पुणे : माजी सैनिक अंशदायी आरोग्य सेवा योजना (इसीएचएस) विभागाच्या वतीने १६ केबी इसीएचएस कार्डचा वापर बंद करण्यात आला आहे. गेल्या वर्षी याबाबत इसीएचएस विभागाद्वारे सूचना जारी करण्यात आल्या होत्या. त्यानुसार आता १६ केबी इसीएचएस कार्डचा वापर बंद करण्यात आला असून, अद्याप बहुतांश इसीएचएस लाभार्थ्यांनी ६४ केबी कार्डसाठी अर्ज प्रक्रिया केली नसल्याचे इसीएचएस विभागातर्फे सांगण्यात आले आहे.
कोरोनामुळे गेल्या वर्षी १६ केबी कार्डची वैधता डिसेंबर २०२० पर्यंत वाढविण्यात आली होती. त्यामुळे माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांना इसीएचएसच्या सुविधा मिळविण्याकरिता ६४ केबी कार्डसाठी अर्ज करण्याची सवलत देण्यात आली होती. तर ज्यांनी ६४ केबी कार्डसाठी अर्ज केला आहे पण कार्ड आले नाही, अशा लाभार्थ्यांना तात्पुरती स्लीप (टेम्प्ररी स्लीप) सेवेच्या माध्यमातून वैद्यकीय सुविधा पुरविण्यात येत आहे.
मात्र १६ केबी कार्डची वैधता एप्रिल २०२१ पासून संपविण्यात आली आहे. तर इसीएचएसच्या सुविधा मिळण्याकरिता माजी सैनिकांनी त्वरित ६४ केबीच्या कार्डसाठी ऑनलाइन अर्ज भरावे, असे आवाहन विभागातर्फे करण्यात आले आहे. याबाबतचे परिपत्रक नुकतेच जाहीर करण्यात आले आहे.
काय आहे इसीएचएस कार्ड ?
सशस्त्रदलातून सेवानिवृत्त होणारे अधिकारी व सैनिक तसेच त्यांच्या कुटुंबीयांना मोफत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्यासाठी इसीएचएस विभाग कार्य करते. या विभागांतर्गत देशातील विविध ठिकाणी पॉलिक्लिनिक्समध्ये माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांचे उपचार होतात.
यासाठी त्यांना एक स्मार्ट कार्डच्या स्वरूपात ‘इसीएचएस कार्ड’ दिले जाते. कुटुंबातील प्रत्येक लाभार्थ्यांना स्वतंत्र कार्ड दिले जाते. तसेच कार्डमधील माहिती संकलित करण्याची क्षमता वाढविण्यासाठी १६, ३२ आणि ६४ केबी अशा तीन स्वरूपात ते उपलब्ध आहे.
‘‘इसीएचएस लाभार्थ्यांना घरबसल्या अर्ज व इतर योजनांबाबतच्या माहिती सहज मिळू शकते. यासाठी इसीएचएस विभागातर्फे मोबाईल (ECHS Beneficiaries App) अॅप देखील तयार करण्यात आले आहे. यामुळे लाभार्थ्यांना आपला नोंदणीकृत मोबाईल क्रमांक बदलणे, कार्ड हरवल्यास त्याला ‘ब्लॉक’ करणे व पुन्हा त्यासाठी अर्ज करणे सोपे झाले आहे.’’ - रवींद्र पाठक, इसीएचएस सल्लागार समितीचे सदस्य
१६ केबीच्या कार्डबाबत :
या पूर्वी माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांना १६ केबी कार्डच्या माध्यमातून वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात येत होत्या. तसेच १६ आणि ३२ केबीच्या कार्डमध्ये रुग्णांचा वैद्यकीय इतिहास केवळ काही काळासाठीच जतन करणे शक्य होते. त्यामुळे यात काही बदल करण्यात आले आहे. तर माजी सैनिकांच्या सुविधेसाठी प्रत्येक मुख्यालयात मदत केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे.
64 केबी स्मार्ट कार्डचे वैशिष्ट्य :
माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांचा वैद्यकीय इतिहास जतन करणे सोपे
अधिकाधिक डेटा यामध्ये जमा करता येतो
या माहितीचा आधारे पुढील उपचार देण्यास मदत
देशांतर्गत कोणत्याही पॉलिक्लिनिकमध्ये वापर
६४ केबी कार्डची स्थिती (डिसेंबर २०२० पर्यंत)
वाटप झालेले ६४ केबी कार्ड : १५२०१३८
इसीएचएस लाभार्थ्यांची संख्या : २९०३५५७
येथे करा अर्ज :
६४ केबी कार्डसाठी माजी सैनिकांना echs.gov.in या संकेतस्थळाचा वापर करावा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.