पुणे : तुमचा मोबाईल, लॅपटॉप, ई-बाईक आदी इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये चीनमधून आयात लिथियम आयन बॅटऱ्या वापरल्या जातात. देशात प्रथमच पूर्णतः स्वदेशी बनावटीची लिथियम आयन बॅटरी पुण्यातील शास्त्रज्ञांनी विकसित केली आहे. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान
मंत्रालयांतर्गत येणाऱ्या सेंटर फॉर मटेरिअल फॉर इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजीच्या (सी-मेट) शास्त्रज्ञांनी एसपीईल टेक्नॉलॉजीच्या सहकार्याने ही बॅटरी विकसित केली आहे.
काय आहे संशोधन?
सी-मेट आणि एसपीईलने लिथियम रसायनासह सर्व आवश्यक तंत्रज्ञान मागील पंधरा वर्षाच्या संशोधनातून देशातच विकसित केले आहे. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या "सेंटर फॉर एक्सलन्स रिचार्जेबल बॅटरी टेक्नॉलॉजी' या केंद्राच्या माध्यमातून हे संशोधन केले आहे. त्यांनी मोबाईल बॅटरी, घड्याळासाठी फ्लेक्झीबल बॅटरी, दुचाकीसाठी लागणारी बॅटरी तयार करून त्याच्या चाचण्या घेतल्या आहेत.
संशोधन महत्त्वाचे का?
इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये हलकी, कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक असलेल्या लिथियम आयन बॅटरीचा वापर होतो. सध्या चीनमधून या बॅटऱ्या आयात केल्या जातात. वाढत्या इलेक्ट्रॉनिक वाहनांमुळे 2021 पर्यंत लिथिअम आयन बॅटरीचे मार्केट 1 हजार 400 अब्ज रुपयांपर्यंत वाढणार आहे. 2016-17 च्या तुलनेत ही वाढ 300 पटींनी वाढली आहे. अशा पार्श्वभूमीवर देशातच बॅटऱ्यांची निर्मिती होणे आवश्यक आहे. पर्यायाने शेकडो उद्योगांसह लाखो नोकऱ्यांमध्ये वाढ होईल.
फायदा काय?
वजनाला हलक्या आणि जास्त ऊर्जा देणाऱ्या स्वदेशी बनावटीच्या या बॅटऱ्या सध्या उपलब्ध लिथियम आयन बॅटऱ्यांपेक्षा बॅटऱ्यांपेक्षा स्वस्त आहेत. धनाग्र आणि ऋणाग्रासाठी लागणारे सर्व पदार्थ येथे विकसित करण्यात आले आहे. वापरकर्त्या नागरिकांसह उद्योगांनाही फायदा होणार आहे. भविष्यात सोडिअम आयन बॅटरीवरही काम शक्य होणार.
सामान्यांना कधी मिळणार?
प्रायोगिक तत्त्वावर या बॅटरीजची चाचणी करण्यात आल्या आहेत. उद्योगांसोबत करार चालू असून, लवकरच हे तंत्रज्ञान सामान्यांच्या वापरात येईल, असा विश्वास सी-मेटचे महसंचालक डॉ. भारत काळे यांनी व्यक्त केला आहे. यासाठी मध्यम उद्योगांना समाविष्ट करण्याचा प्रयत्न चालू आहे.
संशोधनात यांचा सहभाग
सी-मेटचे महासंचालक डॉ. भारत काळे, डॉ. मिलिंद कुलकर्णी, डॉ. सुनीत राणे, डॉ. रविंद्र सोनवणे, डॉ. संजय आपटे, डॉ. रामचंद्र काळूबर्मे, डॉ. नागेश खुपसे, डॉ. सुयोग राऊत, डॉ. सुजित भांड, संशोधक विद्यार्थी सुप्रिया खोरे, शशिकांत टेकाळे, प्रशांत मिसाळ, रेश्मा बल्लाळ आणि 'एसपीईएल'चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेंद्रकुमार शर्मा.
भारतातील लिथियम आयन बॅटरीचे मार्केट
वर्ष : आकार (गिगावॅट आवर)
2018 : 2.9
2030 (अपेक्षित) : 132
(स्रोत : जेएमके रिसर्च)
प्रथमच लिथियम आयन बॅटरी पूर्णतः भारतात विकसित करण्यात आली आहे. येत्या काळात मोबाईलसह ई-वाहनांसाठीही या बॅटरीचा वापर करता येईल. तसेच सध्या उपलब्ध बॅटरीपेक्षा ही बॅटरी स्वस्तात मिळेल.
- डॉ. भारत काळे, महासंचालक, सी-मेट
- हे ही वाचा : गुलाबी थंडीतही व्यायामासाठी सायकलिंगला ग्रामीण भागातही पसंती
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
(Edited by: Ashish N. Kadam)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.