पुणे : वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी झालेल्या ‘नीट’ परीक्षेत अतिरिक्त वाढीव गुण (ग्रेस मार्क्स) दिलेल्या विद्यार्थ्यांची गुणपत्रिका रद्द करून त्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याचा पर्याय केंद्र सरकारने दिला आहे. केंद्र सरकारची ही भूमिका देशभरातील ‘नीट’ परीक्षा दिलेल्या अन्य विद्यार्थ्यांच्या लढाईला प्राथमिक यश असले, तरीही परीक्षेच्या निकालातील गैरव्यवहाराची सखोल चौकशी करण्यात यावी, अशा मागणीने जोर धरला आहे.
‘नीट’ परीक्षेत अनियमितता झाल्याचा दावा करत सर्वोच्च न्यायालयात असंख्य याचिका दाखल झाल्या. या याचिकांवर सुनावणी सुरू असताना केंद्र सरकारने ‘नीट’ परीक्षेत अतिरिक्त वाढीव गुण दिलेल्या एक हजार ५६३ विद्यार्थ्यांची गुणपत्रिका रद्द करत त्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याचा पर्याय दिला आहे. २३ जून रोजी या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेतली जाणार असून, त्या परीक्षेचा निकाल ३० जूनपूर्वी जाहीर होईल, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.
‘‘नीट परीक्षेत पेपर फुटीचा प्रश्न महत्त्वाचा असून, एकाच वेळी अनेकांना ‘टॉप’ गुण मिळणे, त्यातील सहा विद्यार्थी एकाच केंद्रातील असणे, हे सर्व संशयास्पद आहे. या प्रकरणाची चौकशी होणे आवश्यक आहे,’’ असे मत आम आदमी पक्षाचे प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी व्यक्त केले. किर्दत म्हणाले,‘‘या परीक्षेत अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळावा आणि त्यांचे शिक्षण अत्यंत माफक शुल्कात व्हावे, या उद्देशाने असंख्य विद्यार्थी ही परीक्षा देतात. यावर्षी अपेक्षेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना वरील रॅंक मिळाली आहे. ही आकडेवारी पाहता भ्रष्टाचाराची आणि पेपरफुटीची शंका निर्माण होते. त्यामुळे पेपरफुटी आणि या परीक्षेतील गैरव्यवहाराचा वरिष्ठ यंत्रणांकडून सखोल आणि तातडीचा तपास होणे गरजेचे आहे.’’
राज्यात स्वतंत्र परीक्षा घेण्याची मागणी
‘नीट’ परीक्षेच्या निकालातील घोळ आणि निर्माण झालेले गोंधळाचे वातावरण पाहता राज्य सरकारने ‘सीईटी’च्या धर्तीवर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी स्वतंत्र प्रवेश परीक्षा घ्यावी आणि ‘नीट’ या प्रवेश परीक्षेबाबत पुनर्विचार करावा, अशी मागणी ‘महापॅरेंट्स’ पालक संघटनेने केली आहे. संघटनेतर्फे या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री आणि वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांना देण्यात आले आहे. ‘नीट’ प्रवेश परीक्षेमुळे विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा अतिरिक्त ताण येतो.
लाखो विद्यार्थी या मानसिक ताणातून जात असतात. यातून विद्यार्थ्यांची मुक्तता व्हावी, यासाठी राज्य सरकारने ‘नीट’ परीक्षेतून प्रवेशाची पद्धती रद्द करावी आणि वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी स्वतंत्र प्रवेश प्रक्रिया राबवावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केल्याचे संघटनेचे दिलीपसिंग विश्वकर्मा यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.