पुणे - शहरात सध्या पूर्व मोसमी पावसांचे ढग जमत असून, उन्हाचा चटकाही मोठ्या प्रमाणावर कमी झाला आहे. गुरूवारी शहरात आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता असून, तुरळक ठिकाणी अति हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
बुधवारी सकाळपासूनच शहरात ढगाळ वातावरण होते. तर एकदोन ठिकाणी अगदी तुरळक पावसाचा शिडकाव झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे शहरातील सरासरी कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. उन्हाच्या झळा जरी कमी झाल्या तरी दुपारी उकाडा चांगलाच जाणवत आहे. मॉन्सूनची लांबलेले आगमम आणि पूर्वमोसमी पावसाने दिलेली उघडीप यामुळे पुढील काही दिवस तरी पावसाची प्रतिक्षा पुणेकरांना करावी लागणार आहे.
राज्यात तळ कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात मॉन्सून दाखल झाला आहे. उर्वरित राज्यात पूर्वमोसमी पावसाने उघडीप दिली आहे. उन्हाच्या चटक्या बरोबरच उकाडा असह्य होत आहे. गुरूवारी (ता. १५) पूर्व विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने जोरदार वारे वाहून, वादळी पावसाचा, तर विदर्भात उष्ण लाटेचा इशारा आहे. तर कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
मॉन्सूनची प्रगती मंदावली...
अरबी समुद्रातील ‘बिपॉरजॉय’ चक्रीवादळामुळे मॉन्सूनच्या वाटचालीवर परिणाम होत आहे. रविवारी (ता. ११) कोकणातील रत्नागिरीपर्यंत पोहोचल्यानंतर नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांची (मॉन्सून) पुढील चाल मंदावली आहे. मॉन्सूनच्या वाटचालीस पोषक वातावरण तयार होत असल्याने रविवारनंतर (ता.१८) मॉन्सूनची प्रगती होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
यंदा मॉन्सूनचे केरळातील आगमन लांबले. देशाच्या मुख्य भूमीचे प्रवेशद्वार असलेल्या केरळमध्ये मॉन्सून सात दिवस उशिराने ८ जून रोजी डेरेदाखल झाला. त्यानंतर १० जून मॉन्सूनने केरळचा उर्वरित भाग, संपूर्ण कर्नाटक किनारपट्टीवर मॉन्सूनने धडक दिली होती. रविवारी (ता. ११) मॉन्सूनने कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात प्रगती केली आहे. सोमवारी (ता. १२) दक्षिण भारताच्या काही भागासह, संपूर्ण पूर्वोत्तर राज्ये आणि सिक्कीमसह, पश्चिम बंगाल, बिहारच्या काही भागांत मॉन्सूनने प्रगती केली.
थोडक्यात....
- मॉन्सूनच्या प्रगतीला ब्रेक
- आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता
- चक्रीवादळ उत्तरेकडे सरकताच गुजरातच्या किनाऱ्यालगत ढगांची दाटी
- उन्हाचा चटका जरी कमी झाला, तरी उकाडा कायम
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.