पिंपरी - शहरातील ३२ वर्षे जुन्या इंदिरा गांधी रेल्वे उड्डाण पुलाचे संरक्षक कठडे ठिकठिकाणी ढासळू लागले आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या बीआरटी विभागाच्या वतीने या पुलाचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करण्यात येत आहे.
हा रेल्वे उड्डाण पूल १९८५-८६ च्या सुमारास बांधण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून पुलाकडे गेलो असता, डावीकडे पिंपरी कॅम्प, पिंपरी गावाकडे जाता येते तर उजवीकडून भाटनगर-लिंक रस्त्यामार्गे चिंचवडला जाता येते. भाटनगरहून डावीकडे वळले असता पिंपरी कॅम्प, भाजी मंडईतही जाता येते. चिंचवडहून पुलावर आलो असता डावीकडे मोरवाडीकडे जाता येते. या पुलामुळे मुंबई-पुणे महामार्ग जोडला गेला आहे.
रोज चारचाकी, दुचाकी मिळून हजारो वाहने या पुलावरून ये-जा करीत असतात. पिंपरीतील मुख्य बाजारपेठेला जोडणारा हा महत्त्वाचा पूल आहे. गेल्या काही वर्षांपासून या पुलाच्या संरक्षक कठड्यांची दुरवस्था झाली आहे. डॉ. आंबेडकर चौकाकडून पुलाकडे येताना संरक्षक कठडे तुटलेले दिसतात. काही ठिकाणी कठड्यातील लोखंडी सळयाच स्पष्ट दिसतात. तशीच अवस्था पुलाच्या इतर बाजूंनाही आहे. पुलावरून भाजी मंडईकडे उतरणारा आणि दुसऱ्या बाजूने भाजी मंडईकडून पुलाकडे जाणाऱ्या जिन्याचे सिमेंट गायब झाल्याने तो धोकादायक झाला आहे.
शगुन चौकाकडे जाताना डाव्या बाजूला पुलाच्या बाहेरील बाजूचे सिमेंट उडालेले दिसते. तसेच काही ठिकाणी झुडपेही उगवलेली आहेत. अवजड वाहन जाताना पूल अक्षरश: हादरतो. काही अपवाद वगळता अनेक व्यावसायिकांनी अनधिकृतपणे अर्धे पक्के बांधकाम, अर्धे पत्र्याचे मिळून दुकाने थाटली आहेत.
खासगी संस्थेकडून पुलाची पाहणी पूर्ण
लांबी - 815 मीटर
रुंदी - 6.5 मीटर
बांधकाम वर्ष - 1985-86
अंदाजे आयुष्यमान 35 ते 40 वर्षे
इंदिरा गांधी उड्डाण पुलाचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करण्याचे काम एका खासगी संस्थेला देण्यात आले आहे. त्यांच्याकडून पुलाची पाहणी झाली आहे. ‘ऑडिट’चा अहवाल येत्या आठवडाभरात येणे अपेक्षित आहे. त्यानंतर खर्चाचा अंदाज काढण्यात येईल.
- विजय भोजने, प्रवक्ता, बीआरटी विभाग, महापालिका
पुलाची दुरवस्था झाली असून, तातडीने दुरुस्ती करण्याची गरज आहे; अन्यथा पूल कोसळू शकतो.
- संजय कुहारे, नागरिक, नाणेकर चाळ-पिंपरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.