डोर्लेवाडी (बारामती) : माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त डोर्लेवाडी (ता.बारामती) येथे आयोजित केलेल्या महारक्तदान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात विक्रमी ८८१ बाटल्यांचे संकलन करण्यात आले. राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी जनतेला रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार अक्षय ब्लड बँक पुणे, डोर्लेवाडी ग्रामस्थ आणि २० सार्वजनिक तरुण मंडळांच्या वतीने 'महारक्तदान' शिबिराचे आयोजन शुक्रवारी (ता.११) करण्यात आले होते.
या शिबिराचे उद्घाटन राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक संतोष झगडे यांच्या हस्ते झाले. यावेळी बारामतीचे उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के, पुण्याचे उद्योजक दशरथ जाधव, विद्या प्रतिष्ठानचे विश्वस्त किरण गुजर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते, बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी होळकर, तहसीलदार विजय पाटील, माढाचे तहसीलदार राजेश चव्हाण, जिल्हा परिषद सदस्या मीनाक्षी तावरे, पंचायत समिती सदस्य राहुल झारगड, बारामती शहर पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे, बारामती ग्रामीण पोलिस स्टेशन निरीक्षक महेश चव्हाण, सरपंच बाळासाहेब सरवदे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळपासूनच नागरिकांचा या रक्तदान शिबिरास मोठ्या प्रमाणात उत्साह होता. दुपारपर्यंत डोर्लेवाडीसह परिसरातील बारामती, सोनगाव, काटेवाडी, पिंपळी, झारगडवाडी, गुणवडी येथील तरुणांनी रक्तदान करण्यासाठी रांगा लावल्या होत्या. सायंकाळी सहा वाजेपर्यंत ८८१ बाटल्यांचे संकलन झाले होते. संभाजी होळकर, किरण गुजर, दादासाहेब कांबळे यांची यावेळी भाषणे झाली. डोर्लेवाडीसारख्या ग्रामीण भागात ग्रामस्थ आणि तरुण मंडळांनी एकत्र येऊन राबविलेला महारक्तदान शिबिराचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे मत राज्य उत्पादन शुल्क पुणे जिल्हा अधीक्षक संतोष झगडे यांनी व्यक्त केले. सोमनाथ भिले यांनी प्रास्ताविक केले. कुमार देवकाते यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. अंकुश खोत यांनी आभार मानले.
पोलीस अधिकाऱ्यांनी केले रक्तदान
दरम्यान उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांचाही शुक्रवारी वाढदिवस होता. त्यांनीही आपला वाढदिवस रक्तदान करून साजरा केला. तसेच राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक संतोष झगडे, त्यांच्या विभागातील १० अधिकाऱ्यांनी आणि बारामती पोलिस स्टेशनच्या १५ कर्मचाऱ्यांनी या शिबिरात रक्तदान केले.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by : Ashish N. Kadam)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.