पुणे - केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत (Chhatrapati Shivaji Maharaj) केलेल्या वक्तव्यावरून पुन्हा नव्याने वाद (Dispute) निर्माण झाला आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराजांना खेळाचे शिक्षण समर्थ रामदास आणि दादोजी कोंडदेव यांनी दिले, असे वक्तव्य संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले. त्यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या असून, या वक्तव्याबद्दल राजनाथ सिंह यांनी महाराष्ट्राची आणि शिवप्रेमींची माफी मागावी,’ अशी मागणी संभाजी ब्रिगेडने (Sambhaji Brigade) केली आहे.
संरक्षण मंत्रालयातर्फे आयोजित आर्मी स्पोर्ट॒स इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह शुक्रवारी पुण्यात आले होते. या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांनी माफी मागावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे केंद्रीय निरीक्षक विकास पासलकर, प्रदेश संघटक संतोष शिंदे, जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत धुमाळ, शहराध्यक्ष अविनाश थोरात पुणे यांनी केली आहे.
‘छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदासांची कधीही भेट झालेली नाही. समकालीन इतिहासामध्ये तसा कुठलाही पुरावा नाही. परंतु शिवाजी महाराजांचे कर्तृत्व नाकारण्यासाठी गुरू म्हणून रामदास व दादोजी कोंडदेव हे जाणीवपूर्वक सांगितले जातात. शिवाजी महाराजांनी स्वकर्तृत्वावर इतिहास घडवला. परंतु काही तथाकथित इतिहासकारांनी खोटे आणि वादग्रस्त इतिहासाचे लेखन करून शिवाजी महाराजांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला. राजनाथ सिंह यांनीही चुकीचा इतिहास सांगून अज्ञानाचे दर्शन दिले. खोटा इतिहास सांगणाऱ्यांनी शिवरायांच्या इतिहासाशी गद्दारी करू नये,’ असे पत्रकात नमूद केले आहे.
‘राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांनी शिवाजी महाराजांना ढाल, तलवार आणि इतर खेळांचे ज्ञान दिले. वीर बाजी पासलकर यांनीही तलवारबाजीचे शिक्षण दिले. असे असताना खरा इतिहास लिहिला जात नाही, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. सिंह यांनी चुकीचा इतिहास मांडला. त्यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. संरक्षणमंत्र्यांनी तत्काळ महाराष्ट्राची माफी मागावी. तसेच, छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक व्हावे,’ अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.