औंध : ‘‘पुणे महापालिकेने बाणेर-पाषाणला जोडणाऱ्या ३६ मीटर लिंकरोडचे काम स्थानिकांना विश्वासात घेऊन प्राधान्याने पूर्ण करावे. तसेच नागरी समस्यांचा तातडीने निपटारा करावा,’’ असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.
मंत्री पाटील यांनी सोमेश्वरवाडी येथील आयवरी इस्टेट रस्ता, बाणेर कळमकर नाल्यावर एसटीपी प्लांट बसवणे, बालेवाडी हाय स्ट्रीट आणि वाकड पूल जोड रस्ता आदी भागात महापालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामांची पाहणी करून आढावा घेतला. या वेळी पुणे महापालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, उपायुक्त महेश पाटील, पथ विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर, अधीक्षक अभियंता अमर शिंदे, परिमंडळ क्रमांक २ चे उपआयुक्त गणेश सोनवणे आदी उपस्थित होते.
आयवरी इस्टेट-सोमेश्वरवाडी रस्त्याच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून, या ठिकाणी पदपथ, पथदिवे ही कामे तातडीने पूर्ण करावीत. तसेच पुढील टप्प्याच्या कामासाठी भूसंपादनाची कार्यवाही तातडीने पूर्ण करावीत. लिंक रस्त्यासाठी जागेचे अधिग्रहण, गृहनिर्माण संस्थांची संरक्षक भिंत मागे घेणे इत्यादी कामे तातडीने करावी. अतिक्रमण काढण्यासाठी पोलिसांची मदत घ्यावी तसेच निधीची आवश्यकता भासल्यास प्रस्ताव सादर करावा असेही पाटील म्हणाले.
बाणेर येथील गणराज चौकातील कळमकर नाल्यावर सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाची मंत्री पाटील यांनी पाहणी केली. नाल्यातून प्रवाहित होणाऱ्या पाण्यामुळे जवळच्या नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन एसटीपीसाठी निविदा प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करावी व काम सुरू करावे, असे निर्देश त्यांनी दिले. या वेळी स्थानिक नागरिकांशी पाटील यांनी संवाद साधून अडचणी जाणून घेतल्या.
पाणीपुरवठा, कचरा, नादुरुस्त मलनि:स्सारण वाहिन्या आदींबाबत नागरिकांच्या समस्या तातडीने दूर कराव्यात. दर आठवड्याला महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयात अशा कामांचा आढावा घेण्यासाठी बैठक घेण्यात यावी, असेही पाटील यांनी सांगितले. बालेवाडी येथील हायस्ट्रीट रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करावे व महापालिका आयुक्तांनी जागा मालकांसोबत बैठक घेऊन त्यांच्या समस्या दूर कराव्यात आणि जमीन संपादन करून रस्त्याचे काम जलदगतीने पूर्ण करावे, अशा सूचनाही त्यांनी या वेळी दिल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.