पुणे : सातबारा हा शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय. परंतु कधी सातबारावरील क्षेत्र कमी-जास्त होते, नाव चुकले आहे, कधी क्षेत्रच जुळत नाही, तसेच हस्तलिखित सातबारामधील नावे, शेरे संगणकीकृत सातबारा उताऱ्यावर नाहीत. अशा चुकांमुळे शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत होता. त्यामुळे हवेली तहसील कार्यालयाने सातबारा संगणकीकरणातील दुरुस्ती मोहीम राबविल्याने संबंधित शेतकऱ्यांना अचूक ऑनलाइन सातबारा मिळणार आहे.
सातबारा संगणकीकरणामध्ये झालेल्या चुकांमुळे शेतकऱ्यांना जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार करता येत नव्हते. बॅंकेकडून कर्ज मिळण्यास अडचणी येत होत्या. त्यासाठी विसंगत सर्वे क्रमांक दुरुस्त करणे, हस्तलिखित सातबारा आणि त्यावरील फेरफार क्षेत्राचा मेळ घालणे आवश्यक होते.
या संदर्भात सातबारा संगणकीकरणामध्ये फेब्रुवारीअखेर असलेल्या चुकांमध्ये दुरुस्ती करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले होते. त्यानुसार हवेली उपविभागीय अधिकारी संजय आसवले आणि हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांनी मोहिमेची आखणी केली. नायब तहसीलदार संजय भोसले यांनी शिबिराचे नियोजन करीत हवेली तहसील कार्यालयात मंडप टाकून आठ मंडल अधिकारी आणि तलाठ्यांच्या उपस्थितीमध्ये सातबारा संगणकीकरणातील दुरुस्त्या करण्यात आल्या.
हवेलीतील ४४९ गटांमधील चुकांची दुरुस्ती
हवेली तालुक्यात वाढत्या नागरीकीकरणामुळे जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार वाढले आहेत. त्यामुळे पुणे शहरालगतच्या कात्रज, वाघोली, कळस, लोहगाव, धायरी, वडगाव, हिंगणे, कर्वेनगर, बालेवाडी, बाणेर गावातील एका सर्वे क्रमांकामध्ये शंभराहून अधिक खातेदार तर काही गावांमध्ये २० ते २५ पानी सातबारा उतारे तयार झाले आहेत. त्यामुळे काही प्रकरणांमध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बरेच फेरफार तपासावे लागले. हवेली तालुक्यातील ४४९ गटांमधील सातबारा संगणकीकरणाच्या चुका दुरुस्त करण्यात आल्या. तसेच, फेरफार अदालत घेऊन प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात आल्याचे हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.