पिंपळवंडी : काळवाडी(ता.जुन्नर) येथील काळेस्थळ वस्ती शिवारात बुधवारी(ता.८) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यात रुद्र महेश फापाळे या आठ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला.
मूळचे बदगी बेलापूर येथील फापाळे हे यात्रेनिमित्त काळवाडी येथे त्यांचे नातेवाईक रोहिदास गेनभाऊ काकडे यांच्याकडे आले होते.रुद्रची आई काल पुन्हा आपल्या गावी गेली असता दुसऱ्या दिवशी म्हणजे आज सकाळी हि दुर्दैवी घटना घडली.बिबट्याच्या हल्ल्यात मुलगा मृत्युमुखी पडल्याने त्याची आई भाग्यश्री फापाळे यांनी टाहो फोडला.
सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास रुद्र हा घराच्या जवळ खेळत होता.घराच्या बाजूला असणाऱ्या गोठ्याजवळ रुद्र जात असताना अचानक बिबट्याने येऊन त्याच्यावर हल्ला केला व त्याला उचलुन घेऊन गेला.
बाजुच्या उसाच्या शेतात त्याचा मृतदेह आढळून आला. सदर घटनेची माहिती वनवीभागाला कळविल्यानंतर वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. काळवाडी व परिसरातील ग्रामस्थांचा मोठा उद्रेक झालेला असुन. बिबट्याचे हल्ले थांबविण्यासाठी वनविभाग तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी यावेळी ग्रामस्थ करत आहेत.
बिबट्याच्या हल्ल्यात नागरिक मृत्युमुखी किंवा जखमी झाल्यानंतर वनविभाग त्या परिसरात पिंजरा लावतो तसेच काही दिवस त्या परिसरात वनविभागाचे कर्मचारी हे निगराणी करत असतात.घटना घडल्यानंतर उपाय करण्याऐवजी या घटना घडु नयेत यासाठी शासनाने आता उपाय करणे गरजेचे आहे.अन्यथा जुन्नर मध्ये यापुढे देखील बिबट्याच्या हल्ल्यात नागरिकांचे बळी जाण्याचे प्रमाण वाढतच जातील.
दोन दिवसांपूर्वी पिंपळवंडी येथील एका तरुणीवर बिबट्याने हल्ला करून तिला गंभीर जखमी केले होते. पिंपळवंडी ते काळवाडी हे अंतर अवघ्या तीन किलोमीटरचे आहे.तसेच दोन महिन्यांपुर्वी उंब्रज येथील साडेतीन वर्षीय बालक देखील बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेला होता.एक महिन्या पुर्वी शिरोली येथील एका मेंढपाळाचा मुलगा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडला होता.
बिबट्याच्या हल्ल्यात पाळीव प्राण्यांच्या मृत्युचे सत्र जुन्नर मध्ये खुप वर्षांपासून सुरु आहे.याबाबत शेतकरी वनविभागाला सहकार्य देखील करत होते.आता मात्र बिबट्यांचे मानवावर होणारे हल्ले वाढले असुन यात लहान बालकांना हकनाक मृत्यूला सामोरे जावे लागत आहे.लवकरात लवकर यावर कायमस्वरूपी उपाय करणे गरजेचे असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
घडलेली घटना दुर्दैवी असुन वनविभागाला यापुर्वी बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा काळवाडी येथे लावावा अशी मागणी मी केली होती. त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले तसेच हि घटना घडल्यानंतर देखील वनविभागाचे अधिकारी याठिकाणी लवकर हजर झाले नाहीत.वनविभाग या घटनांकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे यावरून दिसत आहे.
-तुषार वामन(सरपंच,काळवाडी)
काही दिवसांपुर्वी बिबट्या काळवाडी जवळील येडगाव धरण परिसरात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सोडले असल्याचे प्रत्यक्षदर्शी आमच्याकडे आहेत.आज घडलेली घटना हि खुप भयानक असुन शासनाने यावर जर उपाय केले नाहीत तर ग्रामस्थ शासनाविरोधात उद्रेक करतील.
-मनोज वामन(काळवाडी ग्रामस्थ)
दोन तीन दिवस काळवाडी परिसरात लाईट नव्हती. तसेच शेतीला पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी देखील शेतात जावे लागते यावर उपाय करणे गरजेचे.बिबट्याच्या भीतीमुळे ग्रामस्थ भयभीत झालेले आहेत.बिबट्याची दहशत आता किती दिवस सहन करावी लागणार.
-अजय बेल्हेकर शेतकरी,काळवाडी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.