पुणे : पुण्याच्या गणेशोत्सवाचे खास आकर्षण असणाऱ्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती मंडळाच्यावतीने गणेश चतुर्थीला येत्या शनिवारी (ता. 22) सकाळी 11 वाजून 10 मिनिटांनी कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांच्या हस्ते श्रींची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. गणपती यंदा मंदिरातच बसविण्यात येणार असून दर्शनासह इतर सर्व कार्यक्रम ऑनलाइन होणार आहेत.
कोरोनामुळे यंदा पुण्यात गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा केला जाणार आहे. शहरातील बहुसंख्य मंडळाचे गणपती हे मंदिरातच बसविण्यात येणार असून, ज्यांना मंदिरे नाहीत अशा मंडळांना छोटे मंडप घालण्यास परवानगी देण्यात आली आहे. दगडूशेठ मंडळाने मंदिरातच प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय घेतला असून, वेदमूर्ती मिलींद राहुरकर आणि वेदमूर्ती नटराज शास्त्री यांच्या पौरोहित्याखाली हा सोहळा संपन्न होईल, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी दिली.
ऋषीपंचमीनिमित्त रविवारी (ता. 23) रोजी पहाटे सहा वाजता प्रातिनिधीक स्वरुपात महिला अथर्वशिर्ष पठण आणि श्री गणेशाची महाआरती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. अथर्वशिर्ष पठणाची परंपरा खंडित होणार नाही. यासाठी ट्रस्टच्या @dagdushethganpati या यूट्यूब चॅनलवर लाईव्ह पठण होणार आहे. घरबसल्या यामध्ये सहभागी होण्यासाठी व रजिस्टर करण्यासाठी http://dagdushethganpati.com/marathi/rishipanchami-registration-marathi-2020/ या लिंकवर क्लिक करावे.
ऑनलाईन पद्धतीने अनेक धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे. मुख्य मंदिरामध्ये दररोज पहाटे पाच वाजता ब्रह्मणस्पती सुक्त, सकाळी सहा वाजता श्री गणपती महाअभिषेक, सकाळी साडेसात वाजता महाआरती, रात्री आठ वाजता विशेष महामंगल आरती होणार आहे. भक्तांकरीता अभिषेक व्यवस्था ऑनलाईन पद्धतीने करण्यात आली आहे. भक्तांनी नाव व गोत्र नोंदणी केल्यास त्यांच्यावतीने मंदिरामध्ये गुरुजींद्वारे अभिषेक होऊ शकेल.
श्रीं चे ऑनलाईन दर्शन घेण्याची व्यवस्था देखील ट्रस्टने केली आहे. ट्रस्टच्या वेबसाईट, ऍप, फेसबुक, यू ट्यूब, ट्ट्विटर या माध्यमांद्वारे www.dagdushethganpati.com, http://bit.ly/Dagdusheth-Live, iOS : http://bit.ly/Dagdusheth_iphone_App Android: http://bit.ly/ Dagdusheth _ Android_App या लिंकवर उत्सवकाळात 24 तास दर्शनाची सोय करण्यात आली आहे. मंदिरामध्ये प्रवेश न करता बाहेरुनच बाप्पांचे दर्शन भाविकांना घेता येणार आहे. तसेच हार, फुले, पेढे, नारळ देखील स्विकारले जाणार नाहीत आणि प्रसाद दिला जाणार नाही.
(Edited by : Sagar Diliprao Shelar)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.