आंबेगाव बुद्रुक : दक्षिण पुण्याचे प्रवेशद्वार असलेल्या आंबेगाव जांभूळवाडी परिसरातील, जांभूळवाडी तलावाच्या काठावर गुरुवारी सकाळी मृत माशांचा खच लागल्याचे मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या नागरिकांच्या निदर्शनास आले. तलावाच्या काठावर साधारण पाच ते सात टन मासे मृत अवस्थेत पडलेले दिसले. यामध्ये, लहान माशांपासून पंधरा किलो पर्यंतच्या माशांचा समावेश आहे. गुरुवार सकाळ पासून आज पर्यंत मासे मारण्याचे सत्र सुरुच आहे. या मृत माशांमुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे.
जांभूळवाडी तलाव हा ९७ एकर क्षेत्रात आहे.परंतु सद्यस्थिती पाहता तलावाचे क्षेत्रात पाच ते सात एकरांची घट झालेली दिसून येते. तलावात अतिक्रमणे वाढत असताना पाटबंधारे खाते मात्र डोळ्यावर गेंड्याची कातडी ओढून बसलेले दिसते आहे. शिवाय आंबेगाव खुर्द, जांभूळवाडी परिसर झपाट्याने विकसित होत असल्याने तलाव परिसरात दाट लोकवस्ती झाली आहे.
दरम्यान तलावाच्या जवळ मोठ मोठ्या सदनिका उभारल्या गेल्या आहेत. या सदनिकांच्या सांडपाण्याला महापालिकेकडून सांडपाणी वाहिनी अद्याप टाकण्यात आलेली नाही. त्यामुळे, शनिनगर चौक ते जांभूळवाडी दरीपूल दरम्यान असणाऱ्या टोलेजंग सदनिकांचे सांडपाणी तलावात सोडले जाते आहे. या सांडपाण्यामुळे तलावातील पाणी दूषित होऊन, पाण्याचा रंग हिरवट झाला आहे. सांडपाणी वाहिनी टाकणे बाबत महापालिका व पाटबंधारे विभाग यांच्यामधील प्रश्न अजूनही न सुटल्याने सांडपाणी वाहिनी टाकण्यात आलेली नसली तरी पाटबंधारे खात्याकडून या सांडपाणी सोडणाऱ्या एकही सोसायटीवर कारवाई केल्याची नोंद नाही.पाटबंधारे विभागाच्या या औदासीन्यपूर्ण धोरणामुळे मात्र जलचरांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
असे असले तरी तलावातील मासेमारी मच्छिमारांकडून चालू आहे.या दूषित पाण्यातील मासे बाजारात विक्रीसाठी नेले जात आहेत. यापासून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.तलावातील ही मच्छिमारी पाटबंधारे विभागाकडून लवकरात लवकर बंद करून, तलाव संवर्धन करणे गरजेचे आहे.
दूषित पाण्याने तलावातील मासे मृत होत असल्याचा प्राथमिक अंदाज असला तरी अज्ञात नागरिकांकडून रात्रीच्यावेळी मासेमारी करण्यासाठी तलावात पावडर टाकण्यात येत असल्याची छुपी चर्चा नागरिक करत आहेत. या पावडरीमुळे मासे भुलून मरतात व आयती शिकार होते. त्यामुळे मासे नेमके कशाने मरतात याबद्दल शंका आहे.शिवाय काही नागरीक तलावातील मृत मासे बाजारात व घरी सुद्धा घेऊन जात आहेत.
''सकाळी मोर्निंग वॉकला आलो असता मासे काठावर मेलेल्या अवस्थेत दिसले. माशांची पोटं फुगलेली होती. तलावाच्या सुरक्षेचा प्रश्न लवकरात लवकर सोडवायला हवा. ''
-अनिल यादव, रहिवाशी लिपाणे वस्ती
''तलावात मेलेल्या माशांची दुर्गंधी पसरली आहे. महापालिकेने यावर काहीतरी मार्ग काढायला पाहिजे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.''
- संकेत मस्के, विद्यार्थी आंबेगाव खुर्द
''पाटबंधारे विभागाने तलाव महापालिकेला हस्तांतरित करावा, जेणेकरून तलाव परिसरातील सदनिकांच्या ड्रेनेजचा आणि तलाव संरक्षण, संवर्धनाचा प्रश्न कायमचा सोडवता येईल.''
- युवराज बेलदरे, नगरसेवक प्रभाग क्र ४०
'युनायटेड नेशनने २०२१ ते २०३१ हे इको रेस्टोरेशन डिकेड वर्ष म्हणून जाहीर केले आहे. यामध्ये, आपल्याकडील ओढे,तलावांचे जतन करायचे आहे.असे असताना आपण त्यांचा ऱ्हास करत आहोत. तलावातील मासे मरणे ही गंभीरबाब आहे.हे आपल्या सगळ्यांसाठी झणझणीत अंजन आहे की आपण आणखी किती जीवसृष्टी नष्ट करणार आहोत.पर्यवरणाचा समतोल आपल्यामुळेच बिघडते आहे. याची खुप मोठी परतफेड आपल्याला करावी लागेल.
- डॉ. विनिता आपटे, संस्थापक संचालक तेर पॉलिसी सेंटर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.