खुटबाव : घरातील तरुण उपवर झाला की आई-वडिलांना त्याच्या लग्नाचा घोर लागतो. पोरगं आता कर्तधर्त झालं म्हणून आई-वडील आपल्या पोरासाठी साजेशा तरुणीच्या स्थळाचा शोध सुरू करतात.
नेमकी हीच नस पकडून उपवर मुलांना वधू मिळवून देण्याच्या बहाण्याने गरीब मुलींना आणि लग्नाळू युवकांना फसविणारी एक टोळी पुणे जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात सक्रिय झाली आहे. ही टोळी लग्नाळू युवकांना (उपवर) टार्गेट करू लागली आहे. यातूनच तोतया नवरी, तिचे खोटे आई-वडील व मामा असे बनावट नातेवाईक बनून नियोजित उपवरांना लाखोंचा गंडा घालत आहे.
फसवणूक करणारी टोळी लग्न जमवून देण्याच्या नावाखाली कोट्यवधींची माया जमा करत आहे. त्यामुळे अशा फसवणुकीला कमाई करणारा व्यवसाय म्हणून लग्न जमविणारी टोळी सक्रिय झाली आहे.
लग्नासाठी इच्छुक असलेल्या तरुणांना आणि त्यांच्या पालकाला हेरायचे आणि तुमच्या मुलाला चांगले स्थळ मिळून देण्याच्या गोड-गोड गप्पा मारून, त्यांची लाखो रुपयांना फसवणूक करून पळून जायचे, असे टोळीच्या व्यवसायाचे स्वरूप बनले आहे.
यामुळे उपवराचे नियोजित वधूबरोबर लग्न करण्यासाठी दिलेले पैसे, खरेदी केलेले सोने-नाणे असे लाखोंचे नुकसान होत आहे. शिवाय पैसे जाऊनही तोतया नवरी पळून गेल्याने युवकांवर पुन्हा बायकोविनाच आयुष्य काढण्याची वेळ येत आहे.
लग्न होत नसलेल्या ग्रामीण भागातील तरुणांना हेरायचे. त्यांच्याकडून लाखो रुपये उकळून एकदा लग्न लावून द्यायचे, लग्नानंतर चार ते पाचच दिवसांत माहेरी जाऊन येते, असे सांगून तोतया नवरीने अंगावरील दाग-दागिन्यांसह कायमस्वरूपी फरार व्हायचे आणि दुसऱ्या उपवर तरुणाला गंडा घालण्यासाठी पुन्हा सज्ज व्हायचे, असे फसवणूक करणाऱ्या टोळीच्या गुन्ह्याचे स्वरूप असल्याचे पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण पोलिसांकडून सांगण्यात आले.
असाच प्रकार आज पुन्हा एकदा जिल्ह्यातील दौंड तालुक्यात उघडकीस आला. याआधी शिरूर, जुन्नर, आंबेगाव, राजगुरुनगर आणि हवेली तालुक्यात घडले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे दहापेक्षा अधिक अशा घटना उघडकीस आल्या आहेत.
दौंड तालुक्यातही असे प्रकार दिवसेंदिवस उघडकीस येऊ लागल्याचे यवत पोलिसांचे म्हणणे आहे. फसवणूक झाल्याचे सांगण्यास तरुणांचे कुटुंबीय पुढे येत नसल्याचेही घटनांमध्ये समोर येत आहे.
यवत पोलिस ठाण्यात नुकत्याच दाखल झालेल्या तक्रारीवरून आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. यापैकी तोतया नवरीसह पाच जणांना यवत पोलिसांनी अटक केली. देलवडी (ता. दौंड) येथील घटनेत इच्छुक नवरदेवाला लग्न जमवून देण्याचे आश्वासन यवतमधील बाबू चव्हाण यांनी २५ नोव्हेंबरला दिले.
लग्न जमवण्यासाठी पाच हजार रुपये इच्छुक नवरदेवाने संबंधित व्यक्तीला दिले. ‘नवरी पाहिली आहे. दोन लाखांची व्यवस्था करा,’ असे इच्छुक नवरदेवाला २८ नोव्हेंबरला सांगण्यात आले. ‘मुलगी दाखवण्याचा’ कार्यक्रम १३ डिसेंबरला झाला. इच्छुक नवरदेवाने दोन लाखांची रक्कम मध्यस्थ आणि विवाह संस्थेला दिली. त्यानंतर १३ डिसेंबरला नाशिकमध्ये लग्नही लावले.
पोलिसांकडे दाखल झालेल्या तक्रारीनुसार, लग्नानंतर दौंड तालुक्यातील घरी येत असताना नवरी-नवरदेवाच्या मोबाईलवरून अनोळखी नंबरवर व्हॉट्सॲप चॅटिंग व लोकेशन पाठवत होती. या गोष्टीचा नवरदेवाला संशय आला.
त्यामुळे त्याने घरातील लग्नाची पूजा थांबवली. त्यानंतर १७ डिसेंबरला सायंकाळी नवरीचे पाहुणे घरी आले. त्यांनी नवरीला दागिने करण्यासाठी घेऊन जाणार असल्याचे सांगितले. नवरदेवाने नकार दिल्याने पाहुण्यांनी दमदाटी केली.
या साऱ्या प्रकाराचा संशय आल्याने नवरदेवाच्या जवळचे नातेवाईक संतोष पवार यांनी यवत पोलिस ठाण्याचे निरीक्षक हेमंत शेडगे यांच्याशी संपर्क साधला. पोलिसांनी केलेल्या चौकशीनंतर हा प्रकार उघडकीस आला.
याप्रकरणी बाबू चव्हाण (रा. यवत, ता. दौंड), सिंधू माळी (रा. कोरेगाव भीमा, ता. शिक्रापूर), नवरीचा मामा सांडू यशवंत जाधव (रा. मड, जि. बुलडाणा), सतीश मधुकर जोशी (रा. अशोकनगर, सातपुते, जि. नाशिक), तोतया नवरी चित्रा अंभोरे आदींसह नऊ जणांवर गुन्हा दाखल झाला.
यापैकी तोतया नवरीसह आशा निकम, ज्योती लोखंडे, मेधा सोळंखी आणि आकाश कोटे या पाच संशयितांना अटक केली. या आरोपींपैकी आशा निकम अशाच पद्धतीने याआधी फसवणूक केल्याचा एक गुन्हा नाशिक जिल्ह्यातील वडनेर पोलिस ठाण्यात दाखल आहे, असे यवत येथील पोलिस उपनिरीक्षक आकाश शेळके यांनी सांगितले.
फसव्या टोळ्यांबरोबरच डेटिंग ॲप आणि फसव्या वधू-वर सूचक मंडळांपासून सावध राहणे गरजचे आहे. अशा ॲपवर किंवा वधू-वर सूचक मंडळांत नोंदणी करण्यापूर्वी खातरजमा करणे गरजेचे आहे.
१,००० - मुलांमागे
८६१ - मुली
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.