How was the leopard caught in Katraj Zoological Museum-pune marathi news esakal
पुणे

Katraj Zoological Museum: कात्रज प्राणी संग्रहालयातील बिबट्याला कसं पकडलं? ‘सचिन’ ४० तासांनी असा झाला धावबाद

Katraj Zoological Museum: कात्रज येथील प्राणी संग्रहालयाच्या पिंजऱ्यातून सोमवारी (ता. ४) पहाटे बाहेर पडलेल्या बिबट्याला मंगळवारी (ता. ६) रात्री नऊ वाजता पकडण्यात प्रशासकीय यंत्रणेला यश आले.

सकाळ वृत्तसेवा

Katraj Zoological Museum:

पुणे, ता. ५ : कात्रज येथील प्राणी संग्रहालयाच्या पिंजऱ्यातून सोमवारी (ता. ४) पहाटे बाहेर पडलेल्या बिबट्याला मंगळवारी (ता. ६) रात्री नऊ वाजता पकडण्यात प्रशासकीय यंत्रणेला यश आले. बिबट्या प्राणी संग्रहालयाच्या परिसरातच होता. त्याला जेरबंद करण्यासाठी प्राणिसंग्रहालय, वन खाते, बचाव कार्यातील संस्था, पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी सुमारे ४० तास शर्थीचे प्रयत्न केले.

राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या पिंजऱ्यात ठेवलेल्या ‘सचिन’ नावाचा साडेसात वर्षीय बिबट्या सोमवारी पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान पिंजऱ्यातून बाहेर आला. पिंजऱ्याचा वरच्या बाजूचा गज निघाला होता. त्या दोन गजांमधून बाहेर पडताना त्याचे केस गजांना लागल्याचे दिसते. बिबट्या हा मार्जार कुटुंबातील ताकदवान प्राणी आहे. हा नर बिबट्या प्रौढ असल्याने तो गज वाकवून जाऊ शकतो, अशी माहिती संग्रहालयातील अधिकाऱ्यांनी दिली.

आव्हान कोणते?

कात्रज प्राणिसंग्रहालयाचा परिसर १३० एकरचा आहे. त्यापैकी ३० एकरांचे तळे आहे. उर्वरित १०० एकर परिसरात तो नेमका कुठे आहे, याचा शोध घेण्याचे आव्हान प्रशासनापुढे आहे. दिवसभर प्राणी संग्रहालयातील तो पाण्याच्या टाकीजवळ असल्याची माहिती होती.

त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी कर्मचारी तैनात केले होते. त्याला पकडण्यासाठी तेथे पिंजरे ठेवले. त्यात बिबट्यासाठी खाद्यही ठेवले होते. खाण्यासाठी आलेल्या बिबट्याला सापळ्यात अडकविण्याची सर्व तयारी झाली होती. पण, बिबट्या त्या पिंजऱ्यात आला नाही. तो दिवसभर तेथेच होता, असे निरीक्षणही त्यांनी नोंदविले.

...अशी वाढली चिंता

बिबट्या पिंजऱ्यातून बाहेर पडल्यानंतरही प्राणिसंग्रहालय सोमवारी दिवसभर नियमितपणे सुरू होते. तेथील प्राणी पहाण्यासाठी अबालवृद्धांची गर्दी झाली होती. बिबट्या पिंजऱ्याबाहेर आल्याची माहिती संग्रहालयाच्या बाहेर मोजक्याच अधिकाऱ्यांना कळाली होती. पण सायंकाळपर्यंत प्राणी संग्रहालयाच्या प्रशासनाला त्याला पकडण्यात यश आले नाही. सकाळी कामावर आलेले कर्मचारी सायंकाळी सात वाजल्यानंतरही बिबट्याच्या शोधात होते.

त्याच वेळी रात्रपाळीवर आलेल्या कर्मचाऱ्यांनाही यात कामावर लावले. त्यानंतर बिबट्या पिंजऱ्यातून पळून १२ तास झाल्यानंतरही पकडला गेला नसल्याची माहिती वाऱ्याच्या वेगाने पसरली. त्यानंतर महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे घटनास्थळावर गेले. पोलिस, वन विभागातील अधिकारी, बचाव कार्य करणाऱ्या संस्था, अग्निशामक दलाचे कर्मचारी रात्रभर बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न करत होते. पण, त्यांना यश आले नाही. त्यामुळे चिंता वाढली.

सोमवारी रात्रभरात...

- प्राणी संग्रहालयात सोमवारी रात्री साडेआठपासून बिबट्याला पकडण्याचा हालचालींना वेग आला. सुरुवातीला संग्रहालयातील कर्मचाऱ्यांनी परिसरातील सर्व विद्युत दिवे बंद केले. अंधार झाल्याने बिबट्या खाण्यासाठी पिंजऱ्यात येईल, अशी अटकळ होती. पण दहापर्यंत शक्य झाले नाही.

