बारामती : महावितरणच्या घरगुती वर्गवारीतील ग्राहकांसाठी (घरगुती, गृहनिर्माण रहिवासी संस्था व निवासी कल्याणकारी संघटना) छतावरील (रुफटॉप) सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणा बसविण्यासाठी केंद्र शासनाकडून 40 टक्क्यांपर्यंत अनुदान मिळणार आहे. सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणेमुळे मासिक घरगुती वीजबिलात मोठी बचत होणार आहे तर नेटमिटरिंगद्वारे महावितरणकडून वर्षाअखेर शिल्लक वीज देखील विकत घेतली जाणार आहे.
या योजनेसंदर्भात महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी काल आढावा घेत घरगुती वर्गवारीतील ग्राहकांना या योजनेचा लाभ देण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांनी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
केंद्राच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या रुफटॉप सौर योजना टप्पा दोन अंतर्गत महावितरणसाठी 25 मेगावॉटचे उद्दिष्ट मंजूर झाले आहे. या योजनेमधून घरगुती वर्गवारीतील ग्राहकांना किमान एक किलोवॅट क्षमतेची छतावरील (रुफटॉप) सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणा बसविण्यासाठी केंद्र शासनाकडून वित्त सहाय्य देण्यात येणार आहे. यात घरगुती ग्राहकांसाठी एक ते तीन किलोवॅटपर्यंत 40 टक्के आणि तीन किलोवॅटपेक्षा अधिक ते दहा किलोवॅटपर्यंत 20 टक्के अनुदान देण्यात येणार आहे. तसेच सामुहिक वापरासाठी 500 किलोवॅटपर्यंत परंतु प्रत्येक घरासाठी 10 किलोवॅट मर्यादेसह गृहनिर्माण रहिवासी संस्था (Group Housing Society) व निवासी कल्याणकारी संघटना (Residential Welfare Association) ग्राहकांना 20 टक्के अनुदान मिळणार आहे.
महावितरणने रुफटॉप सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणा आस्थापित करण्यासाठी परिमंडलनिहाय एजंन्सीजची नियुक्ती केली आहे. त्याची यादी व ऑनलाईन अर्जाची सोय महावितरणच्या www.mahadiscom.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. पाच वर्षांच्या देखभाल खर्चासह रुफटॉप सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणेसाठी १ किलोवॅट– 46820, एक ते दोन किलोवॅट- 42470, दोन ते तीन किलोवॅट- 41380, तीन ते दहा किलोवॅट- 40290 तसेच दहा ते शंभर किलोवॅटसाठी 37020 रुपये प्रति किलोवॅट किंमत जाहीर करण्यात आली आहे.
या मध्ये या दराप्रमाणे तीन किलोवॅट क्षमतेसाठी सौर ऊर्जा यंत्रणेची एक लाख 24 हजार 140 रुपये किंमत राहील. त्यामध्ये 40 टक्के अनुदानाप्रमाणे 49656 रुपयांचे केंद्रीय वित्त सहाय्य मिळेल व संबंधीत ग्राहकास प्रत्यक्षात 74484 रुपयांचा खर्च करावा लागेल.
रुफटॉप सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणा कार्यान्वित केल्यानंतर दरमहा 100 युनिटपर्यंत वापर असलेल्या घरगुती ग्राहकांकडील एक किलोवॅट क्षमतेच्या सौर यंत्रणेमधून वीजबिलामध्ये सध्याच्या वीजदरानुसार दरमहा सुमारे 550 रुपयांची बचत होऊ शकेल. तसेच या यंत्रणेला लावण्यात आलेल्या नेटमिटरिंगद्वारे वर्षाअखेर शिल्लक वीज प्रतियुनिटप्रमाणे महावितरणकडून विकत घेतली जाईल. त्याचाही आर्थिक फायदा संबंधीत घरगुती ग्राहकांना होणार आहे. सोबतच सौर यंत्रणा उभारणीच्या खर्चाची साधारणतः तीन ते पाच वर्षात परतफेड होणार आहे. दरमहा वीजबिलातील आर्थिक बचत तसेच पर्यावरणस्नेही ग्राहक म्हणून कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी महावितरणच्या घरगुती वर्गवारीतील वीजग्राहकांनी रुफटॉप सौर ऊर्जा योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.