वालचंदनगर (पुणे) : लॉकडाउनच्या काळामध्ये लासुर्णे (ता.इंदापूर) येथील शेतकऱ्याचे केळीच्या शेतीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मात्र लॉकडाउनच्या काळानंतर केळीचे भरघोस उत्पादन निघत असून व्यापाऱ्याने बांधावरच केळीची खरेदी सुरू केली आहे. एका किलोस १२ रुपयांचा दर मिळाला असल्यामुळे केळीने शेतकऱ्याला मालामाल केले.
येथील प्रमोद विठ्ठलराव निंबाळकर यांच्याकडे ११ एकर केळीचे क्षेत्र आहे. केळीची लागवड केल्यानंतर खोडवा, निडवा अशी तीन पिके घेतात. मार्च २०१९ मध्ये चार एकरामध्ये लागवड केलेल्या केळीचे उत्पादनास फेब्रुवारी २०२० मध्ये सुरवात झाली. दोन-तीन तोडे झाल्यानंतर लॉकडाउन सुरु झाला. आणि केळीच्या दरामध्ये अचानक घसरण सुरू झाली. ८ ते ९ रुपये किलो दराने विक्री होणाऱ्या केळीचा दर २ रुपयावरती आला. ७० ते ८० टन केळी तोट्यामध्ये विकावी लागली. व्यापाऱ्यांनी ही केळीची खरेदी करण्यास नकार दिल्याने शेवटच्या टप्यामध्ये १० ते १२ टन केळी फेकून दिली. केळीचा उत्पादन खर्च निघाला नसल्यामुळे मोठे नुकसान सहन करावे लागले. मात्र लॉकडाउनच्या अगोदर फेब्रुवारी २०२० मध्ये ३.५ एकरामध्ये केळीची लागवड केली होती. दिवाळीपूर्वी तोडणीस सुरवात झाली आहे.
केळीचा दर्जा चांगला असल्याने एका किलोस १२ रुपयांचा विक्रमी दर मिळत आहे. तसेच सर्व केळी आखाती देशातील इराण, कत्तारमध्ये निर्यात होत आहे. व्यापाऱ्यांने बांधावरती येऊन केळीची खरेदी केल्यामुळे निंबाळकर यांचा फायदा झाला आहे. व्यापारी केळीची ताेडणी करुन बांधावरच निर्यातक्षम केळीचे पॅकिंग करुन बांधावरच वजन करुन पैसे ही देत आहेत. ३.५ एकरामध्ये आत्तापर्यत ७५ टन केळीचे उत्पादन निघाले असून उर्वरित क्षेत्रामध्ये अजून ७७ ते ८० टन केळीचे उत्पादन निघेल अशी अेपक्षा आहे.
केळीच्या खताचे व्यवस्थापन केल्यामुळे केळीच्या उत्पादनामध्ये वाढ झाली असून दर्जा ही चांगला आहे. एक केळीच्या घडाचे वजन सरासरी ३५ ते ३८ किलो निघत आहे. प्रमोद निंबाळकर हे प्रगतशील शेतकरी असून त्यांना पुणे जिल्हा परिषदेचा कृषी भूषण आप्पासाहेब पवार पुरस्कार मिळाला आहे. तसेच सध्या बारामती तालुका सहकारी फलोउत्पादन संघाचे उपाध्यक्षपदावरती काम करीत असून केळीच्या शेतीसाठी बंधू विजय आणि सचिन तसेच पुतण्या अमित यांची माेलाची मदत होते.
केळीचे उत्पादन वाढविण्यासाठी या गोष्टी करा-
- सेंद्रिय खताचा जास्तीजास्त वापर.
- योग्य प्रकारे खताचे नियोजन.
- वेळच्या वेळी औषधफवारणी.
- चांगल्या दर्जाच्या फळनिर्मितीसाठी घडामधील केळीच्या फण्यांची संख्या नियंत्रित ठेवा.
- केळीच्या घडामधील शेवटच्या दोन फण्या लहान असतानाच काढा.
- इतर केळी उत्पादक शेतकऱ्यांशी वेळोवेळी चर्चा करुन अनुभवांची देवाणघेवाण करा.
- केळीची ७ फूट बाय ५ फुटावरती लागवड करुन एक एकारामध्ये सुमारे १२४४ टिशू कल्चर रोपे लावा.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by: Ashish N. Kadam)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.