city development polluted river 27 corporation waste water put directly in river Sakal
पुणे

Pune News : शहरांनी कोंडला नद्यांचा श्वास; मैलापाण्यामुळे गटारांचे स्वरूप; २७ महापालिकांत स्थिती गंभीर

राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने वेळोवेळी अभ्यास करून नदी प्रदूषणाची निरीक्षणे नोंदविली आहेत. त्या आधारावर केलेल्या विश्लेषणातून हा निष्कर्ष निघाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : नद्यांच्या काठावर वसलेल्या शहरांमुळे नद्यांचा श्वास कोंडला जात आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे राज्यातील २७ महापालिकांमधील ३८ टक्के (२ हजार ४९७ दशलक्ष प्रतिदिन) मैलापाणी कोणतीही प्रक्रिया न करता दररोज थेट नदीपात्रात सोडले जाते. त्यामुळे आपल्या पवित्र नद्यांची आपणच आता गटारे केली आहेत.

राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने वेळोवेळी अभ्यास करून नदी प्रदूषणाची निरीक्षणे नोंदविली आहेत. त्या आधारावर केलेल्या विश्लेषणातून हा निष्कर्ष निघाला आहे.

असे वाढले शहरीकरण

राज्यात १९६१ मध्ये एकूण लोकसंख्येच्या तुलनेत शहरात रहाणाऱ्यांचे प्रमाण २८ टक्के होते. २०११ च्या जनगणनेनुसार ते ४५ टक्के नोंदले गेले. गेल्या १२ वर्षांमध्ये हे प्रमाण आणखी वाढले आहे. राज्यातील अर्धी लोकसंख्या कामाच्या निमित्ताने राज्यातील वेगवेगळ्या शहरांमध्ये वास्तव्यास आली आहे. त्यामुळे महाराष्ट्र देशातील सर्वात वेगाने नागरीकरण होणारे राज्य झाले आहे. त्याचा सर्वाधिक फटका नद्यांच्या आरोग्याला बसला आहे.

पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा

  • पृथ्वीवरील खारे पाणी : ९७ टक्के (सागर आणि महासागरांमध्ये असलेले पाणी)

गोडे पाणी : ३ टक्के

  • गोड्या पाण्यापैकी २ टक्के पाणी भूगर्भात आणि बर्फाच्छादित प्रदेशात

  • उर्वरित एक टक्का गोडे पाणी वापरासाठी उपलब्ध

चुकते कुठे?

  • राज्यातील २७ महापालिकांमध्ये ३८ टक्के सांडपाण्यावर अद्यापही प्रक्रिया होत नाही

  • अ, ब आणि क वर्ग २३८ नगरपालिकांमधून फक्त १९ टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया होते

  • या तीनही वर्गांतील नगरपालिकांमधून ८७४ दशलक्ष लिटर सांडपाणी निर्माण होते

  • सांडपाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या नगरपालिकांचे प्रमाण जेमतेम ४ टक्के आहे..

नद्या दूषित कशा झाल्या?

  1. देशातील सर्वाधिक प्रदूषित नद्या महाराष्ट्रात : देशातील ३११ प्रदूषित नदीपट्ट्यांपैकी सर्वाधिक म्हणजे ५५ प्रदूषित नदीपट्टे राज्यात आहेत. त्यात मुंबईतील मिठी नदीपासून ते पुण्यातील मुळा-मुठेचा समावेश आहे. राज्यातील गोदावरी, इंद्रायणी, चंद्रभागा, कोयना, कृष्णा, पूर्णा, कोयना, नीरा अशा पवित्र नद्या प्रदूषित झाल्या आहेत. त्यातून नद्यांचा श्वास कोंडला जातो आहे.

  2. विकासाच्या इंजिनांची गती : शहरे ही राज्याच्या विकासाची इंजिन असतात. देशाच्या, राज्याच्या अर्थव्यवस्थेला आकार देण्याची किमया ही शहरे करतात. तेथे रोजगार वाढतो, गुंतवणूक वाढते, पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण होते. त्यातून कामाच्या, शिक्षणाच्या आणि रोजगाराच्या निमित्ताने गावातील तरुण शहरात स्थलांतरित होतो. त्यातून पुणे, मुंबई, कोल्हापूर, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर या शहरांमध्ये स्थलांतरितांचे सर्वाधिक लोंढे आले. त्यातून या शहरांमधील नद्यांचे आरोग्य बिघडले.

3. ओढे-नाले आटले : नद्यांना येऊन मिळणारे ओढे आणि नाले आटले. कारण, त्यांच्या उगमस्थानावर मोठ्या प्रमाणात बांधकामे झाली. त्यांच्या पाण्याचा स्रोत बंद झाला. काही ठिकाणी ओढ्यांची दिशा बदलली. त्यातून वेगवेगळ्या स्त्रोतांमधून नदीला होणारा पाण्याचा पुरवठा थांबला. त्याच्या जागी कोणतीही प्रक्रिया न करता थेट मैलापाणी नदी पात्रात सोडण्यात येऊ लागले. त्यातून नदीचे गटार झाले.

4. ‘जीवनवाहिनी’चे आक्रंदन : राज्यातील २७ महापालिका, नगरपालिका, नगर पंचायत, कटक मंडळे आदी स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपल्या भागात मैलापाणी प्रक्रिया केंद्र उभारण्याचे बंधन आहे. मात्र, त्यानंतरही राज्यातील फक्त ५१ टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. राज्यात प्रतिदिन आठ हजार १९७ दशलक्ष लिटर सांडपाणी निर्माण होते. त्यापैकी फक्त चार हजार २१९ दशलक्ष लिटरवर प्रतिदिन प्रक्रिया केली जाते. आपण अर्धे सांडपाणी नदीत सोडत असल्याने आपली जीवनवाहिनी आक्रंदत आहे.

काय केले पाहिजे?

  • नियोजित सांडपाणी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्राधान्य देण्याची गरज

  • प्रकल्पाच्या जागांचे वाद सोडविण्याला प्रशासनाने अग्रक्रम द्यावा

  • राज्य सरकारने सांडपाणी प्रकल्प केंद्रासाठी निधी मंजूर करावा

  • महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने स्थानिक स्वराज्य संस्थांकडे पाठपुरावा करणे आवश्यक

नदी प्रदूषणाची ठळक कारणे

  • शहरीकरणामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर वाढला

  • औद्योगीकरणासाठी पाण्याची वाढती मागणी

  • वाढत्या लोकसंख्येमुळे सातत्याने वाढणारी पाण्याची गरज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT