पुणे : कावीळ झाल्याने मंजूर केलेला खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीचा जामीन न्यायालयाने रद्द केला. काविळीचे कारण देत आरोपीने जामिनाची मुदत वाढवून घेतली होती. त्यानंतर पुन्हा तेच कारण देत मुदतवाढण्याची मागणी केली होती. मात्र न्यायालयासमोर आलेल्या पुराव्यांचे आधारे सत्र न्यायाधीश आर. एन. हिवसे यांनी अर्जदार आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला. आनंदा सोपान चव्हाण (वय ४५, रा. आनंदम बंगला, निलगिरी प्लॉट, आंबेगाव पठार) असे जामीन फेटाळण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. यलप्पा बसप्पा तळकेरे (वय ४५, रा- वारजे माळवाडी) यांच्या खूनप्रकरणी चव्हाण याला १८ नोव्हेंबर २०१९ साली अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याने जून २०२० मध्ये तुरुंगात असताना कावीळ झाल्याचे सांगत जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता.
आजारामुळे त्यांच्या जिवाला असलेला धोका लक्षात घेऊन न्यायालयाने सुरवातीला त्याला ४५ दिवसांचा जामीन मंजूर केला होता. त्यानंतर त्याने टप्प्याटप्प्याने तात्पुरता जामीन जून २०२२ पर्यंत वाढवून घेतला. आरोपीने पुन्हा जामीन वाढविण्यासाठी तीच वैद्यकीय कागदपत्रे सादर करून मुदत वाढवून मिळण्यासाठी मागणी केली. त्यास सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांनी विरोध केला. आरोपीने सादर केलेल्या कागदपत्रांचे आधारे, त्याला कोणताही गंभीर आजार नाही. आरोपीचे सर्व रिपोर्ट नॉर्मल असल्याचे ॲड. अगरवाल यांनी न्यायालयात दाखवून दिले.
तसेच त्यांनी युक्तिवाद केला की, कावीळ हा गंभीर आजार नसून त्यावर कारागृहातील रुग्णालयात उपचार उपलब्ध आहेत. तात्पुरत्या जामीनावर आरोपी कायमस्वरूपी कारागृहाबाहेर राहू शकत नाही. अन्यथा त्यामुळे चुकीचा पायंडा पडू शकतो.
वैद्यकीय मंडळ स्थापन करून अहवाल सादर करा
न्यायालयाने ॲड. अगरवाल यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीला दिलेला जामीन रद्द केला. तसेच त्याची रवानगी कारागृहात केली. आरोपीच्या वैद्यकीय तपासणीसाठी कारागृहात वैद्यकीय मंडळ स्थापन करून त्याचा अहवाल सादर करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.