आयएएस प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांना वाहतूक पोलिसांनी गुरुवारी (ता. ११) नोटीस बजावली. खासगी मोटारीवर लाल दिव्याचा वापर केल्याप्रकरणी त्यांच्यावर ‘मोटार वाहन अधिनियम १७७’नुसार ही कारवाई करण्यात आली आहे. खासगी मोटार तपासणीसाठी कागदपत्रांसह हजर करा, असे या नोटिशीत बजावले आहे.
प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी महागड्या खासगी मोटारीवर लाल दिव्याचा वापर केल्याचे नुकतेच समोर आले. तसेच, त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील एका अधिकाऱ्याच्या केबिनचा बेकायदा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. याबाबत डॉ. सुहास दिवसे यांनी राज्य सरकारकडे अहवाल पाठवून तक्रार दिली होती.
दरम्यान, खेडकर यांच्या बाणेर येथील निवासस्थानी चतु:शृंगी वाहतूक पोलिसांचे पथक गुरुवारी (ता. ११) पोहचले. तेव्हा प्रवेशद्वार बंद होते. पोलिसांनी त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना बंगल्यात प्रवेश देण्यात आला नाही. तसेच, खेडकर कुटुंबीयांनी माध्यमांना वृत्तांकनाला मज्जाव केला.
मोटारीवर यापूर्वीचा २६ हजारांचा दंड थकीत
या खासगी मोटारीवर ‘महाराष्ट्र शासन’ लिहिले असून, लाल दिव्याचा वापर केल्याचे आढळून आले. त्यावरून ‘मोटार वाहन अधिनियम १७७’नुसार कारवाई करण्यात आली आहे. तसेच, वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी यापूर्वी २६ हजार रुपयांचा दंड थकीत आहे. ही खासगी मोटार कायदेशीर तपासणीसाठी कागदपत्रांसह चतु:शृंगी वाहतूक विभागात हजर करावी, अशी नोटीस खेडकर यांना व्हॉटसॲपद्वारे पाठविण्यात आल्याचे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले.
वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी खेडकर यांच्या मोटारीवर यापूर्वी २१ वेळेस कारवाई करण्यात आली असून, २६ हजार रुपयांचा थकीत दंड आहे. खेडकर यांनी मोटारीवर लाल दिव्याचा वापर केला. याबाबत आज मोटार वाहन अधिनियम १७७ नुसार कारवाई करण्यात आली आहे.
- मनोज पाटील, अतिरिक्त पोलिस आयुक्त, पुणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.