Pune Rain esakal
पुणे

Pune Rain : पुणेकरांना भर मुसळधार पाऊस, तुफानात सोडणाऱ्या प्रशासनाची 'सुट्टी' कधी?

सकाळ डिजिटल टीम

रस्त्यांप्रमाणेच ओढे, नाले पाण्याने भरून वाहत होते. नागरिक घाबरले होते, या सगळ्या परिस्थितीत पुणेकरांचे पालकत्व असणारी महापालिका मात्र कुठेच नव्हती.

पुणे : काही वर्षापूर्वी आंबिल ओढ्याला तुफान पूर आला, हाडामासाची माणसं अक्षरशः जनावरासारखी वाहून गेली, त्या रात्रीही महापालिका प्रशासन (Pune Municipal Corporation) ढिम्मच होतं, तीच परिस्थिती मंगळवारी (ता. 4) पुण्यावर ओढवली. चव्हाणनगर, धानोरी, कळस, विश्रांतवाडीत घर, दुकाने, सोसायट्यांमध्ये पाणी गेले, वाहनांबरोबर माणस वाहत जात होती, पण इथेही ना महापालिकेचे अधिकारी होते ना कर्मचारी.

शनिवारी पुन्हा एकदा तुफान पाऊस (Heavy Rain in Pune) आला, रस्त्यांच्या नद्या झाल्या, ओढे-नाले भरून वाहू लागले, गुडगाभर पाण्यामुळे वाहने रस्त्यातच बंद पडली, घरादारात पाणी घुसले, माणसे आहे तिथेच अडकून पडली, या सगळ्या संकटात त्यांच्या मदतीसाठी ना महापालिकेची यंत्रणा होती, ना अधिकारी-कर्मचारी.. मुसळधार पावसात, तुफानात पुणेकरांना सोडणाऱ्या निगरगट्ट प्रशासनाची आता तरी "सुट्टी' होणार का? असा प्रश्‍न सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झाला आहे.

लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असतानाच पुण्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. धनकवडी, चव्हाणनगर, बिबवेवाडी तसेच कळस, धानोरी, वडगाव शेरी, विश्रांतवाडी या परिसरात पाण्याचा लोंढा रस्त्यावर येऊन रस्ते बंद झाले, अनेक घरे, दुकाने, सोसायट्यांमध्ये पाणी घुसल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. इथेही महापालिकेच्या आपत्कालीन यंत्रणा रस्त्यावर ना रस्त्यावर दिसली, ना नागरिकांना त्यांनी धीर दिला.

पाहणी दौऱ्यांच्या सोपस्कारानंतरही महापालिका प्रशासनाला जाग आली नाही. शनिवारी पुण्यात जोरदार पाऊस होणार, असा हवामान खात्याने इशारा दिला होता. त्याचीही दखल महापालिका प्रशासनाला घ्यावी वाटली नाही. आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली नाही, त्याविषयी लोकांना माहिती दिली नाही. अखेर शनिवारी (ता. 8) सायंकाळी पाच वाजता पावसाला सुरवात झाली आणि अवघ्या पुण्याला पावसाने आपल्या कवेत घेतलं. पावसाचा जोर अचानक वाढला, 20 ते 30 मिनिटातच रस्त्यांवरून पाणी वाहू लागले. शहरातील मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते, मध्यवर्ती भागातील पेठा, उपनगरांमधील गावठाण, वाडे, सोसायट्यांमध्ये पाणी घुसले.

अनेक भागात कमरेइतक्‍या पाण्यातून जीव मुठीत घेऊन नागरिक घरी जाण्यासाठी धडपडत होते. कुठल्या चेंबरचे झाकण उघडे असेल, कुठली वीजेची तार पाण्यात पडलेली असेल, मृत्यु असा कुठल्या पावलांनी येईल, याची तमा न बाळगता नागरिक वाट शोधत होते. नोकरी, व्यवसाय उरकून घरी निघालेल्यांची दुचाकी, रिक्षा, टेम्पो, कार यांसारखी वाहने रस्त्यावरील पाण्यामुळे बंद पडली. वाहतूक कोंडीमध्ये अडकलेली वाहने व बसमधील प्रवाशांवर तर अक्षरशः रडण्याची वेळ आली. अनेक नागरिकांनी मिळेल, तिथे आसरा घेतला. मात्र बसस्थानके, एसटीस्थानके, बसथांबे देखील पाण्यात बुडाल्याने नागरिकांना थांबावे तरी कुठे असा प्रश्‍न पडला. मुसळधार पावसात अडकलेल्या नागरिक त्यांच्या कुटुंबीयांना "लवकरच घरी पोचतो' अशा शब्दात धीर देत होते.

रस्त्यांप्रमाणेच ओढे, नाले पाण्याने भरून वाहत होते. नागरिक घाबरले होते, या सगळ्या परिस्थितीत पुणेकरांचे पालकत्व असणारी महापालिका मात्र कुठेच नव्हती. काही अपवाद वगळता रस्त्यावरील पाणी काढणे, अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढणे, घरे, सोसायट्यांमधील पाणी बाहेर काढणे अशा कोणत्याही कामासाठी महापालिकेची आपत्कालीन यंत्रणा दिसत नव्हती. सर्वसामान्य पुणेकर संकटात सापडलेला असताना, महापालिका प्रशासन मात्र शनिवारच्या सुट्टीवर होते. सलग दुसऱ्यांदा पावसामुळे पुणेकरांची तारांबळ उडूनसुद्धा महापालिका प्रशासन ढिम्मच होते. पुण्याचे कारभारी आता तरी महापालिका प्रशासनाची "सुट्टी' करण्यासाठी प्रयत्न करणार का? की त्यासाठी देखील आणखी पुणेकरांचे बळी जाण्याची वाट पाहायची!

मी अडकलेय, मला सोडवं!

माझी गाडी पावसाच्या पाण्यात अडकून पडली आहे. गाडीवरून पाणी वाहतेय. मी अडकलेय, मला सोडव, अंकीताचे शब्द ऐकून तिचा मित्र विशाल पुरता हादरला. दोन किलोमीटर अंतरावर नरवीर तानाजी वाडी परिसरात असलेल्या मैत्रिणीच्या मदतीसाठी तत्काळ धावला. काही वेळातच तिथे पोचून तिला धीर दिला, नागरिकांनी तिची गाडी तोपर्यंत बाजूला घेतली होती. अंकीताला घेऊन विशाल व त्याचा मित्र तिच्या घराच्या दिशेने निघाले, या स्वरूपाचे अनेक प्रसंग शनिवारी सायंकाळी पुणेकरांच्या वाटेला आले!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT