चिखली - महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष झाल्यामुळे कुदळवाडी, चिखली, तळवडे, मोशी परिसरात अनधिकृत भंगार व्यवसाय फोफावला आहे. तिथे जाळल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळे पिंपरी-चिंचवड शहर प्रदूषणाच्या विळख्यात सापडण्याच्या मार्गावर आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास भावी पिढीला गंभीर परिणाम भोगावे लागणार आहेत. त्यामुळे वेळीच कार्यवाही करण्याची गरज आहे.
‘केबल’चा काळा धंदा
रात्री केबल जाळून तांबे मिळविले जाते. केबल पेटविल्याने मोठ्या प्रमाणात वायुप्रदूषण होते. लोखंड व वेगवेगळे धातू वितळवल्याने सूक्ष्म कण, धूर व धुळीचे ढग दाटतात. तेलाने माखलेले पिंप रसायनांनी धुतले जातात.
इंद्रायणी नदी प्रदूषण
रसायनमिश्रित पाणी थेट इंद्रायणी नदीत सोडले जाते. यासाठी काहींनी नदीकाठी, तर काहींनी नदीत भराव टाकून भंगार मालाचे उद्योग थाटले आहेत. पावसाळ्यात नदीकाठचा कचरा सहज नदीत जातो. त्यामुळे नदी प्रदूषणाची पातळी वाढते. जलचर, जनावरे व नदीकाठच्या गावातील नागरिकांसाठी धोकादायक आहे. चिखली परिसरात इंद्रायणी नदीत आजपर्यंत अनेक वेळा मासे मृतावस्थेत आढळले आहेत. त्यामुळे नदी प्रदूषणाकडे गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे.
भंगार माल असा येतो
मोकळ्या जागेत कचरा टाकून जाळला जातो. न कुजणारा कचरा ट्रक व अन्य वाहनांमधून रात्री आणला जातो. या वाहनांना नंबर प्लेट नसते. कचरा टाकून वाहनचालक वाहनांसह सहज पसार होतात.
शहराला धोका
कचरा आणल्यानंतर लगेचच पेटवला जातो. सर्व परिसर धुराने माखतो. उपयोगात न येणारा कचरा आणि प्लॅस्टिकचे ढिगारे मिळेल तिथे टाकून पेटविले जातात. त्यामुळे धुराचे लोट पसरतात. निगडी, संभाजीनगर परिसरापर्यंत त्याची तीव्रता जाणवते.
आगीचे कोडे
वर्षभरात कुदळवाडी चिखली परिसरात किमान पंधरा ते सतरा वेळा मोठ्या आगी लागल्याची नोंद अग्निशामक दलाकडे आहे. अनेकदा दोन-दोन दिवस आग विझवावी लागते. मात्र, अशा आगी लागण्याचे नेमके कारण अद्याप अग्निशामक दलाला सापडलेले नाही.
विषारी वायू
रसायनमिश्रित कचऱ्यामुळे कार्बन मोनोक्साईड, सल्फर ऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, हायड्रोजन डायऑक्साईड, सायनाईड असे अतिविषारी वायू हवेत मिसळतात. त्यामुळे घसा व फुफ्फुसाचे आजार होतात.
करोडोंची उलाढाल
दहा-पंधरा रुपये किलोने मिळणाऱ्या भंगारापासून वेगवेगळ्या वस्तू तयार करायच्या. त्या चाळीस ते पन्नास रुपये किलोने विकल्या जातात. कचऱ्याच्या भावात मिळणाऱ्या केबलमधील तांबे चारशे ते पाचशे रुपये दराने विकले जाते. यातून करोडो रुपयांचे व्यवहार होत असल्याचे बोलले जाते.
महापालिकेची भूमिका
महापालिकेने दोन वर्षापूर्वी कुदळवाडी-मोशी परिसरात सर्वेक्षण केले. पंधराशेपेक्षा अधिक भंगार मालाची गोदामे आढळली. त्यातील ९५ टक्के अनधिकृत आहेत. पालिकेने केवळ नोटिसा दिल्या. दुकानचालक, मालकांवर कोणतीही कारवाई केलेली नाही. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अखत्यारितील विषय असल्याने त्यांनीच नियंत्रण ठेवावे, अशी महापालिकेच्या अधिकाऱ्यांची भूमिका आहे.