- दहा वाजता पिंजऱ्यांची संख्या वाढविली. मात्र त्यातही बिबट्या आला नाही.

- संग्रहालयातील घनदाट झुडपांमध्ये तो जाऊन बसला. त्यामुळे त्याची हालचाल टिपणे शक्य होत नव्हते. त्यामुळे थर्मल कॅमेरे असलेले ड्रोन मागविण्यात आले. ते पहाटे पुण्यात पोहोचले.

- संग्रहालयातील झुडपे काढण्यासाठी रात्री बाराच्या सुमारास तीन बुलडोझर पाचारण केले.

- बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेऊन त्याला हार्ट मारून बेशुद्ध करण्यासाठी वेगवेगळ्या सहा ठिकाणी नेम धरून कर्मचाऱ्यांना सज्ज ठेवले होते.

- रात्री अडीचपर्यंत बिबट्या नेमका कुठे आहे, याचा शोध लागला नाही.

- संग्रहालयातील बॅटरीवर चालणाऱ्या गाड्यांच्या वाहनतळाजवळ

पहाटे पाच वाजता बिबट्या फिरत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले. त्यामुळे शोधकार्याला पुन्हा गती देण्यात आली.

- सकाळी सूर्योदयापर्यंत बिबट्याचा ठावठिकाणा लागला नव्हता.

मंगळवारी दिवसभरात...

- मंगळवारी प्राणिसंग्रहालय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.

- वनखात्याकडून आणलेले पिंजरे संग्रहालयात तैनात केले.

- थर्मल ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे शोध कार्य दुपारपर्यंत सुरू होते.

- वेगवेगळ्या ठिकाणांवर नवीन हालचाल टिपणारे मोशन कॅमेरे बसविले.

- संग्रहालयात येणाऱ्या नाल्यांमध्ये जाळ्या टाकून बिबट्याचे बाहेर जाण्याचे मार्ग बंद केले.

-संग्रहालयातून बिबट्या नागरी वस्तीत जाण्याची शक्यता आहे ते सर्व मार्ग चेन टाकून बंद केले.

- मादी बिबट्या असलेल्या पिंजऱ्याच्या जवळ नर बिबट्याच्या पायाचे ठसे दिसले.

- दिवसभर उन्हामुळे दाट झाडीत बसलेल्या बिबट्या पुन्हा दिसला नाही.

- सूर्यास्तानंतर पुन्हा नव्या जोमाने शोधमोहीम हाती घेतली.

...असा झाला जेरबंद

बिबट्या प्राणी संग्रहालयात जेथे-जेथे दिसला आणि त्याच्या पायाचे ठसे होते, त्या प्रत्येक ठिकाणी पिंजरे लावले होते. त्या प्रत्येक पिंजऱ्यात खायला मांस ठेवले होते. असे नऊ पिंजरे वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले होते. तो ज्या पिंजऱ्यातून बाहेर पडला त्याचे दारही उघडून त्यात मांस ठेवले होते. त्याने रविवारी सायंकाळी आठ वाजता मांस खाल्ले होते. त्यामुळे तो आता भुकेने व्याकूळ झाला होता. तो जवळच असलेल्या पिंजऱ्यात अन्नाच्या शोधात आला.

त्याने पंधरा-वीस मिनिटे वेगवेगळ्या प्रकारे आवाज करून सुरक्षिततेची खात्री केली. तो पिंजऱ्याजवळ घुटमळला. त्यानंतरच तो पिंजऱ्यात गेला. पिंजऱ्यात जाताक्षणी आपोआप दार बंद झाले आणि त्याला जेरबंद करण्यात यश आले. तो सांबर खंदकाजवळ नऊ वाजून सात मिनिटांनी पिंजऱ्यात जेरबंद झाला, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pohardevi Mahant Left Shivsena UBT : विदर्भात ठाकरेंना फटका बसणार? पोहरादेवीच्या महंतांनी 'हे' गंभीर आक्षेप घेत सोडला पक्ष

Latest Maharashtra News Updates Live : काँग्रेसमधून निलंबन झालेल्या सुलभा खोडके अजित पवारांच्या राष्ट्रवादीत दाखल

Malaika Arora : व्हिडीओ जॉकी म्हणून सुरुवात ते आता आघाडीची आयटम क्वीन ; मलायका आहे इतक्या संपत्तीची मालकीण

Reliance-Disney Deal: मुकेश अंबानींना विकावे लागणार 7 चॅनेल्स; तरच होईल रिलायन्स डिस्ने डील

आणि ती माउली हसली ते शेवटचीच... जेव्हा मित्राने आईला संदीपचं नाटक दाखवायला आणलं, अभिनेता किस्सा सांगत म्हणाला-

SCROLL FOR NEXT