महापालिका अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनुसार येत्या तीन दिवसांत चेंबरच्या मदतीने हमाल भवन येथे कोविड लसीकरण केंद्र सुरू करण्यात येणार आहे.
मार्केट यार्ड (पुणे) : गुलटेकडी मार्केट यार्डात हमाल भवन येथे दि पूना मर्चंट चेंबर यांच्या सहकार्याने येत्या तीन दिवसांत कोरोना लसीकरण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. तसेच बाजार आवारात कोरोना रॅपिड टेस्ट केंद्र सुरू करण्यासाठी महापालिकेकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांनी दिली.
बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका प्रशासन आणि बाजार घटक संघटनांची बाजार समितीच्या मुख्य कार्यालयात सोमवारी (ता.२६) बैठक पार पडली. यावेळी महापालिकेच्या सहाय्यक आरोग्य प्रमुख आणि लसीकरण प्रमुख पुणे शहर डॉ. वैशाली जाधव, मेडिकल झोनल अधिकारी डॉ. राजेश दिघे, डॉ. अमित उदावंत, चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, उपाध्यक्ष अशोक लोढा, सचिव विजय मुथा, माजी अध्यक्ष वालचंद संचेती, राजेंद्र बाठीया, रायकुमार नहार, अडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ, उपाध्यक्ष अमोल घुले, अडते बापू भोसले, कामगार युनिनचे सचिव संतोष नांगरे, संजय साष्टे, तोलणार संघटनेचे राजेंद्र चोरघे आदी उपस्थित होते.
महापालिका अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनुसार येत्या तीन दिवसांत चेंबरच्या मदतीने हमाल भवन येथे कोविड लसीकरण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. १ मे पासून १८ वर्षांपुढील सर्वांना लस देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. प्रथम प्राधान्याने ४५ वर्षांपुढील अडते, कामगार, व्यापारी यांना लसीकरण त्यांनतर इतरांना लस देण्याबाबत अ आणि ब वर्गवारीनुसर माहिती संकलित करण्याच्या सूचना बाजार घटक संघटनांना दिल्या आहेत. तसेच सर्वांनी राहत आहेत त्या भागात देखील लस उपलब्ध होत असेल तर घ्यावी, असे गरड यांनी सांगितले.
मार्केट यार्डात सुरू होणार तपीचा दवाखाना
बाजारात काम करणाऱ्या सर्व घटकांसाठी दि पुना मर्चंट चेंबरच्या मदतीने दवाखाना सुरू करण्यात येणार आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत हा दवाखाना सुरू होईल. त्यामुळे बाजार घटकांनी या दवाखान्यात तपासणी करून पुढील तपासणी आणि उपचार घेण्याचे आवाहन प्रशासक गरड यांनी केले आहे.
15 फुटांच्या मर्यादेचे उल्लंघन केल्यामुळे 30 हजार दंड वसूल
बाजारात 15 फुटांच्या मर्यादेचे उल्लंघन केल्यामुळे बाजारातील अडत्यांवर कारवाई करत 29 हजार 580 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे फळबाजार विभाग प्रमुख बाबासाहेब बिबवे आणि तरकारी विभागप्रमुख दत्तात्रय कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली गटप्रमुख बाळासाहेब कोंडे, निळकंठ राऊत, दादा वारघडे, दीपक थोपटे, दीपक तांगडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
फळे, भाजीपाला, कांदा, बटाटा आवक
सोमवारी बाजारात विविध प्रकारच्या २१ हजार २७० वाहनातून २५ हजार ४६४.६८ क्विंटल शेतमालाची आवक झाली. शुक्रवारच्या तुलनेत आवक साधारणतः ३० टक्क्यांनी कमी झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.