चाकण : येथील ग्रामीण रुग्णालयाच्या बांधकामाला काही ठिकाणी तडे गेलेले आहेत. ते तडे मोठे असून बांधकामाला धोका निर्माण झालेला आहे याकडे सबंधित बांधकाम विभागाने लक्ष देण्याची गरज आहे. संबंधित ठेकेदाराने कशा पद्धतीने काम केले असाही सवाल निर्माण होत आहे.
चाकण, ता. खेड येथील ग्रामीण रुग्णालयाच्या नव्या इमारतीचे बांधकाम 2012-13 मध्ये झालेले आहे. या ग्रामीण रुग्णालयात सध्या तीस खाटा आहे.चाकण येथे प्राथमिक आरोग्य केंद्र होते. या प्राथमिक आरोग्य केंद्राचे त्यावेळेस तत्कालीन पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या हस्ते इमारतीचे उद्घाटन झाले होते.
नव्याने ग्रामीण रुग्णालयाची इमारत बांधण्यात आली. हे ग्रामीण रुग्णालय सध्या तीस खाटांचे आहे.चाकण औद्योगिक वसाहतीचा परिसर असल्याने येथे देशातून आलेला मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग आहे त्यामुळे रहिवासी वस्ती मोठया प्रमाणात वाढलेली आहे.
ग्रामीण रुग्णालयात दररोज साधारणपणे 400 ते 500 रुग्ण ओपीडी विभागात असतात. चाकण रुग्णालयाचा बाह्य रुग्णविभाग मोठ्या गर्दीने नेहमी भरलेला असतो. परंतु या ग्रामीण रुग्णालयात सध्या वैद्यकीय अधिकारी तात्पुरत्या स्वरूपाचा आहे.
त्यांना दोन ठिकाणी सेवा द्यावी लागते. येथे कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी तसेच पुरेसा कर्मचारी वर्ग असणे गरजेचे आहे अशी मागणी नागरिकांची, रुग्णांची आहे. संबंधित वरिष्ठ अधिकारी याकडे दुर्लक्ष करतात असाही आरोप नागरिकांचा, रुग्णांचा आहे. या ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात बेकायदा खासगी वाहने लावली जातात. बेकायदा रुग्णवाहिकांचा तळही येथे आहे. रात्रीच्या वेळेस या रुग्णालयाच्या आवारात गैरप्रकार केले जातात.
ग्रामीण रुग्णालयात रुग्णांच्या उपचारासाठी, सेवेसाठी विविध अत्याधुनिक मशिनरी आहे.परंतु त्या मशिनरींचा रुग्णासाठी काही उपयोग होत नाही.त्या धूळ खात पडल्या आहेत.त्या मशिनरी हाताळण्यासाठी पुरेसा वैद्यकीय कर्मचारी वर्ग नाही.
त्यामुळे ग्रामीण रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना खाजगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागतो. ग्रामीण रुग्णालयात सध्या जन्म, मृत्यू,विवाह नोंदणीचे दाखले दिले जातात. ते दाखले देताना अवास्तव फी आकारली जाते असाही नागरिकांचा आरोप आहे.
ग्रामीण रुग्णालयात वर्षाला साधारणपणे सव्वाशे कुटुंब नियोजन च्या शस्त्रक्रिया केल्या जातात परंतु सध्या कुटुंबं नियोजन शस्त्रक्रिया बंद आहेत. ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाच्या शवविच्छेदनासाठी पैसे आकारले जातात असाही आरोप नागरिकांचा आहे.
ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात आवारात स्वच्छता नाही. रुग्णालयाच्या विविध वॉर्ड मध्ये स्वच्छता वेळेवर केली जात नाही. स्वच्छतागृह साफ नाही असाही रुग्णांचा आरोप आहे.
ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीला तडे गेल्या बाबत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. केशव गुट्टे यांनी सांगितले की, याबाबत संबंधित बांधकाम विभागाला लेखी पत्र दिलेले आहे. बांधकामाचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे. बांधकामाची पाहणी करावी.
बांधकाम योग्य आहे की अयोग्य आहे याबाबत बांधकाम विभागाने लेखी अहवाल द्यावा अशी मागणी केलेली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता संतोष पवार यांनी सांगितले की, ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीची पाहणी केली जाईल. याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल.
चाकणला शंभर खाटांचे उपजिल्हा रुग्णालय होणार आहे. त्यासाठी नव्याने इमारती होणार आहेत. पुरेसा वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांचाही स्टाफ येणार आहे.उपजिल्हा रुग्णालय झाल्यानंतर योग्य त्या सोयी,सुविधा मिळतील. त्याबाबतचा प्रस्ताव शासनाने मंजूर केलेला आहे.लवकरच उपजिल्हा रुग्णालयाचे काम सुरू होणार आहे. रुग्णालयामध्ये ज्या सोयी सुविधांचा अभाव आहे. त्या सोयी,सुविधा नागरिकांना रुग्णांना व्यवस्थित मिळतील यासाठी मी प्रयत्न करत आहे असे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. केशव गुट्टे यांनी सांगितले.
चाकण परिसर हा औद्योगिक वसाहतीचा व मोठ्या रहिवाशी वस्तीचा आहे. येथील मुख्य मार्गावर तसेच औद्योगिक वसाहतीत मोठ्या प्रमाणात दररोज अपघात होत असतात. अपघातग्रस्तांना खाजगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागतो.चाकण मोठे शहर आहे. शहरातील रुग्णालयात ट्रॉमा सेंटर असणे गरजेचे आहे.परंतु ट्रॉमा सेंटर येथे का नाही असा सवाल नागरिकांचा व रुग्णांचा आहे. ट्रॉमा सेंटर साठी नेत्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे असे नागरिकांचे म्हणणे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.