पुणे - पर्वती जलशुद्धीकरण केंद्र ते लष्कर पाणीपुरवठा केंद्र दरम्यान टाकण्यात येणाऱ्या भूमीगत जलवाहिनीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. हे काम डिसेंबर महिन्यात पूर्ण होईल, त्यानंतर कालव्यातून पाणी उचलणे बंद होईल.
महापालिकेने 20 वर्षांपूर्वी पर्वती ते लष्कर पाणीपुरवठा केंद्र अशी बंद जलवाहिनी टाकली आहे. या जलवाहिनीतून दोनशे एमएलडी इतके पाणी या केंद्राला पुरविले जात आहे. मात्र, या केंद्रावर अवलंबून असलेले क्षेत्र वाढत आहे. लष्कर येथील पाणीपुरवठा केंद्र हे जुने झाल्याने ते पाडून त्या ठिकाणी नवीन जलकेंद्र उभे करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. नवीन जल केंद्र उभारण्यात आले असून, त्याची क्षमता प्रति दिन सव्वाशे एमएलडी इतकी असून, ती पुरेशी ठरणार नाही. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पर्वती जल शुद्धीकरण केंद्राची क्षमता वाढविली असून, त्या केंद्रातून लष्कर पाणीपुरवठा केंद्राला शुद्ध पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. याकरिता स्वतंत्रपणे भूमीगत जलवाहिनी टाकण्याचे काम 2015 मध्ये हाती घेण्यात आले आहे. हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. ते डिसेंबर महिन्यात पूर्ण होऊन, जानेवारी महिन्यापासून पर्वती जलशुद्धीकरण केंद्रातून या केंद्राला प्रति दिन 200 एमएलडी इतके शुद्ध पाणी थेट मिळू शकणार आहे.
* पर्वती जल शुद्धीकरण केंद्र ते लष्कर पाणीपुरवठा केंद्रा दरम्यानचे अंतर 6.2 किलोमीटर इतके आहे. त्यापैकी 5.9 किलोमीटर इतकी भूमीगत जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. केवळ तीनशे मीटर अंतराचे काम बाकी आहे.
* सुमारे 2200 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी टाकली जात आहे. यामुळे प्रति दिन 200 एमएलडी शुद्ध पाणी उपलब्ध होणार आहे. भविष्याची गरज ओळखून लष्कर पाणीपुरवठा केंद्रातील जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता वाढविण्यात येणार आहे.
* लष्कर पाणीपुरवठा केंद्राद्वारे सध्या 200 एमएलडी इतके पाणी कालव्यातून उचलावे लागत आहे. भविष्यात कालव्यातून पाणी कमी प्रमाणात उचलावे लागेल. या जलवाहिनीच्या कामासाठी सुमारे 110 कोटी रुपये इतका खर्च मंजूर आहे.
""भूमिगत जलवाहिनी टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. जानेवारी महिन्यापासून यातून लष्कर पाणी पुरवठा केंद्राला पाणीपुरवठा होईल. त्यानंतर कालव्यातून पाणी उचलण्याचे प्रमाण कमी होईल.''
- प्रवीण गेडाम, अधीक्षक अभियंता, पुणे महापालिका
""कालवा फुटीमुळे खडकवासला धरणातून पाणी सोडले जात नाही. त्यामुळे लष्कर पाणीपुरवठा केंद्रास पाणी उपलब्ध होत नाही. कालव्यातून पाणी सोडण्यास सुरवात झाल्यानंतर या केंद्रातून पाणीपुरवठा केला जाऊ शकतो. साधारणपणे उद्या सकाळपासून पाणीपुरवठा पूर्ववत होऊ शकतो''
- हेमंत देवधर, अधीक्षक अभियंता
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.