प्रदूषण नियंत्रण मंडळाची भूमिका
प्रदूषण करणारे उद्योग व कंपन्यांवर कारवाई केली जाते. नोटिस दिल्यिा जातात. मात्र, पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत भंगार मालाची गोदामे व इतर दुकानांवर कारवाई करण्याचे अधिकार महापालिकेचा आहे. त्यांना वीज, पाणी यासाठी ना हरकत प्रमाणपत्र महापालिकेने देऊ नयेत. भंगार मालासारखे अनधिकृत व्यवसाय थाटण्याचा प्रयत्न झाल्यास लगेच त्यांच्यावर कारवाई करणे आवश्यक आहे.
महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष
कुदळवाडी, चिखली, अवैध भंगार व्यवसाय
कचरा जाळल्याने वायू आणि जलप्रदूषण वाढतंय
दुर्लक्ष केल्यास भविष्यात गंभीर परिणामांचा सामना
हे आहे वास्तव
भंगार खरेदी-विक्रीचे अनधिकृत उद्योग
पालिका व प्रदूषण मंडळाची परवानगी नाही
जवळपास दोन हजारांवर अनधिकृत गोदामे
भंगार व्यवसायाच्या नावाखाली गैरउद्योग अधिक
प्राण्यांसह माणसांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम
असे उद्योग चालतात
प्लॅस्टिक उद्योगासाठीचा कच्चा माल तयार करणे
केबलमधून तांबे मिळवणे
रसायणे आणि ऑइलचे पिंप धुणे
कच्च्या लोखंड विरघळवून पुन्हा लोखंड करणे
प्लॅस्टिक कचऱ्यावर प्रक्रिया करणे
कचरा व्यवस्थापन आणि मोशी कचरा डेपो याच्याशी पर्यावरण विभागाचा संबंध येतो. भंगार माल व्यावसायिक किंवा पर्यावरणाची हानी करणाऱ्या व्यवसायावर कारवाई करण्याचे आम्हाला अधिकार नाहीत. परंतु पर्यावरणाला हानी पोचविणाऱ्या उद्योगांचे महापालिकेच्या उद्योगधंदा परवाना विभागामार्फत सर्वेक्षण करण्यात येत आहे. हानिकारक उद्योगांना रहिवासी भागातून इतरत्र हलविण्यात येणार आहे. प्रदूषण करणाऱ्या उद्योगांवर कारवाई करण्याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाला कळविले आहे.
- संजय कुलकर्णी, कार्यकारी अभियंता, पर्यावरण विभाग, महापालिका
रहिवासी झोनमध्ये अनधिकृत व्यवसाय नसावेत. प्रदूषणाचा नागरिकांना त्रास होत आहे. महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी आपापली जबाबदारी पार पाडावी. प्रदूषण करणाऱ्या व्यवसायावर त्वरित कारवाई करावी.
- राहुल जाधव, नगरसेवक
नागरिक म्हणतात...
प्रतिभा सूर्यवंशी - मोशी-चिखली परिसरात घर घेतले त्या वेळी प्रदूषणाची पातळी कमी होती. आता प्रदूषणात वाढ झाली आहे. महापालिका याकडे दुर्लक्ष करीत आहे. हा प्रकार म्हणजे महापालिकेला कर भरून प्रदूषण विकत घेण्यासारखे आहे. याकडे दुर्लक्ष करणे हे भविष्यात मोठे हानिकारक ठरू शकेल.
सोनल चव्हाण - कुदळवाडी परिसरात पदूषणाची पातळी खूप वाढली आहे. नवजात बालकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो आहे. त्यांना घसा आणि श्वसनाचा विकार जडतो. कामधंद्यानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरात स्थायिक झालो असलो तरी प्रदूषणामुळे मुलांना गावाकडे ठेवावे लागत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.