हडपसर येथील उड्डाणपूल वाहतुकीस धोकादायक झाला असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे पूलावरील वाहतूक गेली तीन दिवसांपासून पूर्ण बंद करण्यात आली.
हडपसर - येथील उड्डाणपूल (Flyover) वाहतुकीस (Transport) धोकादायक (Dangerous) झाला असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे पूलावरील वाहतूक गेली तीन दिवसांपासून पूर्ण बंद (Close) करण्यात आली असून दुरुस्तीच्या कामासाठी पुण्याहून होणारी वाहतुक पुढील वीस दिवस तर सोलापूर, सासवडकडून होणारी वाहतुक सुमारे दोन महिने बंद राहणार आहे. आमदार चेतन तुपे यांनी या कामाशी संबंधित अधिकाऱ्यांची हडपसर क्षेत्रीय कार्यालयात बोलावलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
गेली वीस दिवसांपूर्वी हा पूल हदरत असल्याची तक्रार काही नागरीकांनी केली होती. त्याची दखल घेऊन तज्ञांकडून पूलाची पाहणी केली असता त्यामधे पूलाच्या बेअरींगची झीज व मंत्री मार्केट समोरील पीलर -१७ ला तडा गेल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे पूलावरील वाहतूक तातडीने बंद करण्यात आली आहे. पूलाच्या दुरुस्तीचे काम सुरु करण्यापूर्वी वाहतूक व इतर गोष्टींच्या नियोजनासाठी ही बैठक बोलवण्यात आली होती.
वाहतूक शाखेचे उपायुक्त राहुल श्रीरामे, परिमंडळ पाचच्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, पालिकेच्या अधिक्षक अभियंता सुष्मिता शिर्के, कार्यकारी अभियंता इंद्रभान रणदिवे, सहाय्यक आयुक्त प्रसाद काटकर, पोलीस निरिक्षक मनिषा झेंडे, पोलिस निरिक्षक अरविंद गोकुळे, नगरसेवक योगेश ससाणे, मारुती तुपे, संजय घुले, वैशाली बनकर, हेमलता मगर यांच्यासह माजी नगरसेवक सुनील बनकर, पथारी पंचायतचे मोहन चिंचकर, अण्णा पानकर, अमोल हरपळे, डॉ. शंतनु जगदाळे, योगेश सूर्यवंशी, संजय शिंदे, महेश ससाणे, सागर भोसले आदी उपस्थित होते.
पूलाच्या दुरुस्तीचे काम होईपर्यंत फुलाच्या तीनही बाजूची वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. ही संपूर्ण वाहतूक पुलाखालून वळविण्यात आली आहे. आवश्यक सेवेतील जड वाहनांना रात्री दहानंतर सकाळी सहापर्यंत या मार्गावरून प्रवास करता येईल. गाडीतळ येथील चक्राकार मार्गासह पूलाच्या परिसरातील सर्व बंद व पोलिसांनी जप्त केलेली वाहने माळवाडी येथे हलविण्यात येतील. गाडीतळ येथील कालव्यावरील बस थांबा हटवून पुढे गांधी चौकाजवळ येणार आहे. काही पंक्चर बंद करण्यात येणार आहेत. कालव्यावरील रस्ते, कच्चे डीपी रस्ते वाहतुकीयोग्य करून त्यावरून वाहतूक होईल. पूलाखालील पथारी व्यवसाय हलवून तेथून वाहतूक सुरू करण्यात येणार आहे. हडपसर सावली कॉर्नर, गाडीतळ, रवी दर्शन, आकाशवाणी या ठिकाणी उभ्या राहणाऱ्या खाजगी प्रवासी बसेस व इतर वाहने मत्स्य बीज केंद्रजवळ व त्या पुढे उभे राहतील. मुख्य मार्गावरील रिक्षा थांबे बंद राहतील. हिंगणे मळा कालव्या वरून वाहतूक केली जाईल. वाहतूक नियंत्रणासाठी पीएमपीएलचे कर्मचारीही पोलिसांना मदत करतील, असे निर्णय या बैठकीत घेण्यात आले आहेत.
'पूलाच्या दुरुस्तीचा प्रश्न महत्त्वाचा असल्याने नागरिकांनी अनावश्यक वाहने घेऊन बाहेर पडू नये हडपसर परिसरात होणारी कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने लांबचा असला तरी पर्यायी मार्गाचा वापर करावा पोलीस पालिका व वाहतूक प्रशासनाला सहकार्य करावे पंधरा दिवसांनी पुण्याकडून सोलापूरच्या दिशेने होणारी वाहतूक काही प्रमाणात पुलावरून सुरू होईल मात्र सोलापूर कडून होणारी वाहतूक सुरू होण्यास दोन महिन्याचा कालावधी लागेल त्यासाठी नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे आहे'.
- चेतन तुपे, आमदार
दरम्यान, पूलावरील वाहतूक बंद झाल्याने गेली तीन दिवसांपासून हडपसर परिसरात मोठी कोंडी होत आहे. अंतर्गत रस्त्यावरही वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या रांगा लागत आहेत. त्यामुळे महत्वाच्या कामासाठी बाहेर पडणारे नागरिक, कामगार, विद्यार्थी यांना इच्छित स्थळी वेळेत पोहचता येत नाही. रूग्णवाहिका अडकून पडत आहेत. पूलाच्या दोन्हीही बाजूला सुमारे दोन किलोमीटर पर्यंत वाहनांची रांग लागत आहे. हलकी वाहने पूलावरून सोडण्याच्या दृष्टीने हाईड बँरिकेड लावण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.