पुणे - ‘ससून रुग्णालय हे आरोग्य सेवा देणारे रुग्णालय आहे की गुन्हेगारांचा अड्डा, असा प्रश्न पडला आहे. रुग्णसेवेच्या नावाखाली रुग्णालय गुन्हेगारांचा अड्डा बनले आहे. याला जबाबदार कोण? गंभीर स्वरूपाचे आरोप असलेले आरोपी तेथे आहेत. हे आरोपी बिनधास्तपणे बडदास्त घेत आहेत. ड्रग्ज माफिया, मटका किंग सगळेच रुग्णालयात मजा मारत असून आपले धंदे चालवत आहेत. याला पोलिस किंवा डॉक्टर जबाबदार असतील का?
हे सर्व करण्याची हिंमत राजकीय राजाश्रयाशिवाय शक्य नाही. या राज्यात गुन्हेगारांना राजाश्रय मिळत आहे. सरकारने या प्रकरणाची विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) त्वरित चौकशी करावी,’ अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
पुणे दौऱ्यावर आलेले असताना वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ससून रूग्णालयातील गैरप्रकाराची चौकशी करण्याची मागणी केली. दरम्यान राजकारणाबद्दल बोलताना ते म्हणाले,‘‘एकमेकांशी वैचारिक लढाई यापूर्वीच्या राजकारणात होती, परंतु आताच्या राजकारणात बदलाची भावना आहे. वैचारिक लढाई ही वैयक्तिक झाली आहे.’
देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूका जाहीर झाल्या असून या राज्यांमध्ये काँग्रेस भक्कम आहे. तर काही राज्यांमध्ये काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष अशी थेट लढाई आहे. त्यात आताच्या सर्वेक्षणानुसार पाचही राज्यात काँग्रेस बहुमताने येईल, असा विश्वास वडेट्टीवार यांनी व्यक्त केला. तसेच, लोकसंख्येनुसार बार्टीची आर्थिक तरतूद असावी, जातीनिहाय जनगणनेसाठी गरजेची असेही त्यांनी अधोरेखित केले.
वडेट्टीवार म्हणाले, ‘केंद्र सरकारने एकीकडे दारूला करमुक्त केले आहे. तर दुसरीकडे अन्नधान्यावर वस्तू व सेवा कर (जीएसटी) लावला आहे. इंग्रजापेक्षाही खालच्या स्तरावर केंद्र सरकार जात आहे.’ शिवसेनेच्या अपात्र आमदारांबाबतच्या निर्णयाला दिरंगाई होत असल्याबाबत ते म्हणाले, ‘शिवसेनेच्या आमदारांविरोधात निर्णय असणार आहे किंवा कायद्याच्या चौकटीत हे आमदार अपात्र ठरतील, अशी भीती असल्यामुळे निर्णय घेण्यास विलंब लावला जात आहे.’
कंत्राटी नोकरभरतीला, शाळा आणि रुग्णालयाच्या खासगीकरणाला विरोध
‘विरोधी पक्ष म्हणून कंत्राटी नोकरभरतीच्या विरोधात यापूर्वी आवाज उठविला आहे. हा निर्णय आरक्षण आणि गुणवत्तेच्या मुळावर उठणारा आहे. कंत्राटी नोकरभरतीचा निर्णय रद्द करावा, ही मागणी लावून धरली आहे. शाळांचे खासगीकरण आणि महाबळेश्वरमधील ग्रामीण रुग्णालयाचे खासगीकरणाला विरोध आहे, असेही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
भाजपला दिसतोय पराभव
‘चंद्रपूर असो किंवा पुणे येथील पोटनिवडणूक होत नाही, कारण या दोन्ही ठिकाणी भाजपला सपशेल पराभव दिसत होता. भाजपने केलेल्या चार वेगवेगळ्या सर्वेक्षणातून त्यांचा पराभव निश्चित होता. त्यामुळे दोन्ही निवडणूका पुढे ढकलण्यात आल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
सरकारी तिजोरीची लुट राजरोसपणे सुरू
‘मुख्यमंत्रीपद, पालकमंत्रीपद, उपमुख्यमंत्रीपद कोणाला द्यायचे! एक ‘दादा’ दुसऱ्या ‘दादा’वर वरचढ ठरतोय, हे सध्याचे राज्याचे राजकारण आहे. हे राजकारण राज्याचा सत्यानाश करण्यासाठी सुरू आहे. आताच्या काळात प्रचंड निविदा काढल्या जात आहेत. त्यातून सरकारी तिजोरीची प्रचंड लूट सुरू असून वस्तादांची टोळी राजरोजसपणे सरकारी तिजोरी लुट करत आहे.’
- विजय वडेट्टीवार, विरोधी पक्षनेते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.