महाराष्ट्र राज्यासह कर्नाटक, तेलंगणा व आंध्र प्रदेश या राज्यांच्या दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा दुवा ठरलेला पुणे-सोलापूर महामार्गाचा यवत ते इंदापूर हा टप्पा वर्षभरात शेकडो जणांसाठी जीवघेणा ठरला आहे.
पळसदेव - महाराष्ट्र राज्यासह कर्नाटक, तेलंगणा व आंध्र प्रदेश या राज्यांच्या दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा दुवा ठरलेला पुणे-सोलापूर महामार्गाचा यवत ते इंदापूर हा टप्पा वर्षभरात शेकडो जणांसाठी जीवघेणा ठरला आहे. वर्षभरात झालेल्या अपघातांची संख्या विचारात घेता हा महामार्ग मृत्यूचा सापळा झाला आहे.
वारंवार अपघात होणारी ठिकाणे
चौफुला, भुलेश्वर फाटा, सहजपूर फाटा, माकरवस्ती फाटा, भांडगाव चौक, खडकी चौक, स्वामी चिंचोली चौक, मळद, भिगवण बाजारपेठ, डाळज क्र. २ चौक, पळसदेव चौक, लोणी-देवकर एमआयडीसी चौक, वरकुटे, मखरेवस्ती.
प्रवासी थांबे नावालाच
महामार्गालगतच्या गावांमध्ये उभारण्यात आलेले प्रवासी थांबे लोकांच्या अजिबात उपयोगी पडत नसल्याची वस्तुस्थिती आहे. यामध्ये पोंधवडी, भादलवाडी, डाळज क्र. १, २, लोणी देवकर, वरकुटे, गागरगाव, गलांडवाडी पाटी आदी ठिकाणी प्रवासी थांबे बांधण्यात आले आहेत. यापैकी बहुतांश ठिकाणी केवळ एकाच बाजूला थांबा आहे.
दुसऱ्या बाजूला प्रवाशांना रस्त्यावर उभे राहून एसटीची वाट पहावी लागते. पळसदेवसारख्या मोठ्या गावात अद्यापपर्यंत प्रवासी थांबा बांधण्यात आलेला नाही. या ठिकाणी ग्रामस्थांनी अनेकदा याबाबत मागणी केली. टोल कंपनीकडे पत्रव्यवहार केला. मात्र त्यांच्या मागणी पत्राला केराची टोपली दाखविण्यात आली आहे.
दुरुस्तीची कामे वेळेत गरजेची
या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम होऊन दशकाचा कालावधी उलटत आला आहे. महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सन २०१३-१४ मध्ये झाले.
त्यामुळे टोलच्या माध्यमातून वाहनचालकांच्या खिशाला कात्री लावणाऱ्या या महामार्गाच्या कामातील त्रूटी दूर करण्याबरोबर आवश्यक उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. महामार्गालगतच्या वाढत्या शहरीकरणामुळे सध्याचा रस्ता वाहतुकीस तोकडा पडू लागला आहे.
यासाठी नॅशनल हायवे अॅथोरिटीने प्रयत्न करण्याबरोबर टोल वसूल करणाऱ्या टोल कंपनीने देखभाल दुरुस्तीचे काम वेळेत व दर्जेदार करण्याची गरज आहे.
तसेच, महामार्गालगत सध्या अनेक व्यवसायात वाढ झाली आहे. परिणामी अनेक ठिकाणी रस्त्याचे दुभाजक अनधिकृतपणे फोडून स्थानिकांनी मार्ग बनविले आहेत. यातून अपघातांस निमंत्रण मिळत आहे. अशा ठिकाणी कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज आहे.
टोल कंपनीने या सुविधा पुरवाव्यात
अत्याधुनिक रुग्णवाहिका वाढवाव्यात
क्षमतेच्या क्रेनची (हायड्रो क्रेन) आवश्यकता
गस्त वाढविण्याची गरज
वाहनांना तत्काळ बाजूला करणे महत्त्वाचे
आगाऊ सूचना देणारे फलक बसविणे गरजेचे
या उपाययोजनांची गरज
दोन्ही बाजूने सेवा रस्ते करावेत
रस्त्यावरील ओढा, नाल्यांवर जुन्या पुलांऐवजी नवीन पूल बांधणे
आवश्यक तेथे भुयारी मार्ग तयार करणे, या भुयारी मार्गात विजेची सोय करणे, पुलांवर वीजेचे खांब उभारून प्रकाशाची सोय करणे
मोठ्या गावांच्या चौकामध्ये फुटपाथ, रोलिंग, हायमास्ट दिवे बसविणे
शेतकरी व जनावरांसाठी रस्ता ओलांडण्यासाठी सुरक्षित ठिकाण बनविणे
प्रशस्त प्रवासी थांबे बांधणे
मोटारसायकल, स्थानिक वाहन चालकांकडून सेवा रस्त्याचा वापर करण्याबाबत सक्ती
पुलांची रुंदी वाढविणे
वाहनांना विश्रांती ठिकाणे उभारणे
विश्रांती ठिकाणांवर चालकांमध्ये प्रबोधन करणे
महामार्गालगतची अवैध दारू विक्री बंद करणे
रस्ता दुभाजकांची उंची वाढविणे
संवेदनशील ठिकाणी प्रखर प्रकाशाची (हायमास्ट दिवे) सोय करणे
सीसीटीव्ही बसविणे
पोलिसांकडून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करणे
महामार्गालगत दिवसा व रात्रीच्या वेळी विक्रेत्यांकडून होणारे अतिक्रमण रोखणे
अपघाताची कारणे
उरुळी कांचन ते पाटस दरम्यान वाढलेल्या शहरीकरणामुळे तोकडा पडणारा रस्ता
रस्त्याच्या दोन्ही बाजूला सेवा रस्त्याची नसलेली सोय
मोटारसायकल, रिक्षा, ट्रॅक्टर चालकांकडून मुख्य महामार्गाचा होणारा वापर
वाढीव लेन व स्ट्रीट लाईटचा अभाव
महामार्गावरील अतितीव्र चढ-उतार
वेगामुळे टायर फुटणे
रस्ता दुभाजक फोडून अनधिकृत तयार केलेल्या मार्गातून रस्ता ओलांडणे
वाहतुकीच्या नियमांकडे वाहनचालकांकडून होणारे दुर्लक्ष
महामार्गाचे चौपदरीकरण झाल्यानंतर त्याच्या देखभालीचे काम आमच्या स्तरावर केले जाते. याव्यतिरिक्त आवश्यक वाढीव बाबींसाठी नॅशनल हायवे अॅथोरिटी आॅफ इंडियाने निर्णय घेऊन कार्यवाही करणे गरजेचे आहे.
अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहनचालक, ग्रामस्थांमध्ये वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती करणे महत्त्वाचे आहे. देखभाल दुरुस्ती कामे आम्ही वेळेत करत आहोत.
कुरकुंभसारख्या ठिकाणी थर्मोप्लास्टचे पांढरे पट्टे रस्त्यावर मारले असता तेथील नागरिकांनी रात्रीच्या वेळी आमची झोपमोड होत असल्याची तक्रार आमच्याकडे केली. त्यामुळे कोणत्याही निर्णयावर लोकांकडून चांगल्या व वाईट प्रतिक्रिया येतात.
- सुरजित सिंग, व्यवस्थापक, टोल कंपनी देखभाल दुरुस्ती विभाग
उरुळी कांचन ते पाटस दरम्यान वाढलेल्या शहरीकरणामुळे याठिकाणी दोन्ही बाजूने सेवा रस्त्याची सोय करणे गरजेचे आहे. चौकांमध्ये हायमास्ट दिवे, वाढीव लेन तयार करण्याची गरज आहे.
- नारायण पवार, पोलिस निरिक्षक, यवत (ता. दौंड)
भिगवण ते लोणी देवकर या भागात सर्वाधिक अपघात झाले आहेत. या पट्ट्यातील अरुंद पुलांची रुंदी वाढविणे, हायमास्ट दिवे, वाढीव लेनची सोय करणे गरजेचे आहे.
महामार्गावरील अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या त्रूटी दूर करण्यासाठी महामार्ग पोलिस व जिल्हा वाहतूक शाखेचे मत विचारात घेऊन उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे.
- महेश कुरेवाड, पोलिस उपनिरीक्षक, इंदापूर महामार्ग पोलिस केंद्र
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.