पुणे - निर्माल्य, टाकाऊ अन्न, खाद्यपदार्थ किंवा जुने कपडे अशा विविध प्रकारचा कचरा मुळा, मुठा, राम नदीच्या पाण्यात टाकण्याचा प्रकार नागरिकांकडून सर्रासपणे केला जातो. महापालिकेने पुलांवर संरक्षित जाळ्या लावल्या व फलक लावले तरीही त्यात सुधारणा होत नाही.
परंतु, लष्करातून वरिष्ठ पदावरून निवृत्त झालेला एक अधिकारी मात्र अशा नागरिकांना दररोज नदीमध्ये कचरा टाकू नका, अशी विनंती करतो. काहीजण ऐकतात, काही हुज्जत, वादही घालतात. पण ते त्यांचे काम करतात. त्यांच्या प्रयत्नांमुळे हळूहळू बदल घडतोय. ही व्यक्ती आहे ७२ वर्षी ब्रिगेडिअर भालजी जडे (निवृत्त)!
औंधमधील नागरस रस्त्यावरील सुरक्षा एन्क्लेव्ह सोसायटीत राहणारे जडे हे २०१० मध्ये भारतीय लष्करातून निवृत्त झाले. लष्करी शिस्तीत निम्मे आयुष्य गेल्याने आजही नियमितपणे व्यायाम, १० किलोमीटर सायकलींग करतात. त्यावेळी औंध येथील राम नदीवरील राजीव गांधी पूल, महादजी शिंदे पूल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूल अशा वेगवेगळ्या पुलांवर थांबून जडे नागरिकांना नदीमध्ये कचरा न टाकण्याचे आवाहन करतात.
काही नागरिक त्यांचे ऐकतात, पुन्हा अशी चूक न करण्याचे आश्वासन देऊन माफीही मागतात तर काहीजण त्यांच्याशी हुज्जत, वाद घालतात. अनेक कटू प्रसंग अनुभवण्यास येऊनही जडे यांनी जनजागृतीचे काम थांबविलेले नाही. गेल्या १२ ते १३ वर्षांपासून त्यांच्याकडून ही सेवा सुरूच आहे.
केवळ तेवढेच नव्हे, तर नागरिकांकडून घडणाऱ्या चुकीच्या कृतींना ते विरोध दर्शवितात. तसेच राम नदी पुनर्जिवीत करण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या ‘जीवित नदी’ या उपक्रमातही त्यांचा सक्रिय सहभाग असतो.
जडे सांगतात, ‘नदी स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत. कचरा टाकणाऱ्यांना समजावून सांगताना अनेकदा वादाचे प्रसंग घडतात. परंतु, आपले काम चांगले आहे, हे देखील लोकांना पटत आहे. प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने प्रयत्न केल्यास नदीमध्ये कचरा टाकला जाणार नाही. महापालिका प्रशासनानेही नदीत कचरा टाकण्याच्या तक्रारींची दखल घेऊन योग्य कारवाई केली पाहिजे.’
नदीत कचरा टाकू नये, यासाठी मी जनजागृती करत आहे. काही अपवाद वगळता नागरिक चांगला प्रतिसाद देतात. पूर्वीच्या तुलनेत आता नागरिकांमध्ये बदल घडत आहे. भविष्यात हे चित्र आणखी सकारात्मक दिसेल.
- भालजी जडे, निवृत्त लष्करी अधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.