सोमवारी सकाळी चासकमान धरणाच्या जलाशयात इको वाहन बुडल्याचे स्थानिक नागरिकांना दिसले.
कडूस - वेताळे-साकुर्डी (ता.खेड) रस्त्यावरील चासकमान धरणातील चाळीसगाव नळ पाणी पुरवठा योजनेच्या जॅकवेलजवळ एक इको वाहन नववर्षाच्या पहिल्याच रात्री (रविवार, ता.१) धरण जलाशयात बुडाल्याचे सोमवारी सकाळी आढळले. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळत आहे. परंतु हा प्रकार नक्की घातपात की अपघात, याचा पोलीस तपास करीत आहेत.
सोमवारी सकाळी चासकमान धरणाच्या जलाशयात एमएच १४ जेएक्स ८३३४ क्रमांकाचे इको वाहन बुडल्याचे स्थानिक नागरिकांना दिसले. यावेळी या वाहनात कोणीही नव्हते. धरण जलाशय परिसरातील एका खासगी रिसॉर्टमध्ये नववर्षाच्या पहिल्या दिवसाचे जल्लोषात स्वागत केल्यानंतर रविवारी रात्रीच्या सुमारास घरी परतत असताना साकुर्डी रस्त्यावरून हे वाहन धरण जलाशयात कोसळले. सोमवारी सकाळी अपघातग्रस्त वाहन क्रेनच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघातावेळी वाहनात तीन लोक होते.
वाहनासह जलाशयात गेलेल्या या तीन लोकांनी वाहनाच्या काचा फोडून आपली सुटका करून घेतल्याची माहिती स्थानिक नागरिक देत आहेत. परंतु स्वतः मद्यधुंद अवस्थेत असताना त्यात वाहन पाण्यात बुडालेले असताना वाहनाच्या काचा फोडून सुटका केलीच कशी, असा सवाल उपस्थित होत आहे. या रस्त्याच्या एका बाजूला उंच डोंगर तर दुसऱ्या बाजूला चासकमान धरणाचा विस्तीर्ण जलसाठा आहे. डोंगर, पाणी व झाडाझुडपांच्या परिसरात दिवसा तुरळक वर्दळ असते, तर रात्रीच्या वेळी परिसर निर्जन असतो. या परिसरात असा विचित्र अपघात झाल्याने हा अपघाताचा बनाव आहे का, याचा तपास पोलीस यंत्रणा घेत आहे. हा अपघात की घातपात, याबाबत स्थानिक नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.