बारामती : सर्वांनीच आता घरामध्येही मास्क वापरायला सुरवात करा, बाहेर फिरताना डबल मास्क वापरा असा काही तज्ज्ञांनी या बाबत सल्ला दिलेला असून, सर्वांनीच मास्कबाबत कमालीची काळजी घ्यायला हवी. आता दोन मास्क वापरायला हवेत, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. बारामतीतील डॉ. सुनिल पवार व सातव कुटुंबियांच्या वतीने तयार करण्यात आलेल्या धो. आ. सातव कोविड हॉस्पिटलचे ऑनलाईन उद्घाटन आज पवार यांनी केले, त्या प्रसंगी बोलताना त्यांनी हे आवाहन केले.
दरम्यान, या प्रसंगी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, पंचायत समितीच्या सभापती नीता फरांदे, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार विजय पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, डॉ. सदानंद काळे, डॉ. मनोज खोमणे, संभाजी होळकर, रोहित कोकरे आदी उपस्थित होते. माजी नगराध्यक्ष सदाशिव सातव, जयश्री सातव यांच्यासह गटनेते सचिन सातव, नितीन सातव, सूरज सातव आदींनी स्वागत केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ''मुंबई पोलिस आयुक्तांनी पोलिसांना आता दोन मास्क वापरण्याच्या सूचना दिल्या असून घरातही आता प्रत्येकाने मास्क वापरला पाहिजे, तरच कोरोनाचा धोका आपण टाळू शकतो. बारामतीत प्रशासन व सेवाभावी संस्थांच्या वतीने रुग्णांच्या सोयीसाठी अनेक प्रयत्न सुरु आहेत, ऑक्सिजन व व्हेंटीलेटरसह बेड्स वाढविण्याचा प्रयत्न केला जातोय. बारामतीत 100 खाटांचे तात्पुरते हॉस्पिटल सुरु करण्याचा विचार सचिन सातव यांनी बोलून दाखवल्यानंतर त्यांना लगेचच सर्व मदत करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या होत्या. बारामतीसह इंदापूर, दौंड, पुरंदर, कर्जत, माळशिरस, फलटण या परिसरातूनही रुग्ण बारामतीत येत आहेत, त्यामुळे डॉ. सुनिल पवार यांच्या सहकार्याने सातव कुटुंबियांनी हा एक चांगला उपक्रम हाती घेतला आहे. या ठिकाणी व्हेंटीलेटर व ऑक्सिजनची सुविधाही दिली जाणार असल्याने बारामतीकरांची चांगली सोय होईल.''
आग लागणार नाही याची काळजी घ्या- केवळ बारामतीच नव्हे तर सगळीकडील शासकीय व खाजगी रुग्णालयात फायर ऑडीट व्हायला पाहिजे, आगीपासून बचाव करण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना हाती घ्या, असेही आवाहन अजित पवार यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.