पुणे : धानोरी, कळस, लोहगाव भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे दणादण उडाल्याने अनेकांचे नुकसान झाले आहे. यापार्श्वभूमीवर आज महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी या भागाची पाहणी केली. अरुंद नाले, पावसाळी गटारांची अपुरी व्यवस्था आयुक्तांच्या निदर्शनास आली. यावेळी हा पूरस्थिती टाळण्यासाठी अरुंद नाल्याचे खोलीकरण करा, कलव्हर्ट स्वच्छ करण्याचे आदेश दिले आहेत.
मंगळवारी (ता. ४) झालेल्या मुसळधार पावसामुळे धानोरी, कळस, लोहगाव, वडगाव शेरी, विश्रांतवाडी या पूर्व भागात निर्माण झालेल्या पूरस्थितीची आणि महापालिकेच्या कामाची आज (ता. ६) ‘सकाळ’ने पोलखोल केली. महापालिकेकडून कामासाठी पैसे खर्च केले जात असताना ठेकेदाराकडून व्यवस्थित कामे करून घेतले जात नसल्याने त्याचे परिणाम पुणेकरांना भोगावे लागत आहेत.
या भागातील स्थिती गंभीर झाल्याने आज महापालिका आयुक्त भोसले यांच्यासह अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. पथ विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर, उपायुक्त किशोरी शिंदे, मलःनिसारण विभागाचे अधिक्षक अभियंता दिनकर गोजारे आदी यावेळी उपस्थित होते.
महापालिका आयुक्तांनी लक्ष्मी पार्क आणि गंगा अरिया या दोन सोसायट्यांची पाहणी केली. तेथील नागरिकांशी संवाद साधून त्या दिवशी काय स्थिती झाली होती याचे प्रत्यक्ष अनुभव ऐकले. ज्या सोसायटीच्या सीमाभिंत पडल्या त्या कमी जाडीच्या बांधल्या असल्याचेही यावेळी प्रशासनास निदर्शनास आले. पावसाळी गटाराचे काम या भागात सुरु असून या वाहिन्या एकमेकांना जोडण्याचे काम गेल्या वर्षभरापासून रखडले होते. ते काम देखील आता प्रशासनाने सुरु केले आहे.
या भागात पाहणी केल्यानंतर आयुक्तांनी अधिकाऱ्यांना उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. कळस येथील ग्रेप सेंटर मधून येणाऱ्या नाल्याचे खोलीकरण करणे, कलव्हर्ट साफ करण्यास सांगितले आहे. लक्ष्मी पार्क येथे लष्कराची शूटिंग रेज परिसरातून मोठ्या प्रमाणात पाणी प्रचंड वेगाने वाहत येत आहे, त्यामध्ये माती, दगडाचाही समावेश आहे. हा रस्त्यावरील राडारोडा हटवून पावसाळी लाईन साफ करा, जास्तीच्या मोठ्या क्षमतेच्या पावसाळी गटार टाकून त्यावर लोखंडी जाळ्या टाकण्याचे काम वेगात पूर्ण करा, लष्कराच्या अधिकारी चर्चा करून लष्कराच्या जागेतून वाहून येणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन केल्यास नुकसान होणार नाही. त्यावर त्वरित कार्यवाही करण्याचे आदेश आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत.