पुणे - भूजल माहिती (Groundwater Information) व तंत्रज्ञान केंद्राच्या (Technology Center) माध्यमातून नवीन अत्याधुनिक प्रणालीद्वारे भूजल विकास व व्यवस्थापनाचा आराखडा (Plan) तयार करणे शक्य होणार आहे. त्याचा राज्यातील सर्वसामान्य जनतेला लाभ होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केला.
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून येथील ‘भूजल भवना’त भूजल माहिती व तंत्रज्ञान केंद्र उभारण्यात येत आहे. या केंद्राचे भूमीपूजन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री पवार, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे आदी दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. तर, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता सुभाष भुजबळ, भूजलच्या उपसंचालक भाग्यश्री मग्गीरवार आदी या वेळी उपस्थित होते.
पवार म्हणाले, या केंद्राच्या माध्यमातून शहरी आणि ग्रामीण भागातील भूजलाचे व्यवस्थापन करण्यात येणार आहे. यामुळे पाण्याच्या मागणीचे योग्य व्यवस्थापन करणे शक्य होईल. भूजल पातळी वाढविण्यासाठी लोकसहभागातून पाण्याचे योग्य नियोजन करण्याची गरज आहे. या केंद्राचे काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण होऊन वेळेत प्रत्यक्ष कामाला सुरवात होईल.
पाणीपुरवठा मंत्री पाटील म्हणाले, भूगर्भातील भूजल तपासणी करण्यासाठी भूजल माहिती व तंत्रज्ञान केंद्र महत्त्वपूर्ण ठरणार आहे. पाण्याचे सूक्ष्म नियोजन करून त्याचा योग्य वापर करणे काळाची गरज आहे. 'हर घर जल, हर घर नल' योजनेच्या माध्यमातून पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार केंद्राच्या मदतीने काम करीत आहे. प्रास्ताविक भूजल सर्वेक्षणचे आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी केले. तर, सहसंचालक डॉ. पी. एल. साळवे यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.