दौंड - दौंड नगरपालिकेने भीमा नदीकाठी उभारलेला कत्तलखाना रद्द झाला नाही तर उग्र आंदोलन केले जाईल, असा थेट इशारा सराला बेट (जि. नगर) येथील सदगुरू गंगागिरी महाराज संस्थानचे मठाधिपती रामगिरी महाराज यांनी दिला आहे.
पुणे जिल्ह्यातील दौंड नगरपालिकेने २ कोटी ३२ लाख रूपयांचा निधी खर्च करून शहरातील खाटीक गल्ली मध्ये उभारलेला कत्तलखाना जमीनदोस्त करण्याच्या मागणीसाठी हभप शिरीष महाराज मोरे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. मोर्चा नंतर झालेल्या सभेस मठाधिपती रामगिरी महाराज यांनी संबोधित केले.
हभप शिरीष महाराज मोरे, शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष हभप अक्षय महाराज भोसले यांच्यासह हभप काका महाराज पाहणे व रमेश महाराज भोसले या वेळी मंचावर उपस्थित होते.
मठाधिपती रामगिरी महाराज म्हणाले, गोवंशहत्या बंदी कायदा असताना सुरू असलेली गोहत्या बंद झाली पाहिजे. कत्तल सुरू राहिली तर देशी गोवंश उरणार नाही. मध्यंतरी महिलांवर अत्याचार करण्याची प्रेरणा देणाऱ्यासंबंधी मी केलेल्या विधानास वादग्रस्त ठरवून मला लक्ष्य करण्यात आले. जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. परंतु, मी साधू आहे आणि माझे जीवन धर्माला समर्पित आहे. अत्याचार करणारा दोषी तर आहेच पण सहन करणाराही दोषी ठरतो, म्हणून अत्याचार सहन करू नका.
हभप शिरीष महाराज मोरे म्हणाले, शासनाने गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिला ते अभिनंदनीय आहे. परंतु गोमातेची जेथे कत्तल होणार आहे असे कत्तलखाने रद्द केले जात नाहीत. दौंड मधील कत्तलखान्याच्या इमारतीत व्यायामशाळा, रूग्णालय, सांस्कृतिक सभागृह सुरू करावे. महिन्याभरात कत्तलखाना रद्द झाल्याचा शासन निर्णय द्यावा, अन्यथा आम्ही तो जमीनदोस्त करू.
सकल हिंदू समाज व वारकरी संप्रदाय यांच्या वतीने दौंड मध्यवर्ती प्रशासकीय इमारत ते छत्रपती शिवाजी महाराज चौक दरम्यान भव्य मोर्चा काढण्यात आला. नायब तहसीलदार शरद भोंग यांनी मागण्यांचे निवेदन स्वीकारले.
मुख्यमंत्री यांच्या आदेशाला केराची टोपली
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १४ जून २०२४ रोजी वारकरी संप्रदायातील बंडातात्या कराडकर महाराज व अन्य वारकरी प्रतिनिधी यांच्या मागणीनुसार चंद्रभागा नदी अपवित्र करणारा दौंड येथील कत्तलखाना रद्द करण्याचे आदेश पुण्याचे विभागीय आयुक्त यांना दिले होते. परंतु आदेशाची अंमलबजावणी न झाल्याने कत्तलखाना रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.