medical store line for remdesivir Sakal
पुणे

चुकांमधून तरी शिकणार की नाही?

एखादे तरी रेमडेसिव्हिर इंजेक्शन मिळेल, या आशेने मेडिकल स्टोअरच्या समोर रुग्णांच्या नातेवाइकांच्या रांगा लागल्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

एखादे तरी रेमडेसिव्हिर इंजेक्शन मिळेल, या आशेने मेडिकल स्टोअरच्या समोर रुग्णांच्या नातेवाइकांच्या रांगा लागल्या आहेत. कोणी त्यासाठी या दुकानातून त्या दुकानात धावत आहे, हॉस्पिटलबाहेर बेड मिळण्यासाठी रुग्णांची जीवघेणी प्रतीक्षा सुरू आहे, ज्यांना बेड मिळाला आहे त्यांना पुरेसा ऑक्सिजन मिळेल की नाही, याबाबत शाश्वती नाही. पुण्याच्या आरोग्य व्यवस्थेची इतकी केविलवाणी स्थिती याआधी कधी झाली नसेल. कोरोनामुळे रुग्णालयात दाखल असलेल्या व्यक्तींच्या नातेवाइकांचे हाल पाहवेनासे झाले आहेत. सतत उत्साहात सळसळत्या या शहरातील सध्याचे हे भयाण वास्तव मन सुन्न करणारे आहे. गेल्या महिन्याभरात कोरोनाची दुसरी लाट शहरावर इतक्या वेगाने आदळली आहे, की त्यापुढे सारी आरोग्य यंत्रणाच कोलमडून पडल्याचे चित्र आहे.

नातेवाइकांची खरी फरफट

सध्या शहरात रोज पाच हजारांवर रुग्ण सापडत आहेत. त्यातील अनेकांना नाइलाजाने हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागत आहे. एकदा का हॉस्पिटलमध्ये दाखल केले, की रुग्णांच्या नातेवाइकांची खरी फरफट सुरू होते. कोरोनामुळे पेशंटच्या जवळ जाता येत नाही. शिवाय पेशंटला लागणारी औषधे, इंजेक्शन्स, ऑक्सिजन त्या रुग्णालयात; तसेच बाहेर दुकानात मिळेल याचीही शाश्वती नाही. त्यामुळे सर्वसामान्य अक्षरशः हवालदिल झाले आहेत. अशा वेळी सर्वांच्या नजरा असतात त्या प्रशासनावर, तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींवर. मात्र, या वेळी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अंदाज बांधण्यात आणि त्यासाठीची पूर्वतयारी करण्यात प्रशासन पूर्ण अपयशी ठरले आहे.

प्रशासनाकडून हेळसांड

दुसरी लाट पहिल्यापेक्षा तीव्र असणार, याबाबत तज्ज्ञांनी वेळोवेळी इशारा दिला होता. यानुसार प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करणे अपेक्षित होते; पण तसे घडलेच नाही. त्यामुळे आज ही वेळ ओढविली आहे. साधे जम्बो कोविड सेंटर पुन्हा सुरू करण्यातही महापालिकेने नको इतका विलंब केला. खरे तर महापालिकेने; तसेच जिल्हा प्रशासनाने वेळीच पुढाकार घेत रेमिडिसिव्हिरसारखी इंजेक्शन ताब्यात घेणे; तसेच कंपन्यांकडे मागणी करून ठेवणे आवश्यक होते. देशातील अनेक शहरांतील महापालिकांनी अशी पावले उचलली आहेत. अगदी शेजारच्या मुंबई, सातारा शहरांतील प्रशासनाला जे सुचले, ते पुणे महापालिकेला सुचू नये याचे आश्चर्यच वाटते. त्यामुळे नागरिकांवर काळ्या बाजारातून अव्वाच्या सव्वा दरात इंजेक्शन खरेदी करण्याची वेळ आली आहे. कोणत्याच प्रगत शहरासाठी हे भूषणावह नाही. नागरिकांची एका बाजूला दैना उडाली असताना राजकीय नेत्यांनी एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप करण्यात धन्यता मानली. हे तर आणखी गंभीर आहे. ही वेळ आरोप प्रत्यारोपांची नाही. त्यातून नागरिकांचे प्रश्न अजिबात सुटणार नाहीत.

आताही नेमके काय चुकले याच्या तपशीलात जाण्यात वेळ न दवडता प्रशासनाने आगामी काळात काय परिस्थिती असेल यासाठी तातडीने पावले उचलली पाहिजेत. सध्याच शहरात रोज तब्बल आठ हजार रेमडेसिव्हिर इंजेक्शन लागत आहेत; तसेच प्रतिदिन ३२१ मेट्रिक टन ऑक्सिजन लागत आहे. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता रेमडेसिव्हिर व ऑक्सिजनच्या मागणीत वाढच होणार आहे. त्याची तजवीज करण्याबरोबरच चेन ब्रेक करण्यासाठीही पावले टाकली पाहिजेत. त्याचप्रमाणे विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर आता पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची वेळ आलेली आहे. गेल्या वेळपेक्षा यावेळचे लॉकडाउन कडक नसले, तरी लोकांनी त्याचा गैरफायदा घेणे सर्वथा चुकीचे आहे. सर्वांनी शिस्त ठेवली तरच शहरावरील कोरोनाचा ताण हलका होणार आहे. केवळ प्रशासनाकडे बोट दाखवण्यापेक्षा प्रत्येकाने आपापल्या परीने कोरोनामुक्तीत खारीच वाटा उचलला पाहिजे. यासाठी फार काही करायचे नाही. प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांची कसोशीने अंमलबजावणी करणे आणि कोरोनाला दूर करणाऱ्या त्रिसूत्रीचा वापर करणे यातच स्वतःचे, कुटुंबाचे व साऱ्या शहराचे हित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT