आळंदी - बारावीच्या परीक्षांचा निकाल लागला. विद्यार्थी पालक वर्गात आनंदाचे वातावरण झाले. असाच आनंद आळंदीतील सोपानजाई पार्क सोसायटीमधील एकोणसत्तर वर्षांच्या आजीबाईंच्या घरी आहे. कमल विठ्ठल मरकळे (सुषमा सुधाकर जानवेकर) असे आजीबाईंचे नाव आहे. या तब्बल पंचेचाळीस वर्षांपूर्वी दहावी झाल्या होत्या. जिद्द आणि कष्टाला वयाची मर्यादा नसते. यातूनच त्या यंदाच्या वर्षी बारावीच्या परीक्षेस बसल्या.
पहिल्याच प्रयत्नात चांगल्या गुणांनी उत्तीर्णही झाल्या. प्रथम श्रेणी मिळवलेल्या मरकळे आजींच्या या यशाने आळंदीकर आणि मरकळमधील स्नेही अभिनंदनाचा वर्षाव करत असल्याचे चित्र आहे. तर पहिल्याच प्रयत्नात पास झाल्याने मरकळे आजीच्या आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
कमल मरकळे हे त्यांचे माहेरचे नाव. तर सासरचे सुषमा जानवेकर. कमल मरकळे आजी यांचे आळंदीजवळील मरकळ हे माहेर आहे. १९७८ साली त्या दहावीची परिक्षा उत्तीर्ण झाल्या होत्या. त्यानंतर लग्न झाले आणि शिक्षणात खंड पडला. कौटुंबिक जबाबदारी, चूल मुल यामुळे पुढे काही करता आले नाही. एक मुले आणि मुली चांगल्या शिकल्या. त्यांची लग्नेही झाली. आता घरात बसून काय करायचे.
रेडिओवर आकाशवाणीचा कार्यक्रम ऐकायची त्यांना आवड होती. असेच एकदा १ आॅक्टोबर २०२३ रोजी त्यांनी दहावीची परीक्षा शाळेत न जाता बाहेरूनही १७ नंबरचा फॉर्म भरून परिक्षा देता येते, असे ऐकले होते आणि त्यांच्या मनात शिक्षणाची इच्छेने उभारी घेतली.
आळंदीतील संत ज्ञानेश्वर विद्यालयात दहावीच्या परीक्षेच्या प्रवेशाबाबत चौकशी केली. अभ्यासक्रम आणि अभ्यास कसा करायचा याबाबत माहिती घेतली. अनेकदा अभ्यासाबाबतच्या शंकाही शिक्षकांना विचारल्या. सर्वांनी या आजीबाईंना मार्गदर्शन केले. आजीबाईंच्या शिक्षणाबाबतचे कुतूहल पाहून शिक्षकांनी सर्वतोपरी मदत केली. अवघ्या साडेचार ते पाच महिने अभ्यास करून पहिल्याच प्रयत्नात आजीबाई पास होत प्रथम श्रेणी मिळवली. त्यांना ६२ टक्के मिळाले. जिद्द आणि चिकाटीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पदवीच्या शिक्षणाची ओढ
मला शिकायचे होते, पण परिस्थितीने पूर्वी साथ दिली नाही. घरचीही प्रपंचाची जबाबदारी होतीच. परंतु, आता सर्व व्यवस्थित आहे. मग वयाचा अडसर शिक्षणात का ठेवायचा. असा विचार केला. आणि बारावीच्या परीक्षेला बसले. आळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालय आणि बारामतीच्या शारदाबाई पवार महिला महाविद्यालयातील शिक्षकांनी मला मदत केली. परिक्षेतील यशाने भारावून गेले. पुढे आता पदवीचे शिक्षण घ्यायचे असून, पहिल्या वर्षात प्रवेश घेणार असल्याचे मरकळे आजींनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.