पुणे : अवघ्या राज्याचे आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेली पुण्यातील विसर्जन मिरवणूक यंदा विक्रमी वेळ चालणार अशी शक्यता आहे. शहरातील मंडई, रंगारी, जिलब्या मारुती, दगडूशेठ असे प्रमुख गणपती रात्री बारापर्यंत जागेवरच होते. त्यामुळे यंदाची मिरवणूक दुपारी तीनपर्यंत संपणार, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
कोरोनाचं संकट दूर झाल्यानंतर यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यात आला. शुक्रवारी अनंत चतुदर्शीला विसर्जन मिरवणुकीतही याचा परिणाम दिसून आला. शहरातील लक्ष्मी रस्ता हा गणपती विसर्जन मिरवणुकीचा मुख्य मार्ग असतो. शुक्रवारी लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, केळकर रस्ता या विसर्जन मार्गावर दणदणाटाने आवाजाची
मर्यादा ओलांडली. डीजे, ढोल ताशांच्या आवाजामुळे विसर्जन मार्ग परिसरातून चालणे देखील अवघड झाले होते आवाजाने थरकाप उडत होता. दणदणाटामुळे रहिवाशांसह भाविकांनाही त्रासाला सामोरे जावे लागले.
नेमके चित्र काय?
> टिळक रोडवर मार्केटयार्डचे मंडळ एसपी कॉलेज समोर आले असता मोठी गर्दी झाली आहे. काही मंडळ जवळपास अर्धा तास एकाच जागेकरच आहेत. पथकांनी रस्त्या व्यापल्याने गणेश भक्तांना चालायला जागा राहिलेली नाही.
> कुमठेकर रस्त्यावर १० वाजेपर्यंत ६ मंडळे पास झाली. मंद गतीने मंडळाचे गणपती पुढे सरकत आहे. वाद्य पथकांची संख्या यंदा तुलनेने जास्त, डिजेच्या तालावर तरुणाई थिरकतेय. प्रचंड उत्साह आणि गर्दी. कुमठेकर रस्त्याला आडव्या येणाऱ्या गणपतीची संख्या जास्त.
> बेलबाग चौकात गर्दी अनियंत्रित झाली होती. शेवटी पोलिसांनी अनोखी शक्कल लढवली. लोकांना शांत करण्यासाठी चक्क राष्ट्रगीत लावण्यात आले होते. राष्ट्रगीत लागताच लोक स्तब्ध उभे राहत होते. डीजेचा वापर वाढला, नागरिकांना त्रास विसर्जन मार्गावरुन मानाची मंडळे मार्गस्थ झाल्यानंतर सायंकाळनंतर ध्वनीवर्धकांच्या दणदणाट सुरू झाला. अनेक मंडळांनी डीजेसहप्रखर प्रकाशझोत सोडले होते. डीजेसमोर तरुणाई बेधुंद नाचत असल्याचे पाहायला मिळाले. बाजीराव रस्तामार्गे कुमठेकर रस्त्यावरील मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या मंडळाने उच्चक्षमेतेचे स्पीकर वापरले.
पोलीस सक्रीय होणार?
विसर्जन मार्गावर मंडळे मंदगतीने पुढे सरकत आहे. रात्रीदेखील असाच प्रकार सुरू राहिल्यास पोलीस पहाटे सक्रीय होतील, अशी शक्यताही वर्तवली जात आहे. पोलीस सक्रीय झाल्यास विसर्जन सोहळा दुपारी दोनपर्यंत संपेल अन्यथा तीन किंवा चार वाजेपर्यंत हा सोहळा चालेल, अशी चर्चा उपस्थितांमध्ये सुरू होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.