पुणे - आगामी लग्नसराई आणि गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोने-चांदीचे दागिणे घेणाऱ्यांची संख्या वाढल्याने सराफ बाजाराला मंगळवारी (ता. ९) मोठी झळाळी आली. सोन्याचे भाव वाढण्याच्या आधीच खरेदी करण्यासाठी गेल्या आठवड्यापासून सुरू झालेल्या गर्दीने मंगळवारी उच्चांक गाठला होता. अनेक ग्राहकांनी आधीच बुकिंग करून ठेवले होते. गुढीपाडव्याच्या निमित्ताने त्यांनी दागिन्यांची डिलिव्हरी घेतली.
मुर्हूतावरील खरेदी आणि नागरिकांना आकर्षित करण्यासाठी सराफ व्यवसायिकांकडून गुढीपाडव्याच्या निमित्ताने देण्यात आलेल्या विविध ऑफर यामुळे मंगळवारी सकाळपासूनच सराफ बाजारात गर्दी झाली होती. सराफ व्यावसायिकांनी दिलेल्या ऑफरचा ग्राहकांनी फायदा घेतल्याचे चित्र सराफ बाजारात पाहायला मिळाले.
गेल्या दोन आठवड्यापासून सोन्या-चांदीच्या दरात वाढ होत आहे. त्यामुळे खरेदीसाठी थांबलेल्या अनेकांनी आजचा मुहूर्त साधत त्यांच्या आवडीच्या दागिन्यांची खरेदी केली. या सर्वांत लग्नासाठी आवश्यक असलेल्या दागिन्यांची सर्वाधिक विक्री झाली. गंठण, मंगळसूत्र, मिनी गंठण, बांगड्या, पाटल्या आणि अंगठ्या यांचा त्यात प्रामुख्याने समावेश होता. तर गुंतवणुक म्हणून वेढणीला देखील मोठी मागणी होती. आगामी लग्नसराई, भावात होत असलेली वाढ यामुळे यंदा लग्नाच्या दागिन्यांची जास्त खरेदी झाली.
या दागिन्यांची झाली मोठी खरेदी -
वेढणी, मंगळसूत्र, गंठण, मीनी गंठण, बांगड्या, पाटल्या, चेन, ब्रेसलेट
गेल्या वर्षभरात सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. मात्र तरी देखील बाजारात खरेदीसाठी तेजी आहे. उन्हामुळे दुपारी प्रतिसाद थंडावला होता. मात्र संध्याकाळी पुन्हा खरेदीत उत्साह होता. ग्राहकांची सध्या वेढणी घेण्यापेक्षा दागिने खरेदी करण्यास पसंती असल्याचे दिसते. मुर्हूताला खरेदी करणाऱ्यांची संख्या मात्र वाढली आहे. लग्नासाठीच्या दागिन्यांची देखील खरेदी नागरिकांनी केली.
- अतुल अष्टेकर, भागीदार, कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स
गुढीपाडव्याच्या निमित्ताने आम्ही दरवर्षी सोन्याची खरेदी करतो. त्यानुसार आम्ही आज देखील सोने घेतले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सोन्याच्या दरात सुमारे २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे माझ्या ठरलेल्या बजेटमध्ये यावेळी कमी खरेदी झाली. मात्र याचा आनंद आहे की, सोन्याच्या गुंतवणुकीवर चांगला फायदा झाला आहे.
- अशोक जोशी, खरेदीदार
९ मार्चचे दर -
सोने २४ कॅरेट - ७१,७८१
सोने २२ कॅरेट - ६६,८०६
चांदी - ८२,१०० (प्रतिकिलो)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.