सिंहगड: सध्या सर्वत्र ऑनलाईन माध्यमांतून व्यवहार वाढत असताना आणि सरकारही ऑनलाईन पेमेंट पद्धतीचा अवलंब करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करत असताना वन विभाग मात्र सिंहगडावर जाणाऱ्या पर्यटकांकडून केवळ रोख स्वरूपात 'उपद्रव शुल्क' जमा करण्यासाठी हट्ट धरत आहे.
उपद्रव शुल्क रोख स्वरूपातच भरावे लागेल असा फतवा असल्याने सध्या ऑनलाईनच्या जमान्यात पर्यटकांची गैरसोय होताना दिसत आहे, तर या उपद्रव शुल्क 'ऑफलाईन' जमा करण्यामागे मोठे अर्थकारण दडले असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत.
सिंहगडावर जाण्यासाठी दुचाकीला पन्नास रुपये व चारचाकी वाहन असल्यास शंभर रुपये उपद्रव शुल्क घेतले जाते. उपद्रव शुल्क जमा करण्यासाठी वन विभागाने गोळेवाडी व घाट रस्त्यावरील कोंढणपूर फाटा येथे तपासणी नाके उभारलेले आहेत.
या ठिकाणी वन समितीचे कर्मचारी तैनात असतात. येणाऱ्या प्रत्येक वाहनाला थांबवून वाहनाच्या प्रकारानुसार हे कर्मचारी उपद्रव शुल्क रोख स्वरूपात भरण्याची सक्ती करतात. अनेक पर्यटक रोख पैसे नाहीत ऑनलाईनची सोय आहे का?
अशी विचारणा करतात त्यावेळी ऑनलाईन पेमेंट स्विकारण्याची सोय नसल्याचे सांगण्यात येते. तसेच काही कर्मचारी एटीएम ला जाऊन कॅश काढून आणा असाही सल्ला पर्यटकांना देताना दिसतात.
वन विभाग व वन समितीच्या या उपद्रव शुल्क रोखीनेच भरण्याच्या हट्टामुळे पर्यटकांची मात्र गैरसोय होत आहे,तर ऑनलाईन पेमेंटची सुविधा उपलब्ध न करण्यामागे मोठे अर्थकारण दडले असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
नागरिकांचा आरोप ज्यांच्याकडे उपद्रव शुल्क जमा करण्यासाठी रोख पैसे नसतात त्यांच्याकडून काही कर्मचारी स्वतःच्या वैयक्तिक खात्यावर ऑनलाईन पैसे घेतात. तसेच पैसे जमा केल्यानंतर ज्या मशिनमधून पर्यटकांना पावत्या दिल्या जातात त्या मशिमध्येही 'गडबड' असल्याचा आरोप नागरिक नाव न छापण्याच्या अटीवर करत आहेत.
उपद्रव शुल्काच्या माध्यमातून दरमहा लाखो रुपये जमा होतात त्यातील मोठ्या रकमेवर 'नियोजनबद्ध' पद्धतीने डल्ला मारला जात कसल्याचे नागरिकांचे म्हणणे असल्याने याबाबत चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे.
"उपद्रव शुल्क जमा करण्यासाठी माझ्याकडे रोख पैसे नव्हते. कोंढणपूर फाट्याजवळ कर्मचाऱ्यांनी मला पैसे रोखच भरावे लागतील ऑनलाईनची सोय नसल्याचे सांगितले. एका कर्मचाऱ्याने मला चार किलोमीटर अंतरावर एटीएम असून तेथून पैसे काढून आणण्याचा सल्ला दिला. शेवटी मी तेथील दुसऱ्या एका व्यक्तीला गुगल पे करुन त्याच्याकडून पैसे घेतले व उपद्रव शुल्क जमा केले."
- सतीश आडे, पर्यटक
"कोंढणपूर फाट्याजवळ थोडी मोबाईल नेटवर्कची समस्या आहे परंतु तरीही ऑनलाईन पेमेंट सुविधा उपलब्ध करण्यात काही अडचण नाही. अधिकाऱ्यांची बदली झाल्याने नवीन टीम आली आहे. पुढील दहा दिवसांमध्ये याबाबत कार्यवाही केली जाईल."
- प्रदीप संकपाळ, भांबुर्डा वनपरिक्षेत्र अधिकारी, वन विभाग,पुणे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.