे कारण, त्याचा दर्जा आहे का? हे देखील तपासले जाईल.
- डॉ. कुणाल खेमणार, अतिरिक्त आयुक्त, महापालिका
पुण्यातील सर्वच लहान-मोठ्या रस्त्यांवर चेंबरचे खड्डे आहेत. रात्री तर हे चेंबरचे खड्डे दिसतही नाहीत. त्यामुळे गाडी आदळून धक्के बसत आहेत. हा त्रास कमी करण्यासाठी महापालिकेने रस्ते व चेंबर लेव्हलमध्ये आणले पाहिजेत.
- पूजा शिंदे
झाकणे कमकुवत असल्याने तुटण्याचे प्रमाण वाढले
चेंबर तयार करताना वाहतुकीचा ताण सहन करण्याची क्षमता त्यामध्ये असली पाहिजे. पण रस्त्याच्या कडेने सांडपाणी व पावसाळी वाहिनी न टाकता ती मध्यभागी टाकल्याने वरून टँकर, डांबर, पीएमपी बससारखे अवजड वाहने जात आहेत. त्यामुळे चेंबर खचणे, झाकण तुटणे असे प्रकार होत आहेत. त्यानंतर याच्या दुरुस्तीसाठी चार-पाच दिवस वाट पाहावी लागत असल्याने वाहतुकीचा खोळंबा होत आहे.
चेंबरच्या बाजूनेच खड्डे
चेंबरच्या बाजूने मुरूम व डांबर टाकून व्यवस्थित दबाई केली जात नसल्याने चेंबरच्या बाजूने खड्डे पडले आहेत. त्यात पावसाचे पाणी जमा होत असल्याने अपघात होत आहेत. पण महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. धायरी येथील गणेश मळा येथे पाच महिन्यांत एका चेंबरचे झाकण १० वेळा तुटल्याचा प्रकार घडला आहे.
रोज चार ते पाच तक्रारी
प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयासाठी रोड मेन्टेनन्स व्हॅन (आरएमव्ही) आहे. या गाडीवरील कर्मचाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर रोज किमान चार ते पाच चेंबर खचल्याची, झाकण तुटल्याची तक्रार आहे. सिमेंटचे झाकण तकलादू येत आहेत. पूर्वी दिवसातून एखाद दुसरी तक्रार येत होती, असे सांगितले.
१ लाख २० हजार - सांडपाणी गटारांच्या चेंबरची संख्या
३१ हजार - पावसाळी गटारांच्या चेंबरची संख्या
६५ लाख - प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयासाठी तरतूद
तुमच्या भागात काय स्थिती...
रस्त्याला समपातळीत चेंबर नसल्याने धक्के बसत आहेत. त्यातच चेंबरचे झाकण तुटणे, भोवती खड्डे पडणे हे प्रकार वारंवार घडत आहे. अशीच परिस्थिती आपल्याही भागात आहे का? याबाबत आपल्या प्रतिक्रिया नावासह editor.pune@esakal.com या मेलवर किंवा ८४८४९७३६०२ या व्हॉट्सॲप क्रमांकावर कळवा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